रजनीची माघार, चाहते अस्वस्थ, भाजप चिंतित!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:00 AM2020-12-30T00:00:32+5:302020-12-30T07:00:59+5:30

- संजीव साबडे दक्षिणेकडील विशेषतः तामिळनाडूतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता रजनीकांत याने रुग्णालयातून  घरी परतल्यानंतर मंगळवारी जो निर्णय जाहीर केला, ...

Rajini's withdrawal, fans upset, BJP worried! | रजनीची माघार, चाहते अस्वस्थ, भाजप चिंतित!

रजनीची माघार, चाहते अस्वस्थ, भाजप चिंतित!

Next

- संजीव साबडे

दक्षिणेकडील विशेषतः तामिळनाडूतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता रजनीकांत याने रुग्णालयातून  घरी परतल्यानंतर मंगळवारी जो निर्णय जाहीर केला, त्यामुळे त्याचे चाहते खूपच अस्वस्थ झाले आहेत. रजनीकांत ऊर्फ शिवाजीराव गायकवाड याने आपण राजकीय पक्ष स्थापन करणार नाही आणि सक्रिय राजकारणात उतरणार नाही, निवडणुकांच्या राजकारणात असणार नाही, असा निर्णय जाहीर करताना प्रकृतीचे कारण दिले आहे. आपण लोकांची सेवा करीत राहू, असे त्याने म्हटले आहे.  प्रकृतीमुळे त्याला यापुढील काळात कदाचित फारसे चित्रपटही करता येणार नाहीत, ही बाबही चाहत्यांना अस्वस्थ करणारी आहे.   
 

एम. जी. रामचंद्रन यांच्यानंतरचा रजनीकांत किंवा तामिळ चाहत्यांच्या शब्दात ‘‘रजिनी’’ हाच खरा द्राविडी मंडळींचा सुपर स्टार.  त्याच्या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी तुटून पडणे, चित्रपटगृहाबाहेर त्याच्या २०० फूट आकाराच्या प्रतिकृती लावणे,  त्याच्या पुतळ्यांवर दुधाचा अभिषेक करणे हे केवळ आणि केवळ तामिळनाडूमध्येच घडू शकते. चाहत्यांचे इतके प्रेम लाभलेला अभिनेता अलीकडे विरळाच. 
 

वय ७० वर्षे, अलीकडेच मोठी शस्त्रक्रिया झालेली, त्यानंतर चित्रीकरणास गेला असता, तेथील दोन जणांना कोरोनाची बाधा झालेली, त्यामुळे शूटिंग थांबवावे लागले. त्यानंतर लगेचच रक्तदाब सतत वर-खाली होत असल्याने रजनीकांतला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता बाहेर फार फिरू नका, राजकारणाची धूळ अंगावर घेऊ नका, असा सल्ला डॉक्टर्स आणि घरच्या मंडळींनी दिला आहे. यामुळेच त्याला हा स्वाभाविक निर्णय घ्यावा लागला. पण, पुढील पाच महिन्यांनी तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. भाजप तसेच जयललितांच्या माघारी अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांची सारी भिस्त सध्या  राजनीकांतवर होती. 

आध्यात्मिक राजकारणाची भाषा करणाऱ्या आणि २००४ साली ‘‘मी भाजपला मतदान केले’’, असे उघडपणे सांगणाऱ्या या अभिनेत्याच्या  लोकप्रियतेचा आपल्याला फायदा होईल, असे या दोन्ही पक्षांना  वाटत होते. राज्यात अण्णा द्रमुक व भाजप एकत्र आल्यात जमा आहेत आणि त्यांना तगडे आव्हान आहे ते द्रमुकचे. खरे तर करुणानिधीही जिवंत नाहीत आणि द्रमुकची सारी सूत्रे स्टॅलिन याच्याकडे आहेत. पण, वडिलांच्या पश्चातही  स्टॅलिनने अण्णा द्रमुकला  अडचणीत आणले आहे. 

एकेकाळी करुणानिधींच्या  द्रमुकला मदत करणारा  रजनीकांत आता भाजप व अण्णा द्रमुकसोबत जाईल, अशी चिन्हे दिसत होती. त्याच्या लोकप्रियतेमुळे पुन्हा आपण सत्तेवर येऊ, अशी स्वप्ने अण्णा द्रमुकचे नेते पाहत होते, तर त्याच्यामार्फत तामिळनाडूमध्ये पाय रोवता येतील, असे भाजपचे गणित होते. पण, रजनीकांतचे आजारपण आणि राजकारणात न येण्याचा निर्णय यामुळे दोन्ही पक्षांना धक्का बसला आहे. 

भाजपला आता तामिळनाडूमध्ये ताकद वाढविणे अधिक अवघड  होऊ शकेल आणि अण्णा द्रमुकची तर कदाचित सत्ताच जाईल. रजनीकांत यांनी प्रकृतीमुळे घेतलेला निर्णय योग्य आहे, तब्येतच अधिक महत्त्वाची, अशा प्रतिक्रिया दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी  दिल्या आहेत. पण, त्यांची धाकधूक नक्कीच वाढली आहे.  

सत्ताधारी अण्णा द्रमुकला आता द्रमुकशी लढताना नाकीनऊ येऊ शकतील, द्रमुकसोबत काँग्रेस व अन्य लहान द्रविडी पक्ष आहेतच. शिवाय, आणखी एक लोकप्रिय अभिनेता कमल हासन हाही द्रमुकच्या अप्रत्यक्ष मदतीस येईल, असे दिसत आहे. त्याचे राजकीय विचार व चाहते हे उघडपणे भाजप व अण्णा द्रमुकच्या विरोधातील आहेत. अर्थात, कमल हासनचा राजकीय आवाका किती आहे, यावर बरेच काही अवलंबून आहे. 

आपणच  जयललिता यांच्या वारसदार आहोत, असा दावा सातत्याने करणाऱ्या आणि सध्याच्या अण्णा द्रमुक नेत्यांना आव्हान देऊ पाहणाऱ्या शशिकला बहुधा जानेवारीत दंडाची रक्कम भरून तुरुंगातून बाहेर येतील. त्या लोकप्रिय नाहीत, पण सत्ताधारी नेत्यांविरोधात बराच मसाला त्यांच्याकडे असावा, असे दिसते. अशा स्थितीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. एका सुपर स्टारच्या माघारीमुळे मात्र, तामिळनाडूमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 
 

Web Title: Rajini's withdrawal, fans upset, BJP worried!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा