राणेंच्या सहनशीलतेची परीक्षा
By अतुल कुलकर्णी | Published: January 22, 2018 12:27 AM2018-01-22T00:27:17+5:302018-01-22T00:28:10+5:30
नारायण राणे यांनी शिवसेना मार्गे भाजपा व्हाया काँग्रेस असा प्रवास करत स्वाभिमानी पक्ष स्थापन करत भाजपाला पाठिंबा दिला. इच्छा व्यक्त करताच राहुल गांधींनी दिलेली आमदारकीही राणे यांनी मंत्रिपद मिळणार म्हणून सोडून दिली.
नारायण राणे यांनी शिवसेना मार्गे भाजपा व्हाया काँग्रेस असा प्रवास करत स्वाभिमानी पक्ष स्थापन करत भाजपाला पाठिंबा दिला. इच्छा व्यक्त करताच राहुल गांधींनी दिलेली आमदारकीही राणे यांनी मंत्रिपद मिळणार म्हणून सोडून दिली. स्वत:च्या स्वाभिमानी पक्षाचा पाठिंबा त्यांनी भाजपाला देऊ केला. एकही आमदार नसणा-या पक्षाने सरकारला पाठिंबा द्यायचा आणि सरकारनेही तो राजीखुषीने घ्यायचा, असे देशातील हे एकमेव उदाहरण असेल. २१ सप्टेंबर रोजी राणे यांनी राजीनामा दिला. २१ जानेवारीला त्याला चार महिने पूर्ण होतील. त्यानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार, अशा बातम्या सुरु झाल्या. आता ते मंत्री होणार, या बातम्यांवरही कुणी विश्वास ठेवेनासे झाले आहे.
आपल्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असे निर्वाणीचे बोल परवा राणेंनी ऐकवले. राणेंसारखा मोठा नेता सत्ताधाºयांना हवाही वाटतो आणि नकोसाही होतोय असे का याचे उत्तर मिळत नसल्याने त्यांचे समर्थकही अस्वस्थ आहेत. या सगळ्या नाट्यात पडद्यामागे अनेकांनी आपापल्या भूमिका इतक्या चोख बजावल्या की मुख्यमंत्र्यांनी राणे यांना शब्द देऊनही तो पाळणे त्यांच्यासाठीच अडचणीचे बनले. राणे यांचा मान राखून त्यांना मंत्रिपद दिले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले खरे, पण चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याकडचे महसूल किंवा बांधकाम खाते जाईल, अशी भीती वाटू लागली. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दुसरा तुल्यबळ मराठा नेता पक्षात आला व त्याचे महत्त्व वाढले तर आपले महत्त्व कमी होईल, या विचाराने ग्रासले. दुसरे मराठा नेते विनोद तावडेंना राणेंमुळे अडचण होईल, असे वाटू लागले. परिणामी राणेंचा मंत्रीमंडळ प्रवेश विक्रम आणि वेताळाची गोष्ट बनला आहे. खासगीत असेही सांगितले जाते की, राणे जर शालेय शिक्षण अथवा तत्सम विभाग घेण्यास तयार असतील तर तुमचा मंत्रिमंडळ प्रवेश चार दिवसात करून आणतो असा प्रस्ताव त्यांना चंद्रकांत पाटील यांनीच दिला होता; मात्र याबद्दल मी मुख्यमंत्र्यांशीच बोलेन असे सांगून राणे यांनी ती चर्चा थांबवली. पण ती त्यांच्यासाठीच अडचणीची ठरली आहे.
प्रचंड क्षमता आणि लढण्याची टोकाची इच्छाशक्ती असणा-या राणेंची अवस्था सोनेरी पिंज-यातील वाघासारखी झालीय. जोपर्यंत मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत काँग्रेसमधील आमदार त्यांच्यासोबत येणार नाहीत. काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले की विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी दावा सांगण्यासाठी व तेथे जयंत पाटील यांना बसविण्याची तयारी राष्ट्रवादीने करून ठेवलीच आहे. दोन महिन्यापासून ग्रामीण भागात आक्रमक होत चाललेली राष्ट्रवादी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले तर आणखी बळकट होईल. ते होऊ नये असे मुख्यमंत्र्यांना वाटते. याचा अर्थ एकाच वेळी मुख्यमंत्री समाधानी झाले पाहिजेत, चंद्रकांत पाटील नाराज होऊ नयेत, राणेंना हवे ते मिळावे, राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेते पद मिळू नये आणि तरीही काँग्रेस फुटावी असे घडण्याची प्रतीक्षा केली जात आहे. या सगळ्या गोष्टी जशा एकाच वेळी शक्य नाहीत तसे राणेंचे मंत्रिपदही शक्य नाही, असे आता खासगीत चंद्रकांत पाटील, दानवे समर्थक सांगत आहेत. आधी गडकरींच्या मार्फत केलेले प्रयत्न यशस्वी झाले नाहीत म्हणून फडणवीसांच्या वतीने राणे यांनी सुरू केलेले प्रयत्न त्यांची सहनशीलता वाढविणारे आहेत, हे नक्की...!