राजर्षी शाहू विचारांचे प्रवक्ते
By admin | Published: January 27, 2017 11:47 PM2017-01-27T23:47:35+5:302017-01-27T23:47:35+5:30
इतिहासाचे संशोधन करत असताना त्याला समाजप्रबोधनाची जोड देण्याचे कार्य प्रा.डॉ. जयसिंगराव पवार यांनी अखंडपणे चालू ठेवले आहे.
इतिहासाचे संशोधन करत असताना त्याला समाजप्रबोधनाची जोड देण्याचे कार्य प्रा.डॉ. जयसिंगराव पवार यांनी अखंडपणे चालू ठेवले आहे. इतिहास हा विषय केवळ संशोधनाचा किंवा गाढा अभ्यास करून विद्वत्ता प्रसूत करण्याचा भाग म्हणून त्यांनी इतिहासाकडे पाहिले नाही. इतिहासाच्या गाभाऱ्यात दडलेल्या अनेक क्रांतिकारी प्रेरणा जागृत करण्याचे काम त्यांनी केले, म्हणून त्यांच्या इतिहास संशोधनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला महत्त्व आहे. डॉ. जयसिंगराव पवार केवळ एका संशोधकाच्या भूमिकेत न जाता, शिक्षकाच्या भूमिकेतून इतिहास उलगडून सांगतात.
संशोधकवृत्तीने संपूर्ण इतिहासाचे अवलोकन करताना जे जे बहुजनांच्या हिताचे घडले आहे, त्याची ऐतिहासिक बाजू समजून घेत, ती समजून सांगण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. म्हणून त्यांना विद्यापीठ वगैरे न म्हणता शाहू विचारांचे प्रवक्ते म्हणावे असा मोह होतो. त्यांनी जी पुस्तके लिहिली, संशोधनात्मक ग्रंथ तयार केले आणि अनेक संपादित केले, त्यांच्या यादीवर नजर टाकली की, हा संशोधक पुढे इतिहासाचा प्रबोधनकार झालेला दिसतो. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध, मराठेशाहीचे अंतरंग, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास, मराठा सत्तेचा उदय (१६३०-१६७४) शिवछत्रपती - एक मागोवा, शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध, छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, राजर्षी शाहू छत्रपती : पत्रव्यवहार आणि कायदे, राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे व हुकूमनामे, राजर्षी शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे, राजर्षी शाहू छत्रपती-एक मागोवा, राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी : एक चिकित्सा, सेनापती संताजी घोरपडे, महाराणी ताराबाई, शिवपुत्र छत्रपती राजाराम, क्रांतिसिंह नाना पाटील, श्री शहाजी छत्रपती स्मृतिग्रंथ, आदि भली मोठी ग्रंथांची यादी म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार यांचा जीवनपटच आहे. त्यांनी इतिहासाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून सांगितलेला आहे, त्याच वाटेवर ते चालत आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याने अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ या ऐतिहासिक ग्रंथाचे कार्य इतके प्रेरणादायी आहे की, त्याचे काम अखंडपणे त्यांच्या टेबलावर ठाण मांडून बसलेले असते. हा बाराशे पानांचा महाग्रंथ तयार करण्यासाठी त्यांनी आयुष्यातील सात वर्षे खर्ची घातली आहेत. या ग्रंथातून शाहू महाराजांचे परिपूर्ण जीवन आणि कार्य समजतेच, त्याचबरोबर आधुनिक महाराष्ट्राचा पाया ज्या राजर्षी शाहू महाराज यांनी घातला, त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी समजते. केवळ अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील एकही पैलू या ग्रंथातून सुटलेला नाही. तत्कालीन राजकीय व्यवस्था आणि व्यवहार, सामाजिक अभिसरण, धार्मिक उलथापालथी, हिंदुस्थानचा स्वातंत्र्यलढा, शिक्षणाचा प्रसार-प्रचार, जाती व्यवस्थेविरुद्धचा लढा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा उदय, कृषी-औद्योगिक परिवर्तनासाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचे महत्त्व जाणणारा एकमेव राजा, आदि विषयांतून राजर्षी शाहू महाराज नव्या पिढीला दिसतात. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शाहू कार्याविषयी सलामच केला पाहिजे. शाहूमय झालेला हा संशोधक कर्मयोगी वृत्तीने सातत्याने कार्यमग्न राहतो. आजही वयाची ७५ वर्षे होत असताना त्यांच्याकडे अनेक प्रकल्पांचे काम चालू असते.
इतिहास हा सणावळीत नाही, तो लढ्यात नाही, तो नामावलीत नाही, तो समाजाच्या परिवर्तनात दडलेला आहे. ज्या इतिहासाने परिवर्तनाची भूमिका बजावली, त्या इतिहासाचे प्रबोधन म्हणून साधकासारखी प्रार्थना करायला हवी. राजर्षी शाहू कार्य त्यापैकीच एक आहे. कोणतीही पाठपोथी वाचण्यापेक्षा राजर्षी शाहू चरित्र ग्रंथाचे रोज वाचन करावे. त्यातून नव्या समाजाची प्रेरणा मिळत राहील, हा विचार डॉ. जयसिंगराव पवार यांनी केलेल्या संशोधनात्मक ग्रंथाच्या पाना-पानांत जाणवतो आहे. त्यामुळे १९६४ पासून सुरू झालेले इतिहास संशोधन आणि त्याद्वारे समाजप्रबोधन अखंडपणे डॉ. जयसिंंगराव पवार करीत आहेत. अभ्यास, लेखन, चिंतन, मनन आणि संशोधनाची दिशा स्पष्ट आहे. वैचारिक बैठक पक्की आहे. छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, राजर्षी शाहू महाराज, आदी महान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या ऐतिहासिक कार्याचा शोध घेताना रयतेच्या समाजाचा इतिहासच उलगडतो आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी कोल्हापूरनगरीचा इतिहास मांडण्याचा संकल्प सोडला आहे. एका ऐतिहासिक नगरीचा इतिहास समोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांच्या हातून घडणार आहे. ते अंतिम टप्प्यात आहे. त्यातही त्यांची भूमिका ही आपल्या समाज प्रबोधनाची आहे. आपल्या भूमीचा, परिसराचा समग्र इतिहास समजून घेण्याचा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या कार्याला बळ मिळण्यासाठी आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा !
- वसंत भोसले : जयसिंगराव पवार