भाजपचे वाचाळवीर : क्रि येविण वाचाळता व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:18 AM2018-05-12T04:18:40+5:302018-05-12T04:18:40+5:30
या आठवड्याचे हिरो ठरले भाजपचे वाचाळवीर. २०१९ च्या राजकारणाला वळण देऊ शकणाऱ्या कर्नाटकच्या निवडणुकीसाठी मतदान आज होतंय
डॉ. उदय निरगुडकर, (न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक)
या आठवड्याचे हिरो ठरले भाजपचे वाचाळवीर. २०१९ च्या राजकारणाला वळण देऊ शकणाऱ्या कर्नाटकच्या निवडणुकीसाठी मतदान आज होतंय. दुसरीकडे नैराश्य, समाजाचे टोमणे यामुळे आत्महत्या करण्याच्या घटना चटका लावून जाताहेत.
२०१४ साली मोठ्या विश्वासानं या देशातल्या एकूण मतदारांपैकी साडेसतरा कोटी मतदारांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. ती एका मोठ्या अपेक्षेनं. सबका साथ सबका विकास या घोषणेला धरून आणि महत्त्वाचे प्रश्न सोडवले जातील याकरिता. परंतु या नंतरच्या साडेतीन-चार वर्षांत भाजपची दोन रूपं पुढे येताहेत. एक कणखर, कठोर असे निर्णय घेणारं सरकार. रस्ते, वीज, यासारख्या पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाकांक्षी स्वप्नं बघून पावलं उचलणारा गडकरींचा चेहरा आणि दुसरीकडे समोर येतंय काहीसं नकारात्मक चित्र. ते म्हणजे हिंदू स्त्रियांनी चार मुलं पैदा करावेत असं सांगणारे साक्षी महाराज, रामजादे-हरामजादे असं म्हणणाºया साध्वी निरंजन ज्योती. मोदींना विरोध करायचा असेल तर पाकिस्तानात चालते व्हा, असं म्हणणारे गिरीराज सिंह. यातलं नेमकं भाजपचं खरं चित्र कोणतं? असा संभ्रम निर्माण झालाय. मोदींनी तंबी देऊनही या वाचाळवीरांचं उचलली जीभ आणि लावली टाळूला, हा प्रकार सुरूच आहे. एकीकडे मोदी या देशात परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी प्रतिमा घडवण्यात मग्न आहेत तर दुसरीकडे, या देशातल्या कडवी विचारसरणी मानणाºयांना चुचकारण्यात निरंजन ज्योती, गिरीराज, योगी आदित्यनाथ हे महाभाग मग्न आहेत. त्यात नुकसान स्वत:च्याच पक्षात होतंय, याचं भानही त्यांना राहिलेलं नाही.
२०१४ मध्ये मोदींना चायवाला म्हणणं काँग्रेसला किती महागात पडलं, हा इतिहास ताजा आहे. मोदींनी तंबी दिल्यानंतरही ही बडबड थांबत का नाही? या बोलबच्चनांना कुणालाही देशद्रोही ठरवायचा अधिकार कुणी दिला? कॅमेरा आणि बूम दिसला की चेव चढतो का? अशा वाचाळवीरांना आवरण्यात राजकीय पक्षांना विशेषत: भाजपला अपयश का येतंय?
असे वाचाळवीर ही त्यांची अपरिहार्यता आहे, असं मग वाटायला लागतं. अशी बेताल वक्तव्य येताक्षणी भाजप त्यांच्यावर कारवाई करत नाही म्हणून हे अधिक गंभीर होतंय.
अशा टोकाच्या वक्तव्यांनी देशात संभ्रम निर्माण होतो. एका वर्गाच्या मनात फाजील आत्मविश्वास तर दुसºया वर्गाच्या मनात भीती निर्माण करतात आणि मग हाच अशा व्यक्तींच्या राजकारणाचा बाज बनतो. आपण पाहू तेच समाजाचं चित्र बनलं पाहिजे, अशी भूमिका भारताच्या बहुसांख्यिक बहुपेढीय अस्तित्वाशी विसंगत आहे. यात सामान्य माणसांच्या कोणत्याही, समस्यांचं आकांक्षांचं प्रतीक दिसत नाही. ज्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तुम्हाला निवडून दिलं ते राहिलं बाजूला. उलट बेताल बोलून नवनव्या प्रश्नांची जंत्री तयार करण्यात तुम्ही गुंतलाय. अशी भलतीच वक्तव्यं अंतिमत: सत्तारूढ पक्षाला मारक ठरणार आहेत. देश बदल रहा है, याची अनुभूती प्रथम त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी दाखवायला हवी. समर्थ रामदासांचा एक श्लोक यावेळी मला सांगावासा वाटतोय...
फुकाचे मुखी बोलता काय वेचे,
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे
क्रि येविण वाचाळता व्यर्थ आहे,
विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे.
बुरसटलेला दृष्टिकोन
औरंगाबादमध्ये पायल गायकवाड या अल्पवयीन मुलीनं स्वत:ची जीवनयात्रा संपवली. मला मैने प्यार किया चित्रपटातला एक डॉयलॉग आठवला - ‘एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते’. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख होती २९ डिसेंबर १९८९ आणि आज तारीख आहे १२ मे २०१८. गेल्या २९ वर्षांत खूप काही बदललं. रंगीत टीव्ही आला, रिमोट कंट्रोल आला, मोबाईल आला, आयफोन आला, टॅब आला, टिष्ट्वटर, फेसबुक आलं, इंटरनेट आलं, जी मेल आला, तरीदेखील या चित्रपटातला डॉयलॉग अधिकाधिक गडद होतोय. आज तर तो एका निष्पाप मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. त्यावेळी होत होते तेवढेच आॅनर किलिंग आजही होताहेत. किंबहुना जास्तच होताहेत. आंतरजातीय विवाहांचं प्रमाण जरी वाढलं असलं तरीदेखील जातीभेद नष्ट झाला असं म्हणता येणार नाही. उलट तो दिवसेंदिवस टोकदार होतोय आणि मग अशा एखाद्या कळ्यांचे नि:श्वास आम्हाला जीवघेणे वाटतात. आजही मुलामुलींच्या साध्या मैत्रीकडे समाज कोणत्या नजरेनं पाहतो, ते औरंगाबादमधल्या पायलच्या आत्महत्येनं समोर येतंय.
मुलासोबतच्या मैत्रीबद्दल संशय घेतला म्हणून पायलनं आपलं जीवनच संपवलं. यातून अनेक प्रश्न निर्माण होताहेत. अत्यंत जीवघेणे. याचं कारण आज पायलच्या बाबतीत घडलं तसेच प्रसंग घरोघरी घडत असतील. नावं फक्त वेगवेगळी असतील. असे अनेक कळ्यांचे नि:श्वास आज समोर येतायत. कुणीतरी हे पापुद्रे अलगदपणे उलगडायला हवेत. कुणीतरी हे समजून घ्यायला हवं आणि समजावून सांगायला हवं. सकच्छ की विकच्छ इथपासून आधुनिकतेचा सुरू झालेला लढा आजही तसाच आहे. तंत्रज्ञानाचा रेटा कितीही वाढला असला तरी तिच्या आणि त्याच्या मैत्रीकडे पाहायचा दृष्टिकोन बुरसटलेलाच आहे. पक्षपात, वैफल्य, एकाकीपण यांनी आजची तरुण पिढी ग्रस्त आहे. फेसबुकवर पाच हजार मित्र आणि गल्लीत विचारत नाही कुत्रं, अशी आताची अवस्था आहे. माणूस हा समाजप्रिय आहे पण समाजाला त्याचं माणूस असणं आणि माणसासारखं असणं मंजूर आहे का, हा खरा सवाल आहे.
जहर का भी अपना हिसाब है, मरने के लिए जरासा और जीने के लिए बहुत सारा पिना पडता है. पायलच्या बाबतीतही नेमकं असंच घडलं. तरूणाशी मैत्री केल्याची एवढी मोठी किंमत तिला चुकवावी लागली. तीही तिची कोणतीही चूक नसताना. मैत्रीकडे केवळ लैंगिक दृष्टिकोनातूनच आपण का पाहतो? मैत्री ही लैंगिकतेपलीकडची असू शकत नाही का? कृष्ण-द्रौपदीच्या मैत्रीचे गोडवे गाणारा आपला समाज तरु ण-तरुणीच्या मैत्रीला नाकारतो. काही गोष्टी निखळही असतात, हे आपण मान्य करणार आहोत की नाही? मला या ठिकाणी गालीबचा एक शेर आठवतो.
जब लगा खंजर तो इतना दर्द नही हुआ गालिब,
जख्म का एहसास तो तब हुआ,
जब चलाने वालों पे नजर पडी...