राम जेठमलानी : वकिली कौशल्याचे मूर्तिमंत प्रतीक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 03:41 AM2019-09-10T03:41:28+5:302019-09-10T03:41:57+5:30

अंतुले खटल्याचे सुमारे १४ महिने झालेले सर्व कामकाज नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. राजकीय समीकरणे बदलली व जेठमलानी या खटल्यातून बाहेर पडले. नंतर हा खटला सत्र न्यायालयात चालला आणि अंतुले निर्दोष ठरले.

Ram Jethmalani: An iconic symbol of advocacy skills | राम जेठमलानी : वकिली कौशल्याचे मूर्तिमंत प्रतीक

राम जेठमलानी : वकिली कौशल्याचे मूर्तिमंत प्रतीक

Next

अजित गोगटे, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत

दि. ७ एप्रिल १९८४. मुंबई हायकोर्टाची कोर्ट रूम नं. १३. अंतुले खटल्याचा पहिला दिवस. आज ३५ वर्षे उलटली, तरी सर्व काल घडल्यासारखं लख्ख आठवतंय. याचे कारणही तसेच आहे. आयुष्यभर केलेल्या न्यायालयीन पत्रकारितेचाही माझा तो पहिलाच दिवस होता. त्या पहिल्याच दिवशी राम जेठमलानी या अलौकिक व्यक्तीला पाहण्याचे, ऐकण्याचे भाग्य मला लाभले. खच्चून भरलेल्या कोर्टात भेदरलेल्या मनाने शिरलो, तर माणूस दिसण्याआधी त्याचे धीरगंभीर, खर्ज्याच्या स्वरातील अप्रतिम इंग्रजी संबोधन कानी पडले. त्या बोलण्याचा आशय फारसा कळत नव्हता, तरी मंत्रमुग्ध झालो. जेवणाच्या सुट्टीत चौकशी केली आणि त्या मोहिनी घालणाऱ्या आवाजाचे धनी राम जेठमलानी असल्याचे कळले. ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’ अशी माझी अवस्था झाली व मी या माणसाच्या प्रेमात पडलो. पुढे या व्यक्तीचे महात्म्य कळत गेले आणि प्रेमाचे रूपांतर नितांत आदरात झाले. कायदा आणि न्यायसंस्था यासारख्या क्लिष्ट आणि इतरांच्या दृष्टीने अनाकलनीय अशा क्षेत्रात मी सर्वार्थाने रमलो, याचे सर्व श्रेय ज्या मोजक्या महाभागांकडे जाते, त्यात जेठमलानींचे स्थान खूप वरचे आहे. एकलव्याप्रमाणे मनात मूर्ती ठेवून त्यांच्याकडून मी बरेच शिकलो. कामावरील निष्ठा, सचोटी आणि अपार कष्ट घेण्याची तयारी हे गुण नकळत अंगी बाणविले गेले. वकील नव्हतो, म्हणून काळा डगला घातला नाही. तरी अंगीकारलेल्या भिन्न व्यवसायातही या संस्कारांच्या शिदोरीने तृप्ततेची ढेकर देता आली!

अंतुले खटल्याचे सुमारे १४ महिने झालेले सर्व कामकाज नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. राजकीय समीकरणे बदलली व जेठमलानी या खटल्यातून बाहेर पडले. नंतर हा खटला सत्र न्यायालयात चालला आणि अंतुले निर्दोष ठरले. तरीही या निरर्थक खटल्यात जेठमलानींची दोन गुणवैशिष्ट्ये मनावर कोरली गेली. एरवी निग्रही बाण्याने आक्रमक युक्तिवाद करणाºया जेठमलानींनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची बातमी न्या. दिनशॉ मेहता यांना मार्दवी विव्हळतेने सांगितली. आणीबाणीवरून इंदिराजींशी उभे वैर असूनही त्यावेळी जेठमलानी यांनी वापरलेले ‘अवर बिलव्हेड प्राइम मिनिस्टर हॅज बिन शॉट डेड’ हे शब्द त्यांच्या नितळ मनाचा आरसा वाटावेत, असे होते. त्याच खटल्यात जे. जे. भाभा व अजित केरकर या ‘एनसीपीए’च्या दोन तत्कालीन विश्वस्तांची जेठमलानी यांनी घेतलेली साक्ष हा त्या कलेचा जणू वस्तुपाठ होता.

वकिली कौशल्याचे जेठमलानी हे मूर्तिमंत प्रतीक होते. याचे दोन अविस्मरणीय अनुभव मला गाठीशी बांधता आले. हर्षद मेहतावरील रोखे गैरव्यवहाराच्या खटल्यात एक दिवस जेठमलानी यांनी एक ‘न भूतो’ असा प्रस्ताव कोर्टापुढे मांडला. हर्षद मेहताच्या बव्हंशी शेअर व रोख्यांच्या स्वरूपात असलेल्या मालमत्तेवर टाच आली होती व ती ‘कस्टोडियन’च्या ताब्यात होती. हे सर्व शेअर व रोखे, बाजार कोसळणार नाही, अशा प्रकारे विकून जास्तीतजास्त रक्कम उभी करून देण्याचा हा प्रस्ताव होता. आरोपीलाच त्याच्या जप्ती आलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावू देण्याचा हा प्रस्ताव अर्थातच अमान्य झाला, पण न्यायाधीशांनीही बुचकळ्यात पडावे, एवढ्या सफाईदारपणे जेठमलानी यांनी तो मांडला होता. १९९५च्या निवडणुकीआधी एन्रॉन वीजप्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याच्या वल्गना करत, सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजपा युतीने नंतर या प्रकल्पासाठी पायघड्या घातल्या. तो प्रकल्प रद्द करण्यासाठी ‘सिटू’ या डाव्या कामगार संघटनेने हायकोर्टात याचिका केली. त्यावेळी सी. जे. सावंत अ‍ॅडव्होकेट जनरल होते, पण हे अवघड काम गळ्यात न घालण्याची विनंती त्यांनी बालमित्र असलेल्या मुख्यमंत्री मनोहरपंतांना केली आणि सरकारसाठी ‘स्पेशल काउन्सल’ म्हणून जेठमलानींना नेमले गेले. सरकारची ही कोलांट उडी कायद्याच्या चौकटीत बसवून कोर्टाच्या गळी उतरविण्याचे अग्निदिव्य जेठमलानी यांनी खुबीने पार पाडले.

देवाचे बोलावणे येण्याची वाट पाहत ‘एक्झिट लाउंज’मध्ये बसलेल्या जेठमलानींनी खरंच ‘एक्झिट’ घेतली, पण एक पाय खुर्चीवर ठेवत, कोणताही आक्रस्ताळेपणा न करताही, मान वेळावत, मध्येच हास्यविनोद करत, प्रभावी युक्तिवाद करणारी त्यांची लाघवी छबी चिरकाल स्मरणात राहील. त्यांनी प्रत्यक्ष बोटाला धरून आणि कॉलेज-विद्यापीठांमध्ये अध्यापन करून असंख्य वकिलांच्या तीन पिढ्या तयार केल्या. कोर्टात त्यांच्यासोबतच नव्हे, तर विरोधात उभे राहणे हीच एक शिकवणी होती. नियती अशी माणसे एकदाच जन्माला घालते. त्यामुळे राम जेठमलानी पुन्हा होणे नाही, हे कृतज्ञतेने मान्य करणे, हीच त्यांना आदरांजली!

Web Title: Ram Jethmalani: An iconic symbol of advocacy skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.