आजचा अग्रलेख: भरकटलेले भाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 06:37 AM2021-12-20T06:37:51+5:302021-12-20T06:38:37+5:30

जीवनमरणाच्या लढाईत असे भरकटलेले भाई हे अस्तनीतील निखाऱ्यांपेक्षा कमी नाहीत.

ramdas kadam political journey in shiv sena and the current controversy | आजचा अग्रलेख: भरकटलेले भाई

आजचा अग्रलेख: भरकटलेले भाई

Next

राजकारणाचा एक साधा, सोपा नियम आहे की, एकाचवेळी दहा शत्रू निर्माण करून त्यांना अंगावर घेऊ नये. मात्र, खेडचे भाई अर्थात रामदास कदम यांच्या पक्षांतर्गत राजकीय शत्रूंची यादी तयार केली तर ती बरीच मोठी होईल. पोटावर पँट, पांढरा हाफ शर्ट, कपाळावर ठळक लाल टिळा, सफेद दाढी आणि विरोधकांना अंगावर घेण्याची खुमखुमी हे भाईंचे वैशिष्ट्य. रामदास कदम हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक शिवसेनेचे शिवसैनिक. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिवसेनेतील अनेक आक्रमक चेहरे लुप्त झाले. नारायण राणे यांनी २००५ साली बंड केले नसते तर कदाचित कदम हेही आतापर्यंत इतिहासजमा झाले असते; परंतु राणे यांच्यासारखा अत्यंत आक्रमक नेता विरोधात उभा राहिल्यावर सुभाष देसाईंसारखा नेमस्त नेता त्यांच्यासमोर उभा करून चालणार नाही हे उद्धव यांच्या लक्षात आल्याने कदम यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली. त्या काळात ‘कोंबडी चोर’च्या आरोपाचा तोंडपट्टा भाईंनी चालवला म्हणून त्यांना भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर मंत्रिपद दिले गेले. मुलास आमदारकी मिळाली. कदम यांना शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्रीपद दिले होते. नंतर पर्यावरण मंत्री केले (सध्या हे खाते आदित्य ठाकरे स्वत: सांभाळतात), विरोधी पक्षनेतेपद दिले होते. 

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनंत गिते यांच्यावर तोंडसुख घेऊनही ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठविले. ज्या पक्षाने कदम यांना इतके सारे काही दिले त्या पक्षावर त्यांनी टीका केली. एकेकाळी बाळासाहेब यांचे सहकारी मनोहर जोशी, लीलाधर डाके, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे आदी होते. उद्धव यांचा राजकारणात उदय झाल्यानंतर वयाची ६५ ते ७० वर्षे पूर्ण झालेल्या शिवसेनेतील नेत्यांनी स्वत:हून राजकारणातून दूर व्हावे, अशी भूमिका खुद्द बाळासाहेबांनी घेतली होती. उद्धव यांच्यासोबत असलेले मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, अनिल परब, डॉ. नीलम गोऱ्हे वगैरे मंडळी ही त्यांच्या विचारांना व कार्यशैलीला अनुकूल  आहेत. पक्षप्रमुख या नात्याने आपल्याला हवी ती टीम सोबत ठेवण्याचा उद्धव यांना पूर्ण अधिकार आहे. भविष्यात आदित्य ठाकरे जेव्हा शिवसेनेची सूत्रे हाती घेतील तेव्हा वरुण सरदेसाई वगैरे मंडळी ही नार्वेकर-राऊत यांची जागा आपसूक घेणार हे उघड आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, कदम यांची सत्तेची भूक संपली नसल्याने त्यांनी हे आकांडतांडव केले. अनिल परब यांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. याबाबतचा तपशील कदम यांनी पुरवल्यासंबंधीची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. परब यांच्याबाबत कदम यांनी व्यक्त केलेली आकसपूर्ण विधाने व परब यांनी धोरणीपणे कदम यांच्या आरोपाबाबत बाळगलेले मौन पाहता छत्रपतींची शपथ घेऊन कदम यांनी आपण सोमय्या यांना कागदपत्रे पुरविली नसल्याचा दावा केला असला तरी तो तकलादू असल्याचेच वाटते. 

आपला पुत्र शिवसेनेचा आमदार असतानाही कदम यांनी घेतलेली टोकाची भूमिका पाहता ते स्वप्रेमात आकंठ बुडालेले असून, दोन पुत्रांची व स्वत:ची राजकीय व्यवस्था लावण्याकरिता धडपडत असल्याचे स्पष्ट जाणवते. सूर्यकांत दळवी यांच्याशी कदम यांचा जुना दावा आहे. औरंगाबादचे पालकमंत्री असताना कदम यांचे चंद्रकांत खैरे यांच्याशीही खटके उडाले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला मंत्री न करताना सुभाष देसाई यांना संधी दिल्याने भाईंचा पापड मोडला. मिलिंद नार्वेकर, अनिल परब अशा अनेकांशी त्यांचा संघर्ष झाला आहे. या संपूर्ण वादात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केलेले विधान दखलपात्र आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये केवळ शिवसेनेचा वापर केला जात असल्याची त्यांची खंत आहे. राजकारण असो की जीवनाचे कुठलेही अंग; एकजण दुसऱ्याचा आपल्या स्वार्थाकरिता वापर करून घेण्याचा प्रयत्न करीतच असतो. महाविकास आघाडीचे सरकार भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता स्थापन झाले आहे. भाजप पुन्हा सत्तेत आला असता तर कदाचित शिवसेनेला पोटाशी घेऊन अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला असता, अशी भीती शिवसेनेला वाटत होती. अपरिहार्यतेतून निर्माण होणाऱ्या सरकारमध्ये तडजोडी कराव्याच लागतात हे दीर्घकाळ राजकारणात वावरणाऱ्या नेत्यांना वेगळे सांगायला नको. जीवनमरणाच्या लढाईत असे भरकटलेले भाई हे अस्तनीतील निखाऱ्यांपेक्षा कमी नाहीत.
 

Web Title: ramdas kadam political journey in shiv sena and the current controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.