गुरुंची पोकळ नक्कल तेवढी मागे उरते, तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 08:04 AM2024-03-27T08:04:20+5:302024-03-27T08:05:01+5:30
राममनोहर लोहिया यांच्या विचारांचे चेले सत्तेशी टक्कर घ्यायला नेहमीच तयार असतात. मात्र, सत्तेचा मोह आता त्यांनाही ग्रासत चालला आहे!
- योगेंद्र यादव
(राष्ट्रीय संयोजक, भारत जोडो अभियान)
१९७७ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात एक नवी राजकीय जागृती झाली होती. त्या काळात जनता पक्ष आणि त्याच्या समर्थकांत राममनोहर लोहियांची आठवण वारंवार काढली जात असे. ते हयात असते, तर देशाच्या विकासाला मोठा वेग आला असता, असे बोलले जाई. त्याच काळात युरोपातील एक समाजवादी दिल्लीला आले. लोहिया कोण आणि कसे होते, हे त्यांना समजून घ्यायचे होते. लोहियांची मूळ पुस्तके इंग्रजीत उपलब्ध नव्हती. लोहियांच्या निकट असलेल्या जनता पक्षाच्या काही लोकांशी ते बोलले आणि निराश झाले. म्हणाले ‘या लोकांना पाहून लोहिया कसे होते हे ठरवायला गेलो, तर लोहिया यांचे विचार काही विशेष मौलिक नव्हते; पण ते अत्यंत अहंकारी असले पाहिजेत, असेच मला वाटेल.’
त्यांची ही प्रतिक्रिया लोहियांना नव्हे; पण मोठ्या पदावर पोहोचलेल्या त्यांच्या अनुयायांना मात्र लागू पडते. गांधीवादी विचारांची महान व्यक्तिमत्त्वे आणि त्यांचे अनुयायी यांच्यातही अशीच दरी दिसते. गांधी, नेहरू, जयप्रकाश या सर्वांच्याच बाबतीत असे म्हणता येईल. कदाचित या लोकांना आपल्या विचारांना संघटनेचे रूप देता आले नाही. त्यामुळे त्यांची महानता ते हयात होते तोवर त्यांच्या शिष्यांवर प्रभाव टाकत राहिली. नंतर सारे संपत गेले. गुरूंची पोकळ नक्कल तेवढी मागे उरली.
सत्तेला प्रखर विरोध करतानाही लोहिया सतत काम करत राहिले. गांधीजींचे शिष्य आणि त्यांचे आवडते असूनही वेळप्रसंगी गांधींवर टीका करताना त्यांनी अनमान केला नाही आणि नेहरूंशी मैत्री तोडायलाही त्यांना वेळ लागला नाही. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाची मोहिनी अख्ख्या देशावर पसरलेली असताना लोहियांना मूर्तिभंजकाची भूमिका पार पाडावी लागली आणि त्याची किंमतही चुकवावी लागली.
धोरण, विचारांना प्राधान्य, हे लोहियांचे दुसरे वैशिष्ट्य. व्यक्ती किंवा नेत्याला ते कमीत कमी महत्त्व देत. राजकारणात डावपेचांचे तंत्र गरजेचे असते. व्यावहारिक राजकीय नेते असल्याने लोहियासुद्धा डावपेचांचे महत्त्व मान्य करत; परंतु व्यावहारिकतेचा आधार घेऊन आदर्श दडपून टाकण्याची नीती त्यांनी कधीही अवलंबिली नाही. उपयुक्ततावाद त्यांच्या स्वभावातच नव्हता. त्यामुळेच नेहरू, जयप्रकाश आणि कृपलानी यांच्यासारख्यांचे शत्रूत्व पत्करावे लागून ते त्यांच्यापासून दूर गेले; पण शेवटपर्यंत मैत्री मात्र अबाधित राहिली.
आज लोहियांच्या शिष्यांमध्ये उपयुक्ततावाद जास्त दिसतो. चर्चेमध्ये ते कधीही लोहियांना नाकारणार नाहीत; पण व्यवहारात परिस्थितीचे कारण देऊन प्रत्यक्ष काम आणि कृतीमध्ये मात्र त्या विचारांशी फारकत घेत राहतील. राजकारणात नेहमीच दोन प्रकारचे लोक असतात आणि असतील. पहिला प्रकार : सिद्धांत आणि व्यवहार यांच्यात समतोल राखण्याच्या प्रयत्नात सिद्धांताच्या बाजूने झुकणारे लोक. दुसरा प्रकार : परिस्थितीचा बहाणा करून सिद्धांत आणि नीतिमत्तेला सहज मूठमाती द्यायला तयार होणारे लोक.
कर्मावर भर हे लोहियांचे तिसरे वैशिष्ट्य होते. तत्त्व आचरणावर त्यांचा जोर असायचा. भारतीय व्यक्तिमत्त्वातील एक पैलू त्यांना फार खटकत असे, तो म्हणजे आदर्शाच्या गोष्टी करायच्या, प्रत्यक्षात मात्र तसे वर्तन करायचे नाही. किंबहुना आदर्शाच्या विरोधात वागायचे. लोहियांच्या दृष्टीने टक्कर घेणे, संघर्ष करणे, हेच कर्माचे मुख्य रूप होते. त्यांच्यानंतर त्यांच्या शिष्यांनी कर्मावर भर देण्याची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न नक्की केला आणि आजही बहुतेक लोहियावादी सत्तेशी टक्कर घ्यायला नेहमीच तयार असतात. मात्र, सत्तेचा मोह त्यांनाही ग्रासत चालला आहे.
लोहिया स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वच्छंद वर्तनाचा अधिकार मागत होते आणि म्हणूनच सत्ता आणि पद यात त्यांनी स्वत:ला बांधून घेतले नाही. इतकेच नव्हे, तर कुठल्या समितीतही ते कधी सहभागी झाले नाहीत. त्यांचे चेले मात्र सत्ता आणि पदांना चिकटून राहू इच्छितात. लोहिया यांच्या व्यक्तिमत्त्वातील स्वच्छंदतेची त्यांचे चेले नक्कल करतात. मात्र, त्यांचा अपरिग्रह आणि सत्तापदाविषयीची उदासीनता याचे अनुकरण ते करत नाहीत. लोहियावादाचे पतन केवळ सरकारी आणि प्रतिष्ठित लोहियावाद्यांमुळे झालेले नाही. आमच्यासारख्या सत्तापदांपासून दूर राहणाऱ्या आणि आपलेच तर्कट चालवणाऱ्या तथाकथित लोहियावाद्यांमुळेही झाले आहे.
म्हणून लोहियावाद्यांची वक्तव्ये आणि उपदेशाला कोणी ‘निष्क्रिय माणसाचा स्वाभिमान’ किंवा ‘कॉफी हाउसमधील बडबड’ म्हटले, तर ती अतिशयोक्ती वाटेल; पण ते खोटे मात्र नक्की नाही!
(गंगाप्रसाद यांनी संपादित केलेल्या ‘संभावनाओं की तलाश’ या ग्रंथातील लेखाचा संपादित अंश.)