वाचनीय लेख - ‘बय गेली न बयची वाकय बी गेली’... पवारांची परीक्षा ठाकरेंपेक्षा कठीण
By यदू जोशी | Published: February 9, 2024 06:36 AM2024-02-09T06:36:25+5:302024-02-09T06:37:01+5:30
उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान शिवसैनिक तरी आहेत; शरद पवारांचे मात्र सरदार शिरजोर झाले आणि राजावर एकाकी उरण्याची पाळी आली!
यदु जोशी
उद्धव ठाकरे ‘मातोश्री’बाहेर पडून फिरताहेत. त्यांनी कोकणचा दौरा केला. जाहीर सभा घेतल्या, जुन्या-नव्या शिवसैनिकांशी ते संवाद साधत आहेत. आता ते मुंबईतील शाखा-शाखांमध्ये जाणार आहेत. लोकसभेची निवडणूक त्यांच्यासाठी ‘करो वा मरो’ची लढाई आहे. तशीच ती शरद पवार यांच्यासाठीही आहे. दोघांचेही पक्ष हातून गेले; चिन्हही गेले. वऱ्हाडात म्हण आहे, ‘बय गेली न बयची वाकय बी गेली’... सध्या या दोघांबाबत तेच घडले आहे. महाराष्ट्राच्या दोन मोठ्या नेत्यांवर वयाच्या ऐंशीत आणि साठीत चाचपडण्याची वेळ आली आहे.
ठाकरेंकडे बाळासाहेबांचा वारसा आहे, ‘मातोश्री’ आहे, भगवा आहे आणि निष्ठावान शिवसैनिक आहे. शिवाय पवारांपेक्षा ते २० वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे त्यांच्या परतीची ‘वंदे भारत’ रुळावर येऊ शकते; पण शरद पवार त्याबाबत जरा उणे वाटतात. ‘एज डजन्ट मॅटर’ हे वाक्य पुस्तकात ठीक आहे; वास्तवात वय महत्त्वाचे असतेच ना! गतवैभवाच्या कहाण्या कितीही सुंदर असल्या तरी केवळ त्यांच्या आधारे भविष्य आपोआप सुरक्षित होत नसते, ते पुन्हा-पुन्हा घडवत राहावे लागते. उद्धव ठाकरेंना पक्ष टिकवता आला नाही अन् राज ठाकरेंना पक्ष उभा करता आला नाही. तरीही ठाकरे नावाची जादू कधीही काम करू शकते. राज कपूरची मुले राज कपूर होऊ शकली नाहीत; एकही मुलगा सुपरस्टार झाला नाही. शेवटी वडिलांची पुण्याई एका मर्यादेपर्यंतच तुमच्या मदतीला धावते; पुढे तुम्हीच स्वत:ला पुढे न्यायचे असते. उद्धव यांनी ते ओळखले आणि स्वत:ची ओळख निर्माण केली; पण सापशिडीच्या खेळात फाटाफुटीने त्यांना पार खाली आणले. त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती आहे, असे म्हणतात; लोकसभा निवडणूक ‘ही सहानुभूती खरेच होती की नव्हती’ याचा फैसला करणारी असेल.
शिवसेना फुटून पावणेदोन वर्षे झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी पुन्हा बळ एकवटण्याला उद्धव यांना बराच वेळ मिळाला. पवारांचा पक्ष फुटून एक वर्षही व्हायचे आहे. शिवाय लोकसभेच्या दोन महिने आधी त्यांच्या हातून पक्ष अन् चिन्ह गेले. त्यामुळे त्यांची परीक्षा अधिक कठीण दिसते आणि सध्या सहानुभूतीचा पावसाळाही मदतीला नाही. नेते, आमदार, खासदार गेले; पण खालचा शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत आहे, असे म्हणण्यास पुरेशी जागा आहे. पवारांबाबत ती तितकी नाही. काकांनी महाराष्ट्रात अजितदादांच्या हाती पक्ष दिला; त्याचे परिणाम आज सहन करावे लागत आहेत. पवारांच्या राजकारणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सर्वप्रकारच्या सत्तेचे विकेंद्रीकरण आपल्या सोबतच्या सरदारांमध्ये केले. हे वैशिष्ट्यच आता त्यांना आडवे येत आहे. सरदार राजे झाले अन् राजा एकाकी पडला. आयोगाच्या निर्णयाने अजितदादांचे बळ वाढल्यामुळे काकांच्या कॅम्पमधील आणखी दोघे-चौघे त्यांच्यासोबत जाऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रातील काकांची एक सावली स्वत:च भाजपच्या झाडाखाली जाण्याच्या तयारीत आहे.
...त्यांच्यात चर्चा का नाही?
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन-चार बैठकी झाल्या; पण महायुतीच्या बैठकीचा पत्ता नाही. याचे कारण काय असावे? असे कळते की, भाजपलाच त्यासाठी घाई नाही. शेवटी-शेवटी घाईघाईत चर्चा करून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर आपल्या अटी, शर्ती लादायच्या आणि मनासारखे करवून घ्यायचे, असा भाजपचा गेमप्लॅन असावा. लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातील काँग्रेस फोडण्याचा भाजपचा अजेंडा दिसतो, तो पूर्ण करून मग मित्रपक्षांशी जागावाटपाची चर्चा केली तर आपली ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढलेली असेल असाही एक हेतू विलंबामागे असावा. चर्चेसाठी भाजप त्याच्या मित्रपक्षांना तंगवत आहे. प्रत्यक्ष चर्चेत ते मित्रपक्षांना थकवतील आणि मनासारखे करून घेतील. युतीची बोलणी करताना उद्धव ठाकरे ताठ राहायचे. २०१९ मध्ये ठाकरेंनी २३ जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. आता ताठ राहून सन्मानजनक जागा पदरी पाडून घेण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर असेल. त्यात ते कमी पडले तर त्यांची तुलना ठाकरेंशी होईल. अजितदादांसोबत फक्त सुनील तटकरे हे एकटेच लोकसभा सदस्य गेले. शिंदेंसोबत शिवसेनेचे १८ पैकी १३ खासदार गेले, त्यांचे राजकीय भवितव्य सुनिश्चित करणे ही शिंदेंसाठी मोठी कसोटी असेल.
माधुरी दीक्षित रिटर्न्स
माधुरी दीक्षित मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार अशा बातम्या मध्यंतरी आल्या आणि लगोलग माधुरी यांनी इन्कारही केला; पण आता पुन्हा हा विषय समोर आला आहे. दीक्षितांच्या माधुरीला पूनम महाजन यांच्या जागी उत्तर-मध्य मुंबईतून लढविण्याचा भाजप गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे गजानन कीर्तीकर उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार आहेत. ही जागा आपल्याकडे घ्यावी आणि तेथून माधुरी यांना तेथे लढवावे, असा दुसरा पर्यायही भाजपच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे.
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. दहा फेब्रुवारीला ते राष्ट्रवादीत जातील. त्यांचे पुत्र, मुंबईतील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी ‘काँग्रेस सोडल्याने आमदारकी जाते का?’ ते तपासून कधी बाहेर पडणार ते ठरेल. थेट भाजपमध्ये येण्यास मागे-पुढे पाहणाऱ्यांना राष्ट्रवादीचा मार्ग उपलब्ध करून देण्याची सिद्दीकींचा प्रवेश ही सुरुवात असेल.
yadu.joshi@lokmat.com