मतदानाआधी हे नक्की वाचा..!

By admin | Published: January 16, 2017 12:10 AM2017-01-16T00:10:46+5:302017-01-16T00:10:46+5:30

भाजपा-शिवसेना सत्तेत असताना एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत

Read it exactly before voting ..! | मतदानाआधी हे नक्की वाचा..!

मतदानाआधी हे नक्की वाचा..!

Next


भाजपा-शिवसेना सत्तेत असताना एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत आणि ज्यांनी सत्ताधाऱ्यांना झोडून काढायचे ते स्वत:ची कातडी वाचवण्यात मश्गुल झाले आहेत...
कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की सगळे राजकीय पक्ष जोमाने कामाला लागतात. आश्वासनांची खैरात सुरू होते. ते किती वाईट, आम्ही किती चांगले, हे सिद्ध करण्यासाठी सगळे वाट्टेल त्या थराला जातात. आम्ही किती आणि कसे योग्य आहोत हे दाखवून देण्याची एकही संधी सत्ताधारी पक्ष सोडत नाही आणि सत्ताधाऱ्यांचे निर्णय कसे चूक आहेत, आणि आम्ही कसे बरोबर निर्णय घेतले होते हे सांगण्यात विरोधक धन्यता मानत असतात. लोकांना तसे याचे काहीही घेणे देणे नसते. पण मतदानाच्या शेवटच्या दिवशी असे काही फासे टाकले जातात, की लोक भावनिक होतात, आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावून मोकळे होतात... आजवरचे हे चित्र...
यापेक्षा काहीसे वेगळे चित्र सध्या पहायला मिळत आहे. राज्यात भाजपा आणि शिवसेना तर मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपा सत्तेत आहेत. या दोघांची युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड... पण यावेळच्या विधानसभा निवडणुकीत हा जोड तुटला... मात्र कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने जनतेवर पुन्हा निवडणुकीच्या खर्चाचा भार नको असे सांगत हा जोड पुन्हा जोडला गेला. पण पहिल्यासारखा मजबूत जोड जुळलाच नाही. कधी कोठून तर कधी कोठून, पाणी पाझरतच राहिले. भाजपाने घेतलेले निर्णय कसे चुकीचे आहेत, त्यांच्याशी आमचा काडीचा संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून बसलेली शिवसेना जीव तोडून प्रयत्न करत आहे. तर महापालिकेत जे काही वाटोळे झाले आहे ते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळेच असा आव भाजपा आणत आहे.
वास्तविक मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपा शिवसेनेचे मंत्री शेजारी शेजारी बसतात, एकत्र निर्णय घेतात. घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची सामूहिक जबाबदारी ही सरकार म्हणून मंत्रिमंडळाची असते. असे असताना गेल्या दोन वर्षांत भाजपाने घेतलेला निर्णय आम्हाला पटला नाही, त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आमचे लेखी म्हणणे नोंदवत आहोत, असे एकही उदाहरण आजतागायत शिवसेनेच्या नावावर जमा नाही. तरीही आमचा चुकीच्या निर्णयांशी संबंध नाही, असे सांगून शिवसेनेचे मंत्री बिनधास्त मोकळे होतात. राज्यात येणारे कोणतेही सरकार कायम जनतेसोबतच असते, (निदान तसा समज तरी आहे.) तरीही हे कायम सांगत फिरतात की आम्ही जनतेसोबत आहोत.
तिकडे महापालिकेत याच्या नेमके विरुध्द चित्र पहावयास मिळते. तेथेदेखील स्टॅण्डिंग कमिटीत होणारे ‘अंडरस्टॅण्डिंग’ हे सर्वपक्षीय असतानाही शिवसेनेने चुकीचे निर्णय घेतले, आमचा त्या निर्णयांशी संबंध नाही असे सांगत भाजपा हात वर करून मोकळे होत आहे. पारदर्शी कारभार देण्यासाठी आम्हालाच मत द्या, शिवसेनेने एवढा भ्रष्टाचार केला, हे चुकीचे केले, ते वाईट केले असे म्हणत भाजपा स्वत: केलेल्या चुकांपासून स्वत:लाच वेगळे करू पाहत आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे, ‘मी नाही त्यातली आणि कडी लावला आतली..’ शिवसेना, भाजपाचे जे काही चालू आहे ते याशिवाय वेगळे काही नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळून लोकांना मोठ्या अपेक्षेने भाजपा-शिवसेनेला सत्ता दिली. मात्र या आधीचे बरे, म्हणायची वेळ या दोन्ही पक्षातील नेत्यांनी आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला पण भाजपाचे मंत्री आणि पक्षाचे प्रमुख यांचेच मतदारसंघ कचऱ्याच्या ढिगांनी भरलेले आहेत. त्यांच्याच मतदारसंघात जागोजागी घाण आणि अस्वच्छता आहे. त्यामुळे या सगळ्यांचे बोलणे आणि वागणे यात मोठे अंतर पडलेले आहे. सत्ता टिकविण्यासाठी जे जे काही काँग्रेसने केले त्या सगळ्या गोष्टी आता बिनदिक्कतपणे भाजपा करताना दिसते आहे. मात्र मूलभूत प्रश्नांकडे ना भाजपाचे लक्ष आहे ना शिवसेनेचे.
भाजपा शिवसेनेची ही दुफळी जनतेसमोर आणण्याची ताकद दुर्दैवाने विरोधी पक्षात उरलेली नाही. उद्या भाजपाने हाक दिली तर दोन्ही काँग्रेसमधले अनेक नेते पटापटा भाजपात जायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे सरकारवर कडाडून हल्ला चढविण्याची त्यांची मानसिकता उरलेली नाही. ज्यांची आहे त्यांचे हात अशी मानसिकता जोपासणाऱ्यांनी बांधून टाकले आहेत. तेव्हा या सगळ्यांचा विचार करा, मग मतदान करा...
- अतुल कुलकर्णी

Web Title: Read it exactly before voting ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.