शंभरावा स्मृतीदिन... राजर्षी शाहूंना अभिवादन !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 08:09 AM2022-05-06T08:09:40+5:302022-05-06T08:10:17+5:30

मानवी विकासाचे सर्वांगीण प्रतिमान तयार करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज, शुक्रवारी (दि. ६ मे) शंभरावा स्मृतिदिन ! केवळ अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेले शाहू महाराज यांनी करवीर संस्थानचे राजे म्हणून अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला.

rajarshi shahu maharaj the work done by rajarshi chhatrapati shahu maharaj for the social upliftment 100 years death anniversary | शंभरावा स्मृतीदिन... राजर्षी शाहूंना अभिवादन !

शंभरावा स्मृतीदिन... राजर्षी शाहूंना अभिवादन !

googlenewsNext

मानवी विकासाचे सर्वांगीण प्रतिमान तयार करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज, शुक्रवारी (दि. ६ मे) शंभरावा स्मृतिदिन ! केवळ अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेले शाहू महाराज यांनी करवीर संस्थानचे राजे म्हणून अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला. या कालावधीत त्यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेतील मानवी कल्याणासाठी आवश्यक निर्णय घेतले. त्यापैकी बहुतांश निर्णय क्रांतिकारक तर हाेतेच परंतु काळाची पावले ओळखणारे हाेते. युराेपमध्ये औद्याेगिक क्रांतीला प्रारंभ झाला हाेता. त्या पार्श्वभूमीवर सर्वांना शिक्षण, उत्तम शेती, व्यवसाय, व्यापारवृद्धी, आदींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांची अंमलबजावणी करताना  ज्या पायाभूत सुविधा हव्या हाेत्या. त्यांची उभारणी करण्याचा सपाटा लावला. शिक्षणाशिवाय मानवाचा विकास हाेणार नाही, हे त्यांनी तंताेतंत हेरले हाेते. त्यासाठी शिक्षण माेफत आणि सक्तीचे करावे लागेल, इतका महत्त्वपूर्ण निर्णयदेखील त्यांनी घेतला हाेता. समाज परिवर्तन करताना परंपरा आणि अंधश्रद्धांचा अडसर निर्माण हाेणार याची जाणीवही त्यांना हाेती म्हणून त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांची हाक दिली; शिवाय धार्मिक सुधारणांचा आग्रह धरला. गरीब, दलित, बहुजनांपर्यंत शिक्षण पाेहाेचले पाहिजे, असा आग्रह धरून समाजाच्या सर्वांगीण विकासात प्रत्येकास सामावून घेतले पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. 

हा रयतेचा राजा केवळ विचार मांडून, निर्णय घेऊन थांबणारा नव्हता; कायदे करून, हुकूमनामे काढून निर्णयांचा काटेकाेर अंमल कसा करता येईल, याचाही त्यांनी सखाेल विचार केला हाेता. ब्रिटिश राजवटीची पार्श्वभूमी करवीर संस्थानच्या त्या काळाला हाेती तशीच स्वातंत्र्यलढ्याची आणि विविध प्रकारच्या सामाजिक सुधारणांचीही पार्श्वभूमी हाेती. स्वतंत्र भारताने जी राज्यघटना स्वीकारली त्यातील संस्थात्मक लाेकशाही व्यवस्थेचा अपवाद साेडला तर राज्यघटनेला अभिप्रेत असलेला आशय आणि विचार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अंमलात आणला हाेता.

‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण गाैरव करताे. त्यांना मदत करणे आणि दलितांच्या उन्नतीसाठी त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कृतिशील कार्यक्रम राबविले. सर्वांना शिक्षण, जातिव्यवस्थेवर प्रहार, धार्मिक सुधारणा, औद्याेगिक प्रगती, पायाभूत सुविधांचा विकास, कृषी क्षेत्रात परिवर्तन, त्यासाठी नवी पीकपद्धती, पशू पैदास आदी अफाट प्रयाेग त्यांनी करवीर संस्थानमध्ये घडवून आणले. व्यापार, व्यवसायामध्ये मुंबईसारख्या शहरातील लाेकांची मक्तेदारी असता कामा नये, आपणही त्यात उतरले पाहिजे, असा विचार त्यांनी स्पिनिंग ॲण्ड विव्हींग मिलची पायाभरणी करताना  मांडला हाेता. 

काेल्हापुरात राजांनी व्यापारपेठ उभारली, जयसिंगपूरसारखे नवे व्यापारपेठेचे गाव वसवून व्यापार, व्यवसायाला प्राेत्साहन दिले. शेतीला पाणी देण्यासाठी धरणांची गरज ओळखून माेठे धरण बांधण्याची याेजना आखणारा देशातील शाहू महाराज हा पहिला राजा हाेऊन गेला. आपल्या संस्थानाला रस्त्याने, रेल्वेने जाेडण्यासाठी तिजाेरीतील पैसा खर्ची घातला. विकासाच्या कल्पना राबविताना रयतेच्या अंगातील कला, क्रीडा गुणांना संधी दिली पाहिजे म्हणून प्रत्येक कलेला त्यांनी राजाश्रय दिला. त्यांचा विकास आणि विस्तार व्हावा यासाठी महत्त्वपूर्ण कायदे केले. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी जगाने नाेंद घ्यावी, अशी कामगिरी  केली. राजर्षी शाहू महाराज यांनी करवीर संस्थानामध्ये स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांपूर्वी भारताच्या विकासाचे एक माॅडेल उभे केले. अशा राजर्षी शाहू राजांची जडणघडण कशी झाली, असा प्रश्न उपस्थित हाेताे.

भारतात तत्कालीन समाजात साडेपाचशेहून अधिक राजे-महाराजे आणि संस्थानिक हाेते. शंभर वर्ष उलटल्यावरदेखील  त्यांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी आणि तीच धाेरणे आजही स्वीकारून समाजाला सर्वांगीण विकास साधण्याचा मार्ग निवडता यावा, असे त्यातले किती राजे-महाराजे होते? राजर्षी शाहू हे याही बाबतीत अपवादच होते, असे म्हणावे लागेल. या माणसाची वैचारिक जडणघडणच जागतिक स्तरावर झेप घेण्याची, तशा आवाक्याची होती. लोकल पातळीवरच ग्लाेबल ज्ञानाचा नंदादीप लावून स्थानिक विकासाचे नवे प्रारूप त्यांनी मांडले. शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी घेतलेले निर्णय आणि स्वीकारलेली धाेरणे आजही लागू हाेतात. राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त नतमस्तक हाेऊन अभिवादन करावे तेवढे थाेडेच आहे.

Web Title: rajarshi shahu maharaj the work done by rajarshi chhatrapati shahu maharaj for the social upliftment 100 years death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.