वाचनीय लेख - खग्रास सूर्यग्रहणाच्या हुलकावणीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 10:12 AM2024-04-13T10:12:29+5:302024-04-13T10:13:39+5:30

खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी ग्रहणाच्या मार्गात असलेली अमेरिकन शहरं आणि गावांत लोकांची झुंबड उडाली होती. त्या दिवशी प्रत्यक्षात काय झालं?

Readable article - The story of Khagras solar eclipse | वाचनीय लेख - खग्रास सूर्यग्रहणाच्या हुलकावणीची कहाणी

वाचनीय लेख - खग्रास सूर्यग्रहणाच्या हुलकावणीची कहाणी

शोभा चित्रे

सकाळी मी चहाचा कप घेऊन डायनिंग टेबलपाशी आले. खिडक्यांचे पडदे उघडले.  बाहेर अखंड हिमवर्षाव सुरू होता. पानं गळलेले उंचच उंच वृक्ष, काटकुळ्या फांद्या आणि शेंड्यांवर हिमकणांचा अभिषेक! आयुष्याची ३५ हून अधिक वर्ष वाॅशिंग्टन, मेरीलॅन्ड, आणि न्यू जर्सीला घालवली, अनेक हिमवादळं पाहिली. घराभोवती झालेला फूट, फूट बर्फाचा ढिगारा आणि त्यातून वाट काढताना, तो बाजूला सारताना झालेली दमछाक... तरीही प्रत्येक गोष्टीत वेळ महत्त्वाची असते. आज एप्रिलची ५ तारीख. आता हा हिमवर्षाव व्हायला हवाय का?

तेरा वर्षांपूर्वी आम्ही या असल्या हवेपासून दूर फ्लोरिडाला स्थायिक झालो. पण मी इथे आलेय ती मुलाकडे न्यू याॅर्क राज्यातल्या राॅचेस्टर या गावी. त्याला कारणही तसंच आहे!.. आज इथे खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. कधीपासून मी उत्सुकतेने वाट पाहिलीय. मी ग्रहण बघायला जातेय हे कळल्यावर मैत्रिणींकडून त्यांनी पाहिलेल्या ग्रहणाच्या गोष्टी ऐकल्या. माझा उत्साह आणखी वाढला. तर अशी मी १ एप्रिललाच राॅचेस्टरला डेरेदाखल झाले. विमानतळावरून बाहेर गाडीपर्यंत जाईपर्यंत इथल्या थंडीने मला कवटाळण्याचा प्रयत्न केलाच. मी पुरता बंदोबस्त करून होते. दुसऱ्या दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू झाली.. आणि आज ग्रहणाच्या दिवशी तर चक्क हिमवर्षाव. आम्ही सगळे हवामान विभागाचा अंदाज बघत होतो.  सुरूवातीला चांगला लखलखीत दिवस दाखवत होते. मग हळूहळू त्या सूर्यप्रकाशाला ढग ग्रासू लागले आणि आता तर फक्त ढगाळ हवेचा अंदाज. मात्र गावात टीव्हीवर, बातम्यांत सगळीकडे उत्साही वातावरण.  शेवटी तो हिमवर्षाव थांबला. सूर्यकिरणं बाहेर डोकावली. हवामान विभागाकडे दुर्लक्ष करून मी या प्रकाशाचं मनापासून स्वागत केलं. सगळीकडे ग्रहणाच्या बातम्यांना अग्रक्रम. मेक्सिकोपासून दिसणारं हे खग्रास ग्रहण टेक्सासमधून सरकत पुढे कुठल्या कुठल्या राज्यात त्याचा कसा प्रवास असेल ते दाखविण्यात येऊ लागले. हा दुर्मिळ योग गाठण्याची अनेकांची धडपड. लाखो लोक वेगवेगळ्या राज्यांतून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाले. त्यातले काही विमान प्रवास करणार होते, तर काही  मुलाबाळांसह गाड्या दामटत प्रवासाला निघाले. हे फारच भारी होतं.

अमेरिकेत काही अगदी लहान गावांतूनही हे ग्रहण दिसणार होतं. त्या गावातली सगळी हाॅटेल्स भरली. गावाच्या लोकसंख्येच्या दुप्पट, चौपट संख्येने बाहेरगावाहून लोक येणार, अशी चिन्हं दिसू लागली. गावाचा मेयर आणि इतर व्यवस्थापक यांची धाबी दणाणली. एवढ्या लोकांची राहण्या, जेवण्याची व्यवस्था, त्यांची सुरक्षा, ट्रॅफिकची व्यवस्था, वैद्यकीय मदत एक ना अनेक प्रश्न!  नायगारा फाॅल्सवरून सर्वांत चांगलं ग्रहण बघायला मिळेल, असं नॅशनल जिओग्राफिकने जाहीर केल्याने लोकांची तिकडे जाण्यासाठी झुंबड. शिवाय ग्रहणाआधी गावा-गावातून ग्रहण ही थीम ठेवून आखलेले कार्यक्रम. आम्हालाही एका कन्सर्टला जायचं होतं. असं सगळीकडचं ग्रहणमय वातावरण. पण ग्रहणाच्या दिवशी सोमवारच्या सकाळी हा आनंद काही फार काळ टिकला नाही. हळूहळू ढगांनी पाठशिवणीचा खेळ सुरू केला. घटिका भरू लागली. दुपारी एकनंतर आम्ही सगळे ग्रहणाचा सोहळा बघायला जवळच्या गोल्फफोर्सवर जाणार होतो. 

आमचा मोठा नातू अनायसे काॅलेजला ‘विंटर ब्रेक’ असल्याने घरी आला होता. आज मुद्दाम ग्रहण बघायला लांबून त्याचे मित्र-मैत्रिणी येणार होत्या. आम्ही जायला निघालो. गोल्फकोर्सच्या कंट्रीक्लबवर दुपारपासून सेलिब्रेशन सुरू झालं. गप्पागोष्टी, खाणं-पिणं सगळं उत्साही, आनंदी वातावरण. धमाल!  
आकाश मात्र निळाई हरवलेलं. सैरावैरा धावणारे ढग नव्हते; एक घट्ट राखाडी आच्छादन. कुठूनतरी सूर्याची किरणं बाहेर येतील, अशी शक्यताच नव्हती.  तरीही शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार होईल, असंही काही लोकांचं म्हणणं पडलं. ग्रहण लागण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. हवेतला गारवा एकदम वाढला. कुणीतरी  फायर प्लेस लावली आणि एकदम अंधार घेरून आला. भरदुपारी मिट्ट अंधार. हा अंगावर आलेला अंधार हवेतली वाढलेली थंडी आणि आकाशाकडे डोळे लावून उभे असलेले आम्ही! हळूहळू अंधार दूर झाला. सगळं कसं पूर्ववत. त्या स्वर्गीय क्षणानं आम्हाला हुलकावणी दिली होती.
टीव्हीवर ग्रहणाच्या बातम्या, ठिकठिकाणी चाललेला जल्लोष, खग्रास ग्रहणाचे मनोवेधक फोटो, ते बघताना जखमेवर मीठ चोळल्यासारखं क्षणभर वाटलं. पण दुसऱ्याच क्षणी ती भावना विरली. हा चमत्कार आपल्याला बघायला मिळतोय हे मोठंच. शेवटी निसर्ग म्हणजे गूढच-तो त्याची जी रूपं दाखवेल ती पाहायची. मात्र त्याचा अवमान करून त्याला उग्ररूप दाखवायला भाग पाडायचं नाही, एवढंच आपल्या हातात.

...अमेरिकेतून दिसणारं पुढचं खग्रास ग्रहण बघायला मी नसेन, पण जगाच्या पाठीवर कुठेतरी पुढे-मागे बघता येईल नं? वयाची आठ दशकं सरत आली, पण म्हणून काय झालं?.. देअर इज ऑलवेज अ  नेक्स्ट टाइम ! असा विचार करतच होते, तेवढ्यात अटलांटाहून प्रियाचा, सुनेचा फोन आला. ती म्हणाली, ‘माॅम, पुढचं खग्रास ग्रहण अटलांटाहूनच पुढे जाणार आहे. साल आहे २०७८ मे महिना.!’
मी म्हटलं, नक्की येते! फक्त आधी हवामान विभागाचा अंदाज घे...”
- आम्ही हसत सुटलो.

ख्यातनाम लेखिका,
टॅम्पा, फ्लोरिडा shobha_chitre@hotmail.com
 

Web Title: Readable article - The story of Khagras solar eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.