राजेहो जागे व्हा ! ‘अब की बार किसान सरकार...’ चा नारा देत चंद्रशेखरराव आले
By नंदकिशोर पाटील | Published: February 6, 2023 12:48 PM2023-02-06T12:48:23+5:302023-02-06T12:53:48+5:30
मराठी माणूस केसीआर यांच्या बीआरएसचा स्वीकारेल का, हे येणारा काळच ठरवेल.
राघोबादादा पेशव्यांनी आताच्या पाकिस्तानात असलेल्या अटकेपर्यंत धडक मारून मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तिथे रोवला. मराठा साम्राज्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणून गौरवांकित ठरलेल्या या ऐतिहासिक घटनेला पावणे तीनशे वर्षे झाली. कालांतराने मराठा साम्राज्य लयाला गेले. ‘पानिपत’च्या लढाईत विश्वासराव धारातीर्थी पडल्यापासून मराठी माणूस जणू आत्मविश्वास हरवून बसला की काय, अशी शंका डावपेच हरलेल्या मराठी नेत्यांकडे पाहून येते. ‘दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा...’, गौरवगीतातील या ओळी गुणगुणताना आपली छाती अभिमानाने फुलून यावी, या क्षणाची अजून प्रतीक्षाच आहे.
सतराव्या शतकात मराठ्यांनी दिल्ली काबीज केली होती; पण ही घटना स्वातंत्र्यपूर्व काळातील. स्वातंत्र्योत्तर काळात दिल्लीने नेहमीच मराठी नेत्यांना सापत्न वागणूक दिली. आपल्यासाठी अजूनही ‘दिल्ली बहोत दूर है!’ राजकीयदृष्ट्या दिल्ली काबीज करण्याचे प्रयत्न आजवर झालेच नाहीत, असे नाही. यशवंतराव चव्हाण, शरद पवार या दिग्गज नेत्यांनी ती धमक दाखवली; पण डावपेच फसले. भविष्याच्या उदरात काय दडले आहे कोण जाणे! राजकीय इतिहासाची प्रस्तावना करण्यामागे कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रातील स्वारी! रविवारी राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा नांदेडात मेळावा झाला.
राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांमध्ये राव यांची गणना होते. तेलंगणा हे स्वतंत्र राज्य झाल्यापासून गेली आठ वर्षे राव यांचा पक्ष तेथे सत्तेवर आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या नावाने आजवर ओळख असलेल्या या पक्षाचे राव यांनी अलीकडेच ‘भारत राष्ट्र समिती’ असे नामकरण केले. ‘तेलंगणा’ऐवजी ‘भारत’ शब्दाची निवड करून राव यांनी एकप्रकारे आपले मनसुभेच जाहीर केले. सीमावर्ती भागातील काही गावांनी कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणात जाण्याची मागणी केली, तेव्हाच पाल चुकचुकली होती. गुजरातमधून प्रतिक्रिया आली नाही. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य करून या वादात तेल ओतण्याचे काम केले. शेवटी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद शमला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी अतिशय सावध भूमिका घेत सीमावर्ती भागातील मराठी गावांमध्ये नेटवर्क निर्माण केले. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, मुखेड, धर्माबाद आणि किनवट या तालुक्यात बीआरएसच्या प्रतिनिधींनी संपर्क वाढवून तिथल्या जनतेला चुचकारण्याचे काम केले. गेल्या वर्षभरापासून त्यांची पेरणी सुरू होती. देशभरातील सव्वा लाख गावांपर्यंत ‘बीआरएस’ पोहोचविण्याचा राव यांचा मनोदय आहे. त्यासाठी ‘उज्ज्वल भारत’चा नारा दिलेला आहे. आपल्या पक्षाचा परराज्यात विस्तार करण्यापूर्वी राव यांनी तेलंगणात विकासाचे एक मॉडेल तयार केले आहे. ज्याची फारसी चर्चा प्रसारमाध्यमातून होत नाही.
पूर्वाश्रमीच्या एकत्रित आंध्र प्रदेशाच्या सरकारांनी तेलंगणाकडे तसे दुर्लक्षच केले. त्यातूनच स्वतंत्र राज्याची मागणी पुढे आली. आता हा प्रदेश बदलला आहे. आठ वर्षांपूर्वीचा तेलंगणा आणि आजचा. यात आमूलाग्र बदल झालेला जाणवतो. केवळ रस्ते, इमारती नव्हे तर शेती आणि सिंचनावर राव यांनी भर दिला. आज तेलंगणातील शेतकऱ्यांना जवळपास मोफत वीज आणि पाणी मिळते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात तत्काळ मदत होते. शेतीसाठी सुलभ कर्जपुरवठा आणि तोही कमी व्याजदरात. ग्रामसंसदेच्या माध्यमातून गावोगाव एकप्रकारचे ‘युटिलिटी’ सेंटर उभी केली आहेत. यात शेती अवजारे, खते, बियाण्यांपासून सर्वकाही मिळते. शिवाय चोवीस तास वीज. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे त्यांनी हेच मॉडेल ठेवले.
महाराष्ट्रात आजवर मायावतींचा बसपा, ओवेशींचा एमआयएम, केजरीवाल यांचा ‘आप’ अशा काही प्रादेशिक पक्षांनी प्रवेश केला आहे. आपल्याकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील गोवा, गुजरात, बिहार, अंदमानात उमेदवार उभे केले. शिवसेनेचे उमेदवार उत्तर प्रदेश, गुजरातेत होते. मात्र, या सर्वांना अपेक्षित यश लाभले नाही. प्रादेशिक पक्षांच्या काही मर्यादा असतात. मुख्यत: ते पक्ष प्रादेशिक नेतृत्व आणि अस्मितेवर आधारलेले असतात. त्यामुळे परराज्यात ते स्वीकारार्ह होतील, असे नाही. राव यांचा ‘बीआरएस’ हा शेजारी राज्यातील आहे. प्रादेशिक ते राष्ट्रीय अशी मजल मारण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मराठी माणूस त्यांना स्वीकारेल का, हे येणारा काळच ठरवेल.