वाचनीय : निकाल येईल पुढे 'नीट' होईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 08:49 AM2024-06-23T08:49:44+5:302024-06-23T08:50:47+5:30

नीटच्या निकालानंतर देशभर सुरू झालेला गोंधळ विद्यार्थ्यांचा तणाव वाढविणारा आहे.

Readable result will be neet but what about next | वाचनीय : निकाल येईल पुढे 'नीट' होईल?

वाचनीय : निकाल येईल पुढे 'नीट' होईल?

धर्मराज हल्लाळे, वृत्तसंपादक, लातूर

नीटच्या निकालानंतर देशभर सुरू झालेला गोंधळ विद्यार्थ्यांचा तणाव वाढविणारा आहे. न्यायालयाच्या निकालाने पालक, विद्यार्थ्यांचे समाधान होईल आणि प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुढच्या परीक्षा कशा होणार, जे घडले त्यातून एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) कोणता धडा घेणार, हा खरा प्रश्न आहे. नीट परीक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मनात मूलभूत प्रश्न आहेत. ग्रेस गुणांची समस्या निकाली निघाली. त्या १,५६३ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा अथवा मूळ गुण स्वीकारण्याचा पर्याय देण्यात आला आहे. आता वेगवेगळ्या राज्यांत पेपरफुटीची झालेली चर्चा आणि तपास यंत्रणांनी दिलेली माहिती अस्वस्थ करणारी आहे.

देशभरात २३ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा जीव कासावीस झाला आहे. घराघरांत तणाव आहे. गडबडीची व्याप्ती किती खोलवर आहे, त्यावर नीटची परीक्षा पुन्हा होणार का? आणि होणार तर कोठे होणार? याचे उत्तर लवकरच मिळेल. बिहार, गुजरात, हरियाणा, जिथे जिथे गडबडीचा संशय आहे, तेथील केंद्रात, त्या-त्या राज्यापुरती की संपूर्ण देशभर पुन्हा परीक्षा यावर स्पष्टता होईल, तोवर विद्याथ्यांना पालकांनी, शिक्षकांनी धीर दिला पाहिजे. मार्ग निघेल, प्रश्न सुटेल, असा विश्वास निर्माण केला पाहिजे.

प्रत्येक विद्यार्थ्याकडे संशयाने बघू नये

  • या वषींचा निकाल तुलनेने अधिक चांगला का आला, त्यावर प्रथमतः ग्रेस गुणांची चर्चा झाली. परंतु, तो मुद्दा मर्यादित विद्यार्थ्यांपुरता होता.
  • काहीजणांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून चांगले गुण मिळविले! याशिवाय, एनटीएने २० टक्के अभ्यासक्रमाची कपात केली.
  • त्यामुळे ८० टक्के अभ्यास पूर्ण करणाऱ्या हुशार विद्याथ्यांची संख्या वाढली का? हेही तपासले पाहिजे. 
  • त्यामुळे चांगले गुण मिळविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे संशयाने बघता येणार नाही.

विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नका...
- विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी पुन्हा खेळ होणार नाही. याची हमी  दिली पाहिजे. परंत नीट नकोच अशी भूमिका आततायी- पणाची ठरेल. नीटमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी देशपातळीवर गुणवत्ता सिद्ध करू शकले. एम्ससारख्या संस्थांमध्ये प्रवेशाचा टक्का वाढला. स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. यंत्रणेतील दोष दूर करणे आणि गुणवत्तेवर आपल्या जागा काबीज करणे ही आपली भूमिका असली पाहिजे.


- महाराष्ट्रात पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जवळपास ४ हजार ९५० आणि खासगी महाविद्यालयामध्ये ३ हजार एमबीबीएसच्या जागा आहेत. सुमारे ७ हजार ९५० विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळेल. त्यानंतर बीएमएस, बीडीएस, फिजिओथेरपीचे प्रवेश होतील. ज्याच्या-त्याच्या गुणवत्तेनुसार व अपेक्षेप्रमाणे प्रवेश मिळविणारे विद्यार्थी काही हजारामध्ये असतील.

- स्वाभाविकच ज्यांना नीट २०२५ ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या लाखोमध्ये आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षेची मागणी तीव्र दिसते. त्याच वेळी ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करुन परीक्षा दिली आहे. त्यांच्यासाठी अभ्यासाची उजळणी आणि तीच परीक्षा देणे जीवावर येऊ शकते. त्यामुळे दोन्ही बाजूने विद्यार्थी तणावात आहेत.

निकालानंतर पुढे काय होणार... 
- न्यायालय न्याय देईल, नीट-२०२४ च्या निकालाचा संभ्रमही दूर होईल आणि नीट- २०२५ ची तयारी सुरू होईल. मात्र जे घडले त्यातून एनटीए कोणता धडा घेणार आणि सुधारणा काय करणार हे अधिक महत्वाचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी, अभ्यासकांनी योग्य पर्याय सुचविले पाहिजेत. दोन महत्वाचे बदल करता येतील. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यावर मर्यादा आणावी. 

- दहावी, बारावी कोठून झाली अथवा त्याचा रहिवास कुठला आहे याचा विचार करून त्या जिल्ह्यातील, विभागातीलच केंद्र निवडता यावे. कारण महाराष्ट्राचे विद्यार्थी कर्नाटक, गुजरा- तमध्ये जाऊन परीक्षा देत असतील तर गडबडीचा संशय येणारच, खासगी संस्था, व्यक्तीवर जबाबदारी न सोपविता, केंद्राची जबाबदारी वरिष्ठ शासकीय अधिकायांकडे आणि परीक्षा हॉलवर शासकीय, निमशासकीयच कर्मचारी नियुक्त करावेत. ज्यामुळे जबाबदारी निश्चित करता येईल.

Web Title: Readable result will be neet but what about next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.