सुधीरभौंची (मस्त मस्त) ब्रँड अॅम्बॅसिडर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 12:42 PM2018-09-27T12:42:15+5:302018-09-27T12:45:11+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून रवीना टंडन यांची सुधीरभौंनी नियुक्ती केली. भर दुपारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरिता खुद्द सुधीरभौ दोन-अडीच तासाच्या विलंबाने पोहोचले.
- दे. दे. ठोसेकर
राज्य सरकारचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये लवकरच एका वाघाला हॉटसिटवर बसवण्याचा आग्रह राज्याचे वनमंत्री सुधीरभौ मुनगंटीवार यांनी धरला आहे. (नितीनभौंनंतर जर कुठलीही घोषणा कोटी रुपयांच्या खाली न करणारे ‘कोट्यधीश’ पुढारी कुणी असतील तर सुधीरभौच) प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्यासोबत त्यांचा पाळीव वाघ सेटवर आणून त्यासोबत बच्चन यांनी सेल्फी काढण्याची कल्पना पुढे आली होती. मात्र आमटेंच्या वाघाला स्टुडिओपर्यंत आणणे हे संजय राऊत यांना कपाळावर आठी न घालता बाईट देण्यास भाग पाडण्याइतके कठीण असल्याचे लक्षात आल्याने ही कल्पना प्रत्यक्षात उतरली नाही. व्याघ्रदूत बच्चन आपल्या सेटवर मांजरही दिसणार नाही, याची सध्या खबरदारी घेत आहेत. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून रवीना टंडन यांची सुधीरभौंनी नियुक्ती केली. भर दुपारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरिता खुद्द सुधीरभौ दोन-अडीच तासाच्या विलंबाने पोहोचले. खासदार गोपाळ शेट्टी दोनवेळा कार्यक्रमस्थळी येऊन गेले. त्यामुळे सुधीरभौंच्या उपस्थितीत त्यांचा पारा चढला होता. व्यासपीठावर येण्याकरिता अधिकाºयांनी त्यांच्या नाकदुºया काढल्या. चित्रपटातील हिरॉईन हिरोकरिताही दीर्घकाळ थांबत नाहीत, असे ऐकून होतो. मात्र रवीना टंडन (टणटण न करता) एवढ्या वेळ थांबल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असा टोमणा शेट्टी यांनी सुधीरभौंना मारला. (अर्थात सुधीरभौ त्यावेळी रवीना यांच्याशी गुजगोष्टी करीत असल्यानं ते शेट्टीचं स्वगत ठरलं, असो) आतापर्यंत आपल्याला ‘टी’ फॉर टायगर माहित होते. यापुढे ‘टी’ फॉर टंडन असेल, असे उदगार सुधीरभौंनी काढले. (सुधीरभौ यांचे हे विधान वाघाचा म्हणजे पर्यायाने शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा पाणउतारा करण्याकरिता होते, अशी, चर्चा मातोश्रीपर्यंत गेली आहे) रवीना बोलायला उभी राहिली तेव्हा तिने चक्क आपल्याला ‘मुनगंटीवार’ हे आडनाव ‘उपरनिर्दिष्ट’ किंवा ‘अभ्यवेक्षण’ वगैरे कठीण शब्दांसारखे कठीण कठीण असल्याने उच्चारता येत नाही, असे जाहीर केले. आडनावात आहेच काय, असा मुद्दा उपस्थित करीत ती एकसारखी सुधीरभाऊ... सुधीरभाऊ करीत होती. (परिणामी सुधीरभौंना तिचा उल्लेख रवीना भगिनी करणे अपरिहार्य झाले) शेट्टी यांच्या चेहºयावर तेव्हा असुरी भाव दिसले. कार्यक्रमानंतर सुधीरभौंनी रवीनाला ई-बग्गीत (विजेवर चालणारी) बसवून राष्ट्रीय उद्यानाची सैर घडवली. रवीनानं ‘आशिष’ हा बिबट्याचा बछडा दत्तक घेतला. (रवीनानं ‘आशिष’ दत्तक घेतला ही वार्ता पसरताच काही खवचटांनी शेलारांना फोन करुन अभिनंदन केले म्हणे)आपल्या लहानग्या मुलांना खेळण्याकरिता बछडा दत्तक घेतल्याचं तिनं जाहीर केलं. (वित्त खात्यामार्फत काटकसरीच्या संदेशाकरिता सनी लिओनी हिला आगामी अर्थसंकल्पापूर्वी ब्रँड अॅम्बॅसिडर करण्याची कल्पना सुधीरभौंच्या मनात घोळत असल्याचे कळते)