अरबी वसंत दहा वर्षांत कशानं सुकला? आयुष्य बरबाद असं तिथलं तारुण्य का म्हणतं ?

By Meghana.dhoke | Published: December 19, 2020 01:44 PM2020-12-19T13:44:48+5:302020-12-19T13:50:43+5:30

अरब स्प्रिंगकडे जगाच्या इतिहासात तंत्रज्ञानाचा हात धरून आलेलं नवं पर्व म्हणून पाहिलं जाऊ लागलं. आता त्या साऱ्याला १० वर्षं उलटली. कशी गेली ही १० वर्षं? न्याय, समानताधारित लोकशाही व्यवस्थेचं स्वप्न मध्यपूर्वेतील या देशांनी, तिथल्या तारुण्यानं पाहिलं ते खरोखरच प्रत्यक्षात आलं का? तत्कालीन हुकूमशहा गेले; पण हुकूमशाही व्यवस्था गेली का?

re visiting Arab spring, ten years of hope & frustration for middle east countries. | अरबी वसंत दहा वर्षांत कशानं सुकला? आयुष्य बरबाद असं तिथलं तारुण्य का म्हणतं ?

अरबी वसंत दहा वर्षांत कशानं सुकला? आयुष्य बरबाद असं तिथलं तारुण्य का म्हणतं ?

googlenewsNext
ठळक मुद्देजग बदलेल म्हणून आशेनं आंदोलनांकडे पाहणाऱ्यांनाही अरबी वसंताचं हे कोमेजणं निराश करणारं आहे.

अरब स्प्रिंग. १७ डिसेंबर २०१० रोजी जगाच्या पटलावर हा शब्द तेजस्वी ताऱ्यासारखा चमकला. मध्यपूर्व देशात नव्या माध्यमांचा हात धरून क्रांतीच्या ज्वाला भडकत होत्या. हुकूमशहा, एकचालकानुवर्ती सत्ताधीश यांच्या खुर्च्या संतप्त जनतेनं उलथून टाकल्या. ट्युनिशियात सुरू झालेली ही चळवळ म्हणता म्हणता अन्य शेजारी देशात पोहोचली. नव्या काळाची क्रांती म्हणूनच नव्हे, तर अरब स्प्रिंगकडे जगाच्या इतिहासात तंत्रज्ञानाचा हात धरून आलेलं नवं पर्व म्हणून पाहिलं जाऊ लागलं. आता त्या साऱ्याला १० वर्षं उलटली. कशी गेली ही १० वर्षं? न्याय, समानताधारित लोकशाही व्यवस्थेचं स्वप्न मध्यपूर्वेतील या देशांनी, तिथल्या तारुण्यानं पाहिलं ते खरोखरच प्रत्यक्षात आलं का? तत्कालीन हुकूमशहा गेले; पण हुकूमशाही व्यवस्था गेली का?

या साऱ्या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक मिळाली असती, तर गेल्या दशकभरात मध्यपूर्वेचं चित्र पुरतं पालटलं असतं. शांतता नांदली असती आणि त्याकाळी तरुण असलेल्या पिढीनं जी स्वप्नं पाहिली ती काही अंशी तरी प्रत्यक्षात उतरलेली दिसती असती. प्रत्यक्षात तसं झालं नाही. दुर्दैवानं आगीतून फुफाट्यात, अशी या देशातल्या जनतेची अवस्था झाली. क्रांती करून संतापानं सत्ता उलथवून टाकता येते हे अरब स्प्रिंगनं दाखवून दिलंच; पण पर्याय काय याचा ठोस, समंजस, सर्वसमावेशक विचार केला नाही, तर माणसांचं आयुष्य अधिक विदारक, भयंकर यातनामयच होतं, याचं एक चित्रही याच दशकभरात समोर आलं.

अरब स्प्रिंगची सुरुवात झाली ती ट्युनिशियात. १७ डिसेंबर २०१० ची ही गोष्ट. मोहंमद बॉयझाझी हा २७ वर्षांचा तरुण. रस्त्यावर भाजीचा ठेला लावत असते. पोलिसांच्या छळाला कंटाळून त्यानं स्वत:ला पेटवून घेतलं. तिथंच भडका उडाला आणि ट्युनिशियात तरुण रस्त्यावर उतरले. ट्युनिशियाचे तत्कालीन हुकूमशहरा झिन अल अबिदीन बेन अली. यांच्या विराेधात प्रचंड आंदोलन सुरू झालं. तिकडे स्वत:ला पेटवून घेणारा बॉयझाझी ४ जानेवारी २०११ ला मरण पावला. मात्र, त्यानं जी विरोेधाची मशाल पेटवली त्या वणव्यात १० दिवस स्थानिकांनी संघर्ष केला आणि २३ वर्षं सत्तेत असलेल्या हुकूमशाला पायउतार व्हावं लागलं. पुढं ते सौदी अरेबियात पळून गेले. अरब स्प्रिंगमुळं देश सोडावा लागणारे ते पहिले हुकूमशहा.

२५ जानेवारीला २५ हजार लोकांनी इजिप्तच्या कैरोमध्ये मोर्चा काढला. अध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या ३० वर्षांच्या सत्तेला त्यांनी आव्हान दिलं. ‘ब्रेड, फ्रीडम ॲण्ड डिग्निटी’ अशी मागणी त्यांनी लावून धरली. ११ फेब्रुवारीला आंदोलन असं भडकलं की, लाखो लोक रस्त्यावर उतरले. मुबारक यांनी सत्ता सोडत लष्कराच्या हाती सूत्रं सोपवली. एकेक करीत मध्यपूर्वेतील देश असाच भडकला. लिबिया, येमेन, अल्जेरिया, जॉर्डन, कुवेत, ओमेन, सिरिया, मोरोक्को, कुवेत, सुदान, इराक या साऱ्याच देशात सत्ताधीशांना पळता भुई थोडी झाली.

मात्र, आता दहा वर्षांनी चित्र असं आहे की, ज्या अरबी वसंतानं आशेचे, उमेदीचे मळे फुलवले, आता जगण्यात बहार येईल, असे वायदे केले. त्याच वसंताची पुरती पानगळ झाली. गार्डिअन या ख्यातनाम वृत्तपत्रानं केलेल्या अभ्यासवृत्तानुसार अरब स्प्रिंगमध्ये सहभागी ९ अरब देशांतील माणसांना आता वाटत आहे की, आपली अवस्था दहा वर्षांत बदसे बत्तर झाली. नागरी गृहयुद्धात हे देश ढकलले गेले. ज्यांच्या हाती सत्ता आली तेही पूर्वीच्या हुकूमशहांच्याच वाटेनं निघाले. गार्डिअननं घेतलेल्या एका चाचणीनुसार सिरियात ७५ टक्के लोकांना वाटतंय की, आपली अवस्था दहा वर्षांत जास्त वाईट झाली. येमेनमध्ये हेच प्रमाण ७३ टक्के, तर लिबियात ६० टक्के इतकं आहे. या आकडेवारीच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर असं दिसतं की, लोकशाही व्यवस्था, सामाजिक सुधार, हातांना रोजगार याची जी स्वप्नं या माणसांनी त्याकाळी पाहिली ती प्रत्यक्षात कशी उतरवायची याचा काही शांत विचार अमलात येण्याइतपतही व्यवस्था उभ्या राहू शकल्या नाहीत. सत्तेचे वाटेकरी व्हायला धावलेल्या अनेकांनी त्याचा फायदा घेतला आणि आजही हे देश भयंकर असंतोष, उद्रेत पोटात घेऊन खदखदतच जगत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार या दहा वर्षांच्या काळात ३,८०,००० लोक मृत्युमुखी पडले आणि जे जिवंत आहेत त्या साऱ्यांची भावना हीच की, माणूस म्हणून जगण्याचे आपले हक्क नाकारत आपला आवाज दडपला जातो आहे. अरबी वसंताचं हे कोमेजणं जग बदलेल म्हणून आशेनं आंदोलनांकडे पाहणाऱ्यांनाही निराश करणारं आहे.

ट्युनिशियाचा पुढचा प्रवास

ट्युनिशियात अरब वसंताला सुरुवात झाली. त्यातल्या त्याच एका देशात लोकशाही मार्गानं जाणारी एक यशस्वी कथा थोडीबहुत आज दिसते आहे. मात्र, आज १८ ते २४ या वयोगटात असलेल्या तिथल्या तारुण्याला दहा वर्षांपूर्वी जे घडलं, त्यापूर्वी आपलं आयुष्य कसं होतं, हे आठवत नाही. दुसरं म्हणजे काय चुकलं याचा शोध घेत वर्तमान बदलणार नाही. त्यामुळं आता पुढं काय हे शोधू, असं हे तरुण म्हणतात. एक वेगळीच जनरेशन गॅप या देशात दिसतेय.

Web Title: re visiting Arab spring, ten years of hope & frustration for middle east countries.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.