रझासाहेब आणि मी.. जिवलग स्नेहाची कृतार्थ गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:16 AM2023-02-22T10:16:47+5:302023-02-22T10:17:04+5:30

जगद‌्विख्यात चित्रकार एस. एच. रझा यांच्या जन्मशताब्दीचा आज समारोप. त्यानिमित्ताने एका मौल्यवान स्नेहाचे रसिले चित्र रेखाटणारा हा विशेष लेख...

Raza Saheb and I.. a grateful story of deep affection | रझासाहेब आणि मी.. जिवलग स्नेहाची कृतार्थ गोष्ट

रझासाहेब आणि मी.. जिवलग स्नेहाची कृतार्थ गोष्ट

googlenewsNext

सुजाता बजाज, ख्यातनाम चित्रकार, पॅरिस

२३ जुलै २०१६. सकाळी सकाळीच बातमी आली, रझासाहेब गेले आणि मनात त्यांच्या आठवणी रुंजी घालू लागल्या.  माझा, माझ्या कुटुंबाचा त्यांच्याशी जवळपास २५ वर्षांचा स्नेह. ते माझे अतिशय जवळचे मित्र, माझ्या लग्नाचे साक्षीदार... एवढ्या मोठ्या कलाकाराचा सहवास मिळाला, त्यांना समजून घेण्याची संधी मिळाली, त्यांच्यापासून खूप काही शिकता आले, ही भाग्याची गोष्ट! 

अलीकडेच माझ्या गणपतीशी संबंधित शोसाठी  दिल्लीला पोहोचले. मनापासून वाटत होतं रझासाहेब कदाचित व्हिलचेअरवर समोर येतील, माझ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पोहोचतील... पण जणू ती रात्र काही अघटित घेऊन आली होती. त्या रात्री रझासाहेब स्वप्नात आले... भरपूर गप्पा मारल्या. स्वप्नातच त्यांनी मला माझ्या शोसाठी शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, सुजाता, मला अखेरची एकदा भेटायला ये. मी निघालो आता, फार दिवस नाहीत हाताशी!... तू जेव्हा पुढच्या वेळी दिल्लीला येशील तेव्हा मी नसेन... हे संभाषण इतके आपुलकीचे होते की, मी तत्काळ दिल्लीला गेले आणि त्यांना भेटले. जाऊन पाहते तो काय, रझासाहेब शून्यात नजर लावून हॉस्पिटलमध्ये पडून होते. त्यांना डोळेही उघडता येत नव्हते. मी त्यांच्या हाताला स्पर्श केला; पण त्यात जीव नव्हता. फक्त श्वास सुरू होता. मी त्यांचा निरोप घेऊन जड अंतःकरणाने परतले. 

रझासाहेबांचा धर्म नक्की कोणता होता? सांगता येणे कठीण! त्यांच्या स्टुडिओत एक उघडे कपाट होते. त्यात गणपतीची मूर्ती, क्रॉस, बायबल, गीता, कुराण, त्यांच्या आईचा एक फोटो, गांधीजींची आत्मकथा, भारतातून आणलेले आणि सुकून गेलेले काही मोगऱ्याचे हार... सारे एकत्र ठेवलेले असे. ते गणेशाची पूजा करायचे, दर रविवारी सकाळी चर्चमध्ये जायचे... आम्हीही अनेकदा त्यांच्यासोबत चर्चमध्ये गेलो आहोत! ते गेल्याची दुःखद बातमी आली, तेव्हा मी, माझी मुलगी हेलेना, माझे पती रूने जूल लारसन फुले घेऊन चर्चमध्ये गेलो. तेथे मेणबत्ती लावली. प्रार्थनेला हजर राहिलो... रझासाहेबांना हे नक्की आवडणार, मला माहिती होते!

१९८४ मध्ये मी माझ्या पीएच.डीच्या शेवटच्या टप्प्यात अनेक नामवंत कलाकारांच्या मुलाखती घेत होते.  एकदा जहाँगीर कलादालनात शो पाहताना कोणी तरी म्हणाले, अरे हे तर एस. एच. रझा! मी लगेच सावध झाले. माझ्या मुलाखतींच्या यादीत त्यांचेही नाव होते. त्यांच्याजवळ गेले; पण  ते इतक्या गर्दीत होते की, त्यांचे माझ्याकडे लक्षच गेले नाही. शेवटी मी त्यांच्या कुर्त्याची बाही पकडून म्हणाले, ‘रझासाहेब मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे!’- ते  पाहतच राहिले. त्यांनी मला मनापासून मुलाखत दिली. खूप गप्पा झाल्या. अचानक म्हणाले, तू आणखी काय काय करतेस? मी म्हणाले, मीही चित्रकार आहे. तसे लगेच उठून उभे राहिले आणि म्हणाले, चल, मला तुझे काम पाहायचे आहे. आता काय करावे? कारण माझी सारी चित्रे पुण्यात होती. त्यांना सांगताच ते म्हणाले, तर मग चला पुण्याला!

आम्ही ताज हॉटेलबाहेरून टॅक्सी पकडली आणि थेट पुण्याला पोहोचलो. त्यांनी माझी सारी चित्रे पाहिली आणि म्हणाले, तुला पॅरिसला यायचंय. तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे! रझासाहेबांचे हे एक वैशिष्ट्य होते! नव्या, उभरत्या कलाकारांची कामं पाहायचे. त्यांच्याशी चर्चा करायचे. त्यांना प्रोत्साहन द्यायचे. त्यांची चित्रे खरेदी करायचे. हा जणू त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. असा गुण मोठ्या कलाकारांत फार क्वचित पाहायला मिळतो. त्यांच्यात दुर्दम्य उत्साह होता. नवे काही पाहायचे, करायचे, शिकायचे म्हटले, की ते दुप्पट जोशात कामाला लागायचे. लहान मुलासारखे उतावळे व्हायचे. हे कुतूहल हेच त्यांच्यातल्या जिंदादिलीचे रहस्य होते !

मी अनेकदा तासनतास त्यांच्यासोबत फ्रेंच कॅफेत बसून कलेसंदर्भात चर्चा केल्या आहेत.. वाद झडायचे. आम्ही एकत्र अनेक प्रदर्शने पाहिली... त्यावर मग चर्चा व्हायची. दोघांचाही कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न होता. तरीही ही चर्चा आम्हा दोघांना नवे काही देऊन जायची. माझ्याकडे त्यांच्या हस्ताक्षरातील जवळपास शंभरएक पत्रे आहेत. आमच्या २५ वर्षांच्या स्नेहबंधात वेगवेगळ्या वेळी लिहिलेली. त्यात माझ्यासारख्या नव्या दमाच्या कलाकाराला कलेकडे कसे पाहावे, कलेप्रतीचा दृष्टिकोन, रंग-रेषांचे महत्त्व, ते उमजून काम करणे, ते आत्मसात करणे, जगण्याचा हेतू- त्यातील कंगोरे यांचे विस्ताराने वर्णन आहे. पॅरिसबद्दल त्यांना वाटणारे ममत्व, त्यांच्या भोवतालचे लोक, त्यांचे भिन्न भिन्न दृष्टिकोन या साऱ्यांचे चित्रच आहेत ती पत्रे म्हणजे! मी अनेकदा ही पत्रे काढून वाचत बसते, तेव्हा प्रत्येकवेळी काही नवे शिकायला मिळते. माझ्यासाठी हा अमूल्य ठेवा आहे.

रझासाहेबांना छोट्यात छोटे कामही खूप नजाकतीने करताना मी पाहिले आहे.  एखादे चित्र विकले गेले, की त्याचे पॅकिंगही ते मनापासून करायचे. कोणी मदतीला गेले, की  ठाम नकार द्यायचे. कोणाला चित्राला हातही लावू द्यायचे नाहीत. खूप प्रेमाने, हळूवारपणे ते तो रोल पॅक करायचे. विचारले, तर म्हणायचे, ही माझी लाडाची लेक सासरी चालली आहे. तिला नीट सजवून, शृंगार करून पाठवायला हवे...कुणाला पत्र लिहायला बसले, की कमीत कमी पाच-सात वेळा तरी मायना लिहून खोडायचे. मग प्रत्येक शब्द- प्रत्येक ओळ अगदी मोजून-मापून त्यांच्या लेखणीतून उतरत असे. त्यांना फुले खूप प्रिय होती. कधी त्यांच्यासोबत फुलांच्या दुकानात गेलो तर मजा यायची. ते मनापासून एकेक फूल निवडून घ्यायचे. 

२२ ऑक्टोबर १९८८ या दिवशी लंडनहून पॅरिसच्या रेल्वे स्टेशनवर उतरले. गाडी लेट होती; पण रझासाहेब माझी वाट पाहत स्टेशनवर उभे होते. मला होस्टेलच्या रूमवर पोहोचवल्यानंतरच ते परतले. पॅरिसमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. फोन कार्डचा कसा वापर करायचा, मेट्रो कशा पकडायच्या, चित्रकलेचे साहित्य कुठून खरेदी करायचे, रोजच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी.. एक ना दोन.

एकदा मी आजारी पडले. माझ्या खोलीत पडून असताना रात्री ११ च्या सुमारास रझासाहेब औषधे आणि भारतीय रेस्टॉरंटमधून पॅक केलेले जेवण घेऊन माझ्या खोलीत आले. शिवाय माझ्या घरच्यांना फोन करून सांगितले, तुम्ही चिंता करू नका. पॅरिसमध्ये सुजाताची काळजी घ्यायला मी आहे, - तेव्हापासून रझासाहेब आहेत, असे समजले, तरी माझ्या घरचे निश्चिंत असायचे. त्यांच्या सोबतीमुळे माझा आत्मविश्वास वाढला. भावनिक आधार मिळाला. मी माझ्या चित्रकलेकडे अधिक लक्ष देऊ शकले.  मी किंवा रझासाहेब; एखादे चित्र पूर्ण झाले, की आधी ते एकमेकांना दाखवायचो. आम्ही कधीही एक-दुसऱ्याला प्रत्यक्ष काम करताना पाहिले नाही. कारण काम करतानाची शांतता, एकाग्रता दोघांनाही प्रिय होती; पण आम्ही दोघेही परस्परांचे खूप चांगले समीक्षक होतो. कामाच्या बाबतीत वयाचा फरक कधी आड आला नाही, याचे सारे श्रेय त्यांचेच. 

त्यांची हिंदी-उर्दू भाषा फारच सुंदर होती. इंग्रजी-फ्रेंचही ते छान लिहायचे. शेर, गजल, कवितांवर त्यांचे प्रेम होते. जुनी चित्रपटगीते  मनापासून ऐकायचे. काही सुंदर पाहिले, अनुभवले, की जवळच्या डायरीत ते तो अनुभव लिहून ठेवायचे. माझी मुलगी हेलेनाचे हिंदी खूप सुंदर आहे, त्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. तिच्याशी बोलताना ते कायम शुद्ध हिंदीत संवाद साधायचा प्रयत्न करत. हेलेना छोटी असल्यापासून त्यांच्या स्टुडिओत जात असे. तिथल्या कॅनव्हासवर ती काही रंगकाम करायची. तो प्रत्येक कॅनव्हास रझासाहेबांनी फ्रेम करून आपल्या टेबलावर ठेवला होता. विचारले, तर म्हणायचे, ही माझी फेव्हरेट कलाकार आहे आणि हसायचे. हेलेनाचे ते आजोबाच होते.

माझे पती रूने जूल लारसन यांच्याशीही त्यांचा असाच स्नेह होता. प्रत्येक महत्त्वाची गोष्ट करण्यापूर्वी ते रूनेशी सल्लासमलत करायचे. दोघांतील मैत्री पुढे इतकी वाढली, की दोघेच अनेकदा एकत्र जेवायला जायचे.रझासाहेबांना चांगले-चुंगले खायला खूप आवडायचे; पण वरण-भात, रोटी, बटाट्याची भाजी म्हणजे त्यांचा जीव की प्राण. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मी त्यांच्यासाठी भारतीय पद्धतीचे जेवण बनवून पाठवायची. त्यांच्याबरोबरच त्यांच्या फ्रेंच मित्रमंडळींसाठी पण! एकदा गंमत झाली, त्यांनी एका फ्रेंच लेखिकेशी माझी भेट घालून दिली. तिला माहीत नव्हते की, मी चित्रकार आहे. त्यामुळे तिने सहजपणे मला विचारले, तू रझासाहेबांची स्वयंपाकीण आहेस का? त्यांच्यासोबत माझ्यासाठीही जेवण बनवशील का? 

जेव्हा मी रूनेशी लग्न करायचा निर्णय घेतला, तेव्हा माझ्या घरच्यांनी रझासाहेबांना सांगितले की, तुम्ही जाऊन एकदा रूनेला भेटून तो कसा आहे, ते पाहून घ्या. त्यांच्या निर्णयावर माझे लग्न अवलंबून होते. त्यावेळी बहुधा रात्रभर ते झोपलेही नसावेत. प्रचंड नर्व्हस झाले होते. रूनेला भेटायला निघालो, तेव्हा त्यांचे हात बर्फासारखे गार पडले होते. ते म्हणाले, जर मला रूने तुझ्यासाठी योग्य वाटला नाही, तर काय होईल?...  मग मीच त्यांना खात्री दिली आणि म्हणाले, माझ्यावर, माझ्या निवडीवर विश्वास ठेवा.जेव्हा रझासाहेब गेल्याचे सांगायला मी त्यांच्या फ्रेंच मित्रांकडे गेले, तेव्हा त्यांच्या भिंतीवर मला रझासाहेबांची खूप सारी चित्रे पुन्हा पाहता आली. जी खूप प्रेमाने सजवून, जपून ठेवलेली होती.

मी त्यांना कायम म्हणायची, रझासाहेब तुम्ही माझ्यासाठी प्रेमाने काळजी घेणाऱ्या देवदूताप्रमाणे एन्जल गार्डियन- आहात. ते हसून सोडून द्यायचे; पण २००० सालानंतर मात्र रझासाहेब म्हणायचे, आता तू माझी एवढी काळजी घेतेस, की आपले रोल बदलले आहेत. आता २००० साली तू माझी एन्जल गार्डियन आहेस. रझासाहेबांच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात १९८४ ते २०१० या प्रदीर्घ कालखंडात एवढी दृढ, अकृत्रिम, निर्व्याज मैत्री माझ्या वाट्याला आली. मी कृतार्थ आहे.

 

 

Web Title: Raza Saheb and I.. a grateful story of deep affection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.