निरोप देताना डोळे भरून येतात, कारण…
By Rajendra Darda | Published: October 11, 2024 08:02 AM2024-10-11T08:02:11+5:302024-10-11T08:03:21+5:30
काही वडीलधारी माणसे आपल्यात ‘आहेत’ हा दिलासाही आधार देणारा असतो. रतन टाटा यांच्या निर्वाणाने आणखी एक दिलासा आज आपण गमावला आहे.
राजेंद्र दर्डा, माजी उद्योग मंत्री, एडिटर इन चीफ, लोकमत वृत्तसमूह
ती बातमी कधीतरी येणार हे माहितीच होते, तरी ती आली, तेव्हा कोट्यवधी भारतीयांचे डोळे पाणावल्यावाचून राहिले नाहीत. जगद्विख्यात उद्योगपती रतन टाटा यांचे जाणे हे केवळ एका व्यक्तीचे कालवश होणे नव्हे, ती एका पर्वाची समाप्ती आहे! उत्तुंग कर्तृत्व, त्याहून उत्तुंग-अढळ अशी मूल्यनिष्ठा आणि अतीव सुसंस्कृत, विनम्र शालीनता यांचे असे अजोड मिश्रण असलेली माणसे जगाच्या इतिहासात दुर्मीळच ! पारदर्शक सत्यनिष्ठा आणि अत्त्युच्च गुणवत्तेच्या आग्रहापासून तसूभरही न ढळण्याचा निग्रह त्यांनी आयुष्यभर जपला.
काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चारित्र्यशीलतेचे आणि मूल्यनिष्ठेचे अत्युच्च एकक असलेले काही मापदंड असतात. जुन्या बंद खिडक्या उघडून नव्या, मुक्त अर्थव्यवस्थेत पाऊल ठेवताना भांबावलेल्या भारतीय समाजासमोर उभ्या राहिलेल्या तीर्थरूप मापदंडाचे नाव होते - रतन टाटा. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य भारतीयांचे डोळे पाणावले. तो शोक केवळ एका धनाढ्य उद्योगपतीच्या वियोगाचा नाही, तर आपल्या जगण्याला आधार/ आदर्श देणारी एक वडीलधारी व्यक्ती गमावल्याचा आहे.
रतन टाटा यांच्या सहवासाची संधी मिळाली, हे माझे व्यक्तिगत भाग्य! त्यांची-माझी पहिली भेट झाली पंचवीस वर्षांपूर्वी! ऑक्टोबर १९९९ मध्ये मी विलासराव देशमुख मंत्रिमंडळात ऊर्जा राज्यमंत्री झालो. मला मंत्रिपद मिळाल्यानंतर महिनाभरातील प्रसंग असेल. माझे तत्कालीन खासगी सचिव रामकृष्ण तेरकर यांना दुपारी ३ वाजेच्या सुमारास बॉम्बे हाउसमधून फोन आला. निरोप मिळाला, की रतन टाटा मंत्रिमहोदयांना भेटायला येऊ इच्छितात. तेरकरांना वाटले, काहीतरी गडबड आहे. इतका मोठा उद्योगपती एका राज्यमंत्र्याच्या भेटीला स्वतः का येईल? काहीतरी गोंधळ असेल म्हणून तेरकरांनी ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. अर्ध्या तासात परत फोन आला. तेव्हा मीच त्यांच्या कार्यालयाला निरोप दिला की, मी स्वत:च त्यांना भेटायला येतो. कुठे यायचे ते सांगा. पलीकडून मला सांगितले गेले, नाही सर.. उद्या सकाळी तेच तुम्हाला भेटायला तुमच्या बंगल्यावर येतील.
तेव्हा मंत्रालयासमोरील ब /४ बंगल्यात मी राहात असे. सकाळी बरोबर ९ च्या ठोक्याला मर्सिडीज कारमधून रतन टाटा उतरले.. प्रत्यक्ष त्यांना समोर पाहाताना मी अक्षरश: भारावून गेलो. चहापान सुरू असताना विनम्रतेने त्यांना म्हणालो, ‘सर आपण का त्रास घेतलात? मीच आपल्याकडे येणे अधिक उचित होते.’
हलके हसत रतन टाटा म्हणाले, मागच्या सरकारच्या काळातली एक फाइल तुमच्याकडे रिव्ह्यूसाठी आली होती. पूर्वीच्या मंत्र्यांची काही वेगळी अपेक्षा होती. ती टाटा समूहाच्या तत्त्वात बसणारी नव्हती. तुम्ही मात्र ऊर्जा राज्यमंत्री म्हणून तो विषय समजून घेऊन तातडीने न्याय्य निपटारा केलात. अशा तरुण प्रामाणिक व्यक्तीला स्वत: जाऊन भेटावे असे मला वाटले, म्हणून मी आलो आहे. बाकी माझे काही काम नाही!’ - मला काय बोलावे ते सुचेना.
त्यानंतर वेगवेगळ्या निमित्ताने भेटी होत गेल्या. एका भेटीत मी त्यांना सुचवले, आपण मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची एकदा भेट घ्यावी, त्यांना भेटून आपल्याला आनंदच होईल. काही दिवसातच तो योग जुळून आला. रतन टाटा यांनी ताज हॉटेलमधल्या त्यांच्या व्यक्तिगत कक्षात विलासराव आणि मी - आम्हा दोघांना भोजनाचे निमंत्रण दिले. भेटीत प्रदीर्घ चर्चा झाली. बऱ्याच वेळाने आम्ही निघालो. निरोप घेताना त्यांनी आम्हा दोघांना टायटनचे लिमिटेड एडिशन घड्याळ आठवण म्हणून दिले. त्यांची ती आठवण आजही माझ्या संग्रही आहे.
२००२ च्या नोव्हेंबरची गोष्ट. माझा मोठा मुलगा ऋषीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मी बॉम्बे हाउसमध्ये गेलो होतो. अत्यंत अगत्याने स्वागत झाले. रतन टाटांनी लग्नाची तारीख विचारली. मी म्हटले, २० जानेवारी २००३. ते जागेवरून उठले. स्वत: त्यांच्या कॉम्प्युटरशी गेले आणि आपले वेळापत्रक तपासत क्षणाचा विलंब न लावता म्हणाले, ‘आय विल अटेंड धीस वेडिंग’!
मी हलकेच म्हणालो, ‘सर, शादी मुंबई में नहीं, औरंगाबाद में हैं!’ ते एक मिनिट माझ्याकडे पाहत राहिले. परत त्यांनी कॉम्प्युटरमध्ये पाहिले आणि म्हणाले, ‘बाहर शादीयोंमे मैं जाता नहीं, लेकिन आपके यहाँ जरुर आऊंगा!’ - त्यांनी शब्द पाळला आणि २० जानेवारी २००३ ला ऋषीच्या लग्नासाठी ते औरंगाबादला आले!
२००७. मी आमदार होतो. मंत्रिमंडळात नव्हतो. रतन टाटांना भेटायला गेलो. अगत्यपूर्वक स्वागत झाले. मी म्हणालो, पिछली बार तो आप मेरे बडे बेटे ऋषी की शादी में आये थे. अब उसके छोटे भाई करण की शादी है. आपको आना है..’ त्यांनी मिश्कील हसून विचारले, ‘फिर वहीं?’
मी म्हटले, हा! त्यांनी होकार दिल्यावर मी सहज म्हटले, सर, सध्या मी मंत्रिमंडळात नाही. त्यावर ते म्हणाले, ‘यू आर मिनिस्टर ऑर नो मिनिस्टर, डझन्ट मेक एनी डिफरन्स टू मी. इट इज अ लॉस टू यूअर पार्टी!’!
- २ डिसेंबर २००७. रतन टाटा स्वत: विमान चालवत करणच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहिले.
२००९ साली मी उद्योगमंत्री असताना राज्याच्या औद्योगिक विकासाच्या अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना भेटत असे. त्या भेटींमध्ये स्नेह अधिक घट्ट झाला. त्याचदरम्यान ‘लोकमत’तर्फे औरंगाबादच्या स्थानिक उद्योजकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सगळ्या स्थानिक उद्योजकांची इच्छा होती की रतन टाटा यांच्या हस्ते पुरस्कार मिळावा. मी रतनजींना तशी विनंती केली. त्यांनी होकार दिला. हेही स्वच्छ सांगितले, की मी पुरस्कार देईन, पण भाषण करणार नाही. ठरल्या दिवशी आम्ही दोघे त्यांच्या ‘डसॉल्ट फाल्कन’ या विमानाने मुंबईहून औरंगाबादला आलो. कार्यक्रम सुरू झाला. सभागृह शिगोशीग भरलेले. वातावरणात आदर आणि उत्साह. माझ्या प्रास्ताविकात मी म्हणालो, ‘कार्यक्रमात भाषण करणार नाही, अशा अटीवर रतन टाटा साहेब इथे आले आहेत. त्यांना मी शब्द दिला आहे, त्यामुळे आता इलाज नाही.. पण त्यांनी काही बोलावे अशी तुम्हा सगळ्यांची इच्छा असेलच ना...?’ आनंदाने उसळलेले अख्खे सभागृह ‘हो हो..’ अशा आर्जवाने भरून गेले. शेवटी रतन टाटा उभे राहिले आणि एक अत्यंत संस्मरणीय अनुभव सगळ्यांना मिळाला.
ते म्हणाले, ‘एखादा उद्योग समूह ज्या भूभागातून आपले मनुष्यबळ मिळवतो, जेथील नैसर्गिक साधने आपल्या उत्पादनासाठी वापरतो, त्या प्रांताशी आणि तेथील माणसांच्या अडचणी-आकांक्षा-स्वप्नांशी त्या उद्योगाची बांधिलकी असली पाहिजे.’ - या वाक्यानंतर सभागृहात झालेला टाळ्यांचा कडकडाट आजही मला ऐकू येतो !
आपले छोटेखानी मनोगत संपवताना ते म्हणाले, ‘माझे दर्डा परिवाराशी वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आहेत. जवाहरलाल दर्डा यांना माझे वडील ओळखत होते. मी शालेय विद्यार्थी असताना वडिलांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली होती. माझे वडील म्हणाले होते, हे चांगले, मैत्री करण्यायोग्य व्यक्ती आहेत. त्या सदगृहस्थांची दोन्ही मुले विजय आणि राजेंद्र या दोघांबरोबर आज मी या कार्यक्रमात आहे. माझ्या वडिलांचाच आशीर्वाद मला मिळाला !’
- यावर काय बोलावे मला सुचेना.
आजही माझी अवस्था वेगळी नाही. रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना गळ्याशी दाटणाऱ्या आवंढ्याचा अर्थ उलगडावा म्हटले, तर शब्द सापडत नाहीत.
निसर्गनियमाने वय वाढले, कार्यक्षमता मंदावली; तरी काही माणसे ‘आहेत’ हा दिलासाही आधार देणारा असतो. रतन टाटा यांच्या निर्वाणाने आणखी एक दिलासा आज आपण गमावला आहे. सर्व अर्थाने वडीलधारेपणाचा हक्क कमावलेल्या या उत्तुंग माणसाला निरोप देताना प्रत्येक भारतीयाच्या गळ्याशी दाटणारा हुंदका हा त्या पोरकेपणाचा आहे!
rjd@lokmat.com