रतन टाटा यांच्यासह अनेक दिग्गजांनी घेतलंय 'बिशप कॉटन स्कूल'मधून शिक्षण; जाणून घ्या, याबाबत सविस्तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 03:03 PM2022-08-21T15:03:07+5:302022-08-21T15:03:40+5:30
School Education : बिशप कॉटन स्कूल केवळ शिक्षणासाठीच नाही तर इतर सुविधांसाठी देखील ओळखले जाते.
नवी दिल्ली : शिमला येथील बिशप कॉटन स्कूल हे आशियातील सर्वात जुने बॉईज बोर्डिंग स्कूल आहे. या स्कूलची स्थापना बिशप जॉर्ज एडवर्ड लिंच कॉटन यांनी 28 जुलै 1859 रोजी केली होती. बिशप कॉटन स्कूल केवळ शिक्षणासाठीच नाही तर इतर सुविधांसाठी देखील ओळखले जाते. रस्किन बाँड, रतन टाटा, माँटेक सिंग अहलुवालिया, कुमार गौरव, अंगद बेदी आणि जीव मिल्खा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी येथून शिक्षण घेतले आहे.
स्कूलचा परिसर शिमल्यापासून जवळपास 4 किमी अंतरावर 35 एकरांवर आहे. याठिकाणी फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, हॉकी, टेबल टेनिस, एअर रायफल शूटिंग, जिम्नॅस्टिक्स, स्क्वॅश आणि बॉक्सिंगसह इतर खेळ खेळले जातात. विद्यार्थी इंटर हाऊस, इंटर स्कूल आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही सहभागी होतात. तसेच, म्युझिक, ड्रामा, पब्लिक स्पीकिंग आणि डिबेट यांसारख्या अॅक्टिव्हिटी सुद्धा होतात.
बिशप कॉटन स्कूलचे शैक्षणिक सत्र 1 मार्चपासून सुरू होते आणि 30 नोव्हेंबरला संपते. इयत्ता 3 वी ते इयत्ता 11वी पर्यंत नवीन प्रवेश घेतले जातात. प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय 7 वर्षांपेक्षा कमी नसावे. पुढील सत्राची प्रवेश परीक्षा सप्टेंबरमध्ये शिमला, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेत इंग्रजी, हिंदी, गणित आणि सामान्य जागरूकता या विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी 40 मिनिटांचा वेळ दिला जातो. इन्टरन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू प्रक्रियेतून जावे लागेल.
किती आहे फी?
शिमला येथील बिशप कॉटन स्कूलची फी वार्षिक 6.1 लाख ते 6.5 लाख रुपये आहे. याशिवाय 65000 रुपये अॅडमिशन फीस आणि 3 लाख रुपये रिफंडेबल कॉशन मनी सु्द्धा जमा करावे लागतात. एडमिशनसंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही bishopcottonshimla.com या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता किंवा तुम्ही 078077 36880 वर देखील संपर्क साधू शकता.