विशेष लेख: विषकन्यांच्या जाळ्यात का, कसे अडकतात राजकीय नेते?
By संदीप प्रधान | Published: January 14, 2021 09:00 AM2021-01-14T09:00:38+5:302021-01-14T09:05:56+5:30
एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर त्याचे परिणाम दीर्घकाल टिकत नाहीत. ईडीच्या नोटिसा अनेक राजकीय नेत्यांना येत असून ते तेथे पायधूळ झाडत आहेत.
संदीप प्रधान
एका पक्षाच्या विदर्भातील प्रदेशाध्यक्षांचे पद त्यांच्या अनैतिक संबंधांमुळे अडचणीत आले होते. त्यांची गच्छंती अटळ होती. त्यावेळी पक्षाच्या कार्यालयातील एका बुजुर्ग पूर्णवेळ पदाधिकाऱ्याने त्यांना विचारले की, तुमच्याकडे पैसे असताना शरीरसंबंध ठेवण्याकरिता तुम्ही कुणालाही बोलवू शकला असता. परंतु पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा तुमच्याकडे कामकाजाकरिता येणाऱ्या महिलांचा गैरफायदा घेऊन बदनामी का ओढवून घेतलीत? यावर पायउतार होत असलेल्या त्या नेत्याने दिलेले उत्तर एकुणच राजकारणातील नेत्यांच्या मानसिकतेचे प्रातिनिधीक उदाहरण आहे. तो नेता म्हणाला की, माझ्याकडील पैशातून मी भाडोत्री शरीरसुख नक्कीच मिळवू शकलो असतो. परंतु माझ्याकडे पदाच्या, कामाच्या गरजेतून येणाऱ्या स्त्रीला मी काहीतरी देणार आहे व त्या बदल्यात तिच्याकडून शरीरसुख उपभोगणार आहे, यामधील मी देणारा व ती घेणारी असल्याचा जो आनंद, सत्तेची मस्ती आहे ती पैसे फेकून शरीरसुख उपभोगण्यात नाही.
महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनी बलात्काराचे आरोप केले आहेत. आपल्याला चित्रपटसृष्टीत संधी देण्याचे आमिष दाखवून आपल्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले, असे तिचे म्हणणे आहे. ही आरोप करणारी महिला ही मुंडे यांच्या दुसऱ्या कथित पत्नीची बहीण आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मुंडे यांच्यासारख्या तरुण नेत्याचे राजकीय जीवन संकटात आले आहे. यापूर्वी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना धनंजय यांचे काका गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अनैतिक संबंधांचे आरोप झाले होते. समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंडे यांचे तमाशा कलावंतासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. गोपीनाथ मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली गेली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मुंडे, प्यार किया तो डरना क्या’, असे म्हणत मुंडे यांना या संकटातून सावरले होते. हा वाद घडला तेव्हा मुंडे यांच्या कन्या पंकजा, प्रीतम वगैरे लहान होत्या. मात्र आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे आपण आपल्या मुलींच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो. आपले कौटुंबीक जीवन वावटळीत विस्कळीत झाले, अशी कबुली मुंडे यांनी दिली होती.
धनंजय हे त्यावेळी लहान असले तरी कदाचित समजण्याच्या वयाचे असतील. आपल्या काकाने काय भोगले ते त्यांनी पाहिले असेल. कदाचित वयात आल्यावर त्या कथा ऐकल्या असतील. मात्र त्यातून त्यांनी बोध घेतल्याचे दिसत नाही. राज्यातील काही भागातील काही जाती-जमातींमध्ये एकापेक्षा अधिक स्त्रीयांशी शारीरिक संबंध ठेवण्यात गैर मानले जात नाही. धनंजय यांच्या शारीरिक संबंधांची त्यांच्या पहिल्या पत्नीला माहिती होती व तिने हे वास्तव स्वीकारले होते. मात्र शहरातील मीडियामधील अनेक वरिष्ठ मंडळी ही शहरी भागातील आहेत. त्यांच्या नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना या पांढरपेशा आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील या रांगड्या नेत्यांच्या अंगवस्त्राबाबत त्यांच्या कुटुंबातून, मतदारांकडून कुरकुर केली जात नसली तरी शहरी तोंडवळा असलेला मीडिया त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतोच.
एका पक्षातील प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री यांच्यातून विस्तव जात नव्हता. विरोधी पक्षनेत्यांपेक्षा हा प्रदेशाध्यक्षच रोज आपल्या सरकारवर प्रहार करीत होता. एक दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये एक महिला दाखल झाली व दिवसभरात तिने मीडियाच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींना भेटून या प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्या प्रदेशाध्यक्षांच्या सुदैवाने त्या महिलेने ज्या तारखांना या नेत्याने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला त्या तारखांना दिल्लीत पक्षाची बैठक होती व त्या बैठकीला हजर राहिल्याची विमानाची तिकीटे व बोर्डिंग पास प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सादर करुन हे आरोप फेटाळले. राजकीय स्पर्धेतून ते आरोप झाले होते. मात्र असे आरोप केले तर ते या प्रदेशाध्यक्षांना चिकटतील हे मुख्यमंत्र्यांच्या गटातील मंडळींना ठावूक असल्याने त्यांनी हे कुभांड रचले. मात्र ते फसले. त्याचवेळी केंद्रातील एका मंत्र्यांवरही एका महिलेने असेच आरोप केले. केंद्रातील हा मंत्री राज्यात मुख्यमंत्री म्हणून येऊन आपला प्रतिस्पर्धी ठरु शकतो, या भीतीतून त्यांच्यावरही आरोप केले गेले.
धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्यावर कौटुंबीक नातेसंबंधातून असेच गंभीर आरोप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांत राजकारणातील पैशाचे प्राबल्य बरेच वाढले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्याकडील पैसा हा एकतर बांधकाम क्षेत्रात गुंतवला आहे किंवा चित्रपटसृष्टीत लावला आहे. बॉलिवुडच्या पार्ट्या, तेथील चमकदार वातावरण याचे कमालीचे आकर्षण राजकारणातील तरुण पिढीला आहे. अनेक तरुण राजकीय नेते हे विदेशात किंवा देशातील नामांकित विद्यापीठात शिकलेले असल्याने इंग्रजीची जी भीती मागील पिढ्यांत होती ती नव्या पिढीत नाही. त्यामुळे चित्रपटसृष्टीत करियर करु पाहणाऱ्या तरुणी या नेत्यांच्या जाळ्यात सहज फसतात किंवा त्यांना फसवतात. करियर, पैसा, ग्लॅमर याची इर्षा असलेल्या या तरुणींकरिता सर्वच पुरुष हे शिडीसारखे असतात तर, राजकीय नेत्यांकरिता त्या तरुणी एक नवं सावज असतं. जोपर्यंत तो राजकीय नेता संधी, पैसा पुरवतोय तोपर्यंत शरीरसंबंध हे परस्पर सहमतीने असतात. ज्या दिवशी त्या नेत्याच्या जाळ्यात नवे सावजं येते व त्या अगोदरच्या तरुणीच्या अपेक्षा पूर्ण होणे थांबते तेव्हा आरोपांचा सिलसिला सुरु होतो. राजकारणात पदांच्या महत्वाकांक्षेने पछाडलेल्या महिलांच्या बाबतही हेच घडते. अर्थात यामध्ये दोघेही दोषी आहेत. सहा-सात वर्षे कुणीही कुणाला लग्नाचे आमिष दाखवून मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवू शकत नाही.
एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर त्याचे परिणाम दीर्घकाल टिकत नाहीत. ईडीच्या नोटिसा अनेक राजकीय नेत्यांना येत असून ते तेथे पायधूळ झाडत आहेत. बहुतांश नेत्यांनी आर्थिक सल्लागारांच्या सल्ल्याने हे व्यवहार केल्याने चौकशीतून फारसे काही हाती लागत नाही. समजा एखाद्या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध झाले तर ईडी ती मालमत्ता सील करते. नेत्यांच्या नावावर इतकी नामी-बेनामी मालमत्ता असते की, एखादा फ्लॅट किंवा बंगला सील झाल्याने काही बिघडत नाही. मात्र महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप जर चिकटला तर त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकतात. मुंडे यांच्यावर झाले तसे आरोप जर सर्वसामान्य माणसावर झाले असते तर एव्हाना पोलिसांनी त्याला अटक केली असती. बलात्काराचा कायदा निर्भया प्रकरणानंतर कडक केला असून राज्य सरकारच्या प्रस्तावित ‘शक्ती’ कायद्यात तर बलात्काराच्या गुन्ह्याकरिता फाशीची शिक्षा सुचवली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावरील कारवाईकरिता सामान्य जनतेचा रेटा वाढू शकतो. सरकारचाच एक तरुण मंत्री बलात्काराच्या आरोपात सापडल्याने ‘शक्ती’ कायदा करुन त्याचे श्रेय घेण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे. एकेकाळी प्रतिस्पर्ध्याला संपवण्याकरिता विषकन्या पाठवण्याची पद्धत होती. विषकन्या त्या पुरुषाला मोहात पाडून घायाळ करायच्या व बेसावध क्षणी त्यांच्याकडील कुपीतील विष दूधात किंवा मद्यात टाकून अंत करीत. राजकारण, बॉलिवुडमधील या विषकन्यांपासून वेळीच सावध न झाल्यास अंत अटळ आहे.