समाजातील सज्जनशक्तीचा पुन्हा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:07 PM2019-11-10T18:07:07+5:302019-11-10T18:15:08+5:30

मिलिंद कुलकर्णी बेरीज-वजाबाकी...! खान्देशात प्रशासनाने उत्तम नियोजन केलेले होते. खबरदारी म्हणून काहींवर नजर, संबंधितांना सूचना, शांतता समितीच्या बैठका, समाजमाध्यमांचा ...

Re-affirmation of gentlemanliness in the community | समाजातील सज्जनशक्तीचा पुन्हा प्रत्यय

समाजातील सज्जनशक्तीचा पुन्हा प्रत्यय

googlenewsNext
ठळक मुद्देअयोध्या निकालानंतर संयम, सौहार्दाचे वातावरण ; प्रशासनाच्या नियोजनाला संपूर्ण समाजाची उत्तम साथसमाजमाध्यमांकडून स्वयंशिस्तीचे दर्शन ; एकात्मतेची भावना वाढीस लागल्याची सुखद भावना

मिलिंद कुलकर्णी

बेरीज-वजाबाकी...!
खान्देशात प्रशासनाने उत्तम नियोजन केलेले होते. खबरदारी म्हणून काहींवर नजर, संबंधितांना सूचना, शांतता समितीच्या बैठका, समाजमाध्यमांचा काळजीपूर्वक वापर करण्याचे आवाहन, पुरेसा पोलीस बंदोबस्त अशी पूर्वतयारी करण्यात आली होती. धुळ्यात आदल्यादिवशी दोन आणि नंदुरबारात एक गुन्हा दाखल झाला, ही कारवाई प्रभावशाली ठरली. इतिहासात काही शहरांविषयी नोंदी असतील, पण तरीही समाजाने ठरवले तर प्रतिमा निश्चित बदलू शकते, हे या घटनेने दाखवून दिले.
समाजपुरुषाची परीक्षा घेणारे प्रसंग अनेकदा येत असतात. त्यावेळी समाजातील सज्जनशक्ती काय भूमिका घेते, त्यावर वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अवलंबून असतो. भूतकाळातील घटनांविषयी तर नेहमीच दोन पक्ष राहिलेले आहेत, त्यासंबंधी विषय असला तर दोन्ही पक्ष हिरीरीने भूमिका मांडतात आणि आपली बाजू कशी खरी हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. अयोध्येचा वाद हा असाच आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाने उत्तम असे संतुलन राखले आणि ना कुणाचा विजय झाला ना, कुणाचा पराजय झाला, अशी भावना निर्माण झाली. वाद मिटला, देश जिंकला असे वातावरण संपूर्ण देशभर होते.
निकाल ऐतिहासिक आहेच, पण या निकालाचे पडसाद काय उमटू शकतात, यासंबंधी पुरेशी खबरादारी प्रशासनाने घेतली, हे खूप महत्त्वाचे आहे. महाराष्टÑात नुकतीच विधानसभा निवडणूक आटोपली आहे. १८ दिवस उलटूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सत्तासमीकरणात प्रमुख चार पक्ष गुंतलेले आहेत. शिवसेनेचे आमदार मुंबईत तर काँग्रेसचे आमदार जयपूरला आहेत. राष्टÑवादी व भाजपचे आमदार एकतर मतदारसंघात किंवा मुंबईतच असावे. राजकीय मंडळी सत्तास्थापनेच्या खेळात गुंतलेली असताना प्रशासनाने समाजातील जबाबदार घटकांचे सहकार्य घेत हा प्रसंग उत्तमपणे निभावला.धुळे आणि नंदुरबारमधील घटनांची तातडीने दखल घेऊन कारवाई केल्याने अतिउत्साही, उतावीळ मंडळींना चाप बसला. पुन्हा कोणी असा प्रकार करायला धजावले नाही.
समाजातील सर्वच घटकांनी संयम, एकता, बंधुभावाचे विलक्षण दर्शन घडवले. शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. बाजारपेठेतही तुरळक गर्दी होती. समाजाला विश्वास देण्यासाठी सज्जनशक्ती रस्त्यावर उतरली. शांतता फेरी काढण्यात आल्या. सभांमध्ये एकोप्याचे आवाहन केले गेले. याचा खूप मोठा परिणाम झाला. जनजीवन पूर्ववत झाले.
समाजमाध्यमांविषयी एरवी फारसे चांगले मत नाही. परंतु, प्रशासनाने धोक्याची जाणीव करुन देताच समाजमाध्यमांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. कुणीही आक्षेपार्ह टिपणी न करता, एकोपा आणि बंधुभाव वृध्दिंगत होईल, असाच प्रयत्न केला.
अयोध्या निकालाचे समाजात उमटलेले पडसाद पाहता समंजस, परिपक्वपणाचे विलक्षण दर्शन घडले. विजय, पराजयापेक्षा वाद मिटला, देश जिंकला ही भावना सर्वतोपरी ठरली. यातूनच समाज आणि देश पुढे जाणार आहे. संख्येने कमी असल्या तरी समाजात काही विघातक व विध्वंसक शक्ती आहेत, त्यांना समाजपुरुषाच्या या एकसंघ दर्शनाने व्यवस्थित संदेश मिळाला असेल.

Web Title: Re-affirmation of gentlemanliness in the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.