रामकृष्ण काका एक समर्पित जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:31 AM2017-11-03T03:31:28+5:302017-11-03T03:32:03+5:30

रामकृष्ण नायक यांच काम खूप महत्त्वाचं आहे. ‘स्नेहमंदिर’मध्ये वृद्धांना दाखल होण्यासाठी आता वाट बघावी लागते. शंभरच्या पटीत तिथली ‘वेटिंग लिस्ट’ आहे. हे बघितल्यानंतर रामकृष्ण नायक यांच्या कामाचं महत्त्व लक्षात येईल. त्यांच्या या कार्याबद्दल समाज कायम ऋणी राहील.

Ramakrishna Kaka is a dedicated life | रामकृष्ण काका एक समर्पित जीवन

रामकृष्ण काका एक समर्पित जीवन

Next

- मनस्विनी प्रभुणे-नायक

रामकृष्ण नायक यांच काम खूप महत्त्वाचं आहे. ‘स्नेहमंदिर’मध्ये वृद्धांना दाखल होण्यासाठी आता वाट बघावी लागते. शंभरच्या पटीत तिथली ‘वेटिंग लिस्ट’ आहे. हे बघितल्यानंतर रामकृष्ण नायक यांच्या कामाचं महत्त्व लक्षात येईल. त्यांच्या या कार्याबद्दल समाज कायम ऋणी राहील.

‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ हे नाव महाविद्यालयात असताना डॉ. वि. भा. देशपांडे या आमच्या सरांच्यामुळे माहीत झालं. त्याच काळात वि. भा. देशपांडे सरांच्या (ज्यांना सर्वजण ‘विभा’ असेच म्हणत) नाट्यकोश प्रकल्पासाठी सहायक म्हणून काम करत होते. विभा नाट्यसमीक्षक असल्याने त्यांच्याकडे सतत नाट्य क्षेत्रातील लोकांची ऊठबस असायची. शिवाय दरवर्षी ते नाट्य प्रशिक्षण शिबिर घ्यायचे ज्यात या क्षेत्रातील दिग्गज मंडळी शिकवायला यायची. यात दरवर्षी एक व्यक्ती आवर्जून असायची ती म्हणजे दामू केंकरे. ज्यांना आम्ही दामू काका म्हणायचो. दि गोवा हिंदू असोसिएशनशी जुळलेलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व होतं. दामू काकांच्या बोलण्यात तेव्हा अनेकदा रामकृष्ण नायक यांचा उल्लेख असायचा आणि अर्थातच तो त्यांच्या पद्धतीने एकेरीतच उल्लेख करायचे. दामू काका आणि विभांच्या गप्पा ऐकायला मजा यायची. नाट्य क्षेत्रातील अनेक घडामोडी कानी पडायच्या. नाट्यकोशातील अशाच एका नोंदीच्या निमित्ताने रामकृष्ण नायक यांना पत्राद्वारे संपर्क करायचा होता. दामू काकांकडून त्यांचा एकेरीत उल्लेख ऐकल्यामुळे रामकृष्ण नायक यांच्या वयाचा तेव्हा काहीच अंदाज येत नव्हता. त्यामुळे मी देखील चुकून विभांच्या समोर त्यांचा एकेरीत उल्लेख केला. ती चूक पकडून विभांनी मला सुनावले, ‘अगं ते तुझ्या आजोबांच्या वयाचे आहेत’ हे सांगेपर्यंत मलाच काय; पण कुणालाही नुसतं वर्णन ऐकून रामकृष्ण नायकांच्या वयाचा पत्ता लागला नसता. ही गोष्ट २० वर्षांपूर्वीची आहे. आज रामकृष्ण नायक वयाच्या नव्वदीत पदार्पण करीत आहेत; पण दामू काका त्यांच्याबद्दल जसं एखाद्या तरुण मुलाचं वर्णन करावं असं बोलायचे तसा त्यांचा आजही भास होतो.
‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ आणि रामकृष्ण नायक यांचं अतूट नातं आहे. त्यांच्या नावाशी कायम हे जोडलेलं राहणार. नाट्य क्षेत्रातील कितीतरी पिढ्या त्यांनी घडविल्या. ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ने अधिराज्य केलं. रामकृष्ण नायक यांच्यामुळे नाट्यसंस्थेचं एक विस्तारित कुटुंब झालं. पन्नासच्या दशकात मडगावहून मुंबईला उपजीविकेसाठी आलेल्या रामकृष्ण काकांची पावलं आपोआप मुंबईत आपल्या माणसांच्या सहवासाच्या ओढीनं ‘दि गोवा’कडे वळली. कला विभागाची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली ती मोठ्या विश्वासाने. कोणत्याही आर्थिक लाभाचा विचार न करता समर्पित वृत्तीनं त्यांनी ही जबाबदारी अनेक वर्षे पार पाडली. काही अवधीतच ‘दि गोवा’ने नाट्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. ज्या काळात मराठी प्रेक्षक संगीत रंगभूमीपासून दूर होऊ लागला होता त्या काळात रामकृष्ण काकांनी रंगभूमीला एकापेक्षा एक दर्जेदार संगीत नाटकं दिली.
रामकृष्ण काकांची ओळख नाट्यक्षेत्रामुळे झाली; पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही महत्त्वाचे पैलू गोव्यात आल्यावर समजले. एका चकचकीत भासमान जगातून समाजातील जळजळीत वास्तव दाखवण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो ‘स्नेहमंदिर’च्या माध्यमातून. वलयांकित जगातील त्या ओळखीच्या चेहºयापेक्षा सामाजिक जीवनातील हा आधार देणारा चेहरा अधिक जवळचा वाटला. या टप्प्यावर बघायला मिळालेले रामकृष्ण काका हे वेगळेच वाटले. काळाची गरज ओळखून त्यांनी उर्वरित आयुष्य ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित केले. परत इथेही त्यांच्यामधील शिस्त बघायला मिळाली. संस्था उभी करावी ती रामकृष्ण काकांनीच. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांनी अतिशय बारकाईनं केलेला विचार आणि तो कृतीत येण्यासाठी त्यांचा असलेला अट्टहास हेच त्यांच्या संस्था बांधणीमागील यशाचं सूत्र आहे.
आजही त्यांच्या दिनक्रमात किंचितही बदल झालेला नाही. प्रत्येक गोष्ट घड्याळाच्या काट्यांवर सुरू असते. त्यांच्याकडे बघून तुम्ही घड्याळाची वेळ पक्की करू शकता इतका वक्तशीरपणा आज नव्वदीच्या वयातही ते पाळतात.अतिशय निरपेक्ष भावनेनं ते आपलं काम करत राहतात. त्यांची क्रियाशीलता त्यांच्यातील उत्साह आम्हा सर्वांना कायम ऊर्जा देणारा वाटतो.


 

Web Title: Ramakrishna Kaka is a dedicated life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा