राज्यसभा अखेर बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:15 AM2018-03-16T05:15:52+5:302018-03-16T05:15:52+5:30
राज्यसभेवर राज्यातून जाणाऱ्या सहा सदस्यांचा मार्ग अखेर निर्धोक पार पडला. राज्यसभेची निवडणूक तशी खुल्या पद्धतीने होणारी.
राज्यसभेवर राज्यातून जाणाऱ्या सहा सदस्यांचा मार्ग अखेर निर्धोक पार पडला. राज्यसभेची निवडणूक तशी खुल्या पद्धतीने होणारी. भाजपाचे तीन उमेदवार, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक असे सहा उमेदवार राज्यसभेवर जाणे पक्के होते. तीन उमेदवारांचा कोटा असूनही भाजपाने चौथ्या उमेदवाराचा अर्ज भरला. त्यामुळे राज्यसभेसाठी निवडणूक होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली. काँग्रेसचे उमेदवार अर्थात कुमार केतकर यांना रोखण्यासाठी भाजपाने चौथा उमेदवार दिल्याची जोरदार चर्चा रंगली. तथापि, चौथा उमेदवार हा डमी असल्याचेही सांगण्यात येत होते. बरं जर चौथा उमेदवार डमी होता, तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटपर्यंत हे ताणून धरण्याची आवश्यकता होती का? हादेखील प्रश्न आहे. शिवसेनेच्या कोट्यातील तसेच स्वत:ची अतिरिक्त ठरणारी मते आपल्याला मिळू शकतात, त्यातून काँग्रेस उमेदवाराला पराभूत करता येऊ शकते, अशा शक्यताही मग पडताळून पाहण्यात येऊ लागल्या. पण अखेर ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती नारायण राणे आणि कुमार केतकर यांची. शिवसेनेला नको म्हणून राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातील प्रवेश लांबत गेला. त्यात शिवसेनेने आधीच स्वतंत्र बाण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत बसणाºया संभाव्य फटक्याची चिंता भाजपाला आत्तापासून सतावू लागली आहे. त्यामुळे काहीही करून नारायण राणेंना केंद्रात पाठवायचे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले होते. नारायण राणे यांच्यासमोरही अन्य काही पर्याय सध्या नसल्याने त्यांनी ही आॅफर स्वीकारली. खासदारकी गेली तरी चालेल; पण रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, असे वक्तव्यही त्यांनी केले. विशेष म्हणजे हा प्रकल्प व्हावा, ही भाजपाची इच्छा आहे. तर दुसरे चर्चेतील उमेदवार कुमार केतकर यांनी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांना मागे टाकत राज्यसभेचे तिकीट मिळविले. पत्रकारितेतील दिग्गज, निर्भीड असा बाणा जपणारे केतकर अखेर काँग्रेसवासी झाले. कुमार केतकर नेहरू-गांधी परिवाराशी नैतिक बांधिलकी जपणारे म्हणून परिचित आहेत. पत्रकारिता करताना त्यांनी काँग्रेसवर वेळोवेळी टीकाही केली. पण त्यांचे प्रमुख वैचारिक शत्रू म्हणजे रा. स्व. संघ आणि भाजपा. गेल्या काही काळापासून नेहरू-परिवारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून थेट टीका होत आहे. या परिवाराच्या योगदानाबद्दलची जाहीर शंका उपस्थित केली जात आहे. काँग्रेस पक्ष सध्या देशभर अत्यंत कष्टप्रद स्थितीतून जात आहे. काँग्रेसला केडर बेस नव्याने बांधण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर कुमार केतकर यांची निवड काँग्रेससाठी निश्चितच उपयुक्त ठरणारी आहे.