हा खरा दणका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2017 12:21 AM2017-01-03T00:21:09+5:302017-01-03T00:21:09+5:30
न्यायालयाने घेतलेल्या निर्णयांची तमा न बाळगता उलट सतत संघर्षाचीच भूमिका घेत राहण्याची प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची आणि या न्यायालयाने घेतलेल्या निर्णयांची तमा न बाळगता उलट सतत संघर्षाचीच भूमिका घेत राहण्याची प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के या दोहोंची त्यांच्या पदावरुन हकालपट्टी करण्याचा जो निर्णय सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांनी सुनावला आहे, त्याला म्हणायचे, खरा दणका. एकाचवेळी सोन्याची असंख्य अंडी देण्याची क्षमता असलेल्या देशातील क्रिकेटच्या खेळाचे नियंत्रण करणाऱ्या मंडळात जे असंख्य गैरव्यवहार राजरोस सुरु होते ते जेव्हां न्यायालयाच्या दारी गेले तेव्हां सर्वोच्च न्यायालयाने देशाचे एक माजी सरन्यायाधीश राजेंद्रमल लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. मंडळातील गैर कारभाराला आळा घालण्यासाठी नेमक्या काय सुधारणा कराव्या लागतील याची शिफारस करण्याचे कार्य लोढा समितीकडे सुपूर्द करण्यात आले होते.
त्यानुसार समितीने आपला अहवाल सादर केला आणि केवळ मंडळाच्या राजकारणात व अर्थकारणात स्वारस्य असलेले लोक वगळता देशातील सर्वच लोकांनी अहवालातील शिफारसींचे स्वागत केले. ते इतके स्वागतार्ह ठरले की या आणि अशाच शिफारसी बाकीच्या खेळांच्या समित्यांनादेखील लागू केल्या जाव्यात अशी मागणी होऊ लागली. न्या. लोढा समितीने ज्या शिफारसी केल्या होत्या, त्या अंमलात आणण्याचे उत्तरदायित्वदेखील नंतर न्यायालयाने न्या. लोढा यांच्याकडेच सुपूर्द केले. पण मंडळाची भूमिका प्रथमपासून आडमुठेपणाचीच होती. ती बदलावी आणि शिफारसी लागू करण्यासाठी मंडळाने आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आवाहन आणि नंतर तसे आदेशदेखील सर्वोच्च न्यायालयाने जारी केले. पण त्याचा काहीही लाभ न झाल्याने अखेर शेवटी न्यायालयाने ज्याला कठोरतम म्हणता येईल असा निर्णय घेतला आहे.
न्यायालयाने मंडळास संलग्न असलेल्या देशभरातील सर्व राज्यांमधील क्रिकेट संघटनादेखील बरखास्त केल्या आहेत. त्याचबरोबर न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ फली नरीमन आणि गोपाल सुब्रह्मण्यम यांना कायदामित्र (अॅमिकस क्युरी) म्हणून नियुक्त केले असून मंडळाचा कारभार चालवू शकतील अशा लोकांची नावे सुचविण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविले आहे. न्यायालयात आपली बाजू मांडताना आणि न्या. लोढा समितीसमोर युक्तिवाद करताना ठाकूर-शिर्के यांनी त्यांच्या साक्षी फिरविल्या आणि न्यायालयाची बेअदबी केली असाही एक ठपका आता त्यांच्यावर ठेवला गेला असून तशी नोटीसदेखील न्यायालयाने जारी केली आहे. अनुराग ठाकूर भाजपाचे विद्यमान खासदार आहेत तर अजय शिर्के शरद पवारांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. सत्तरी पार केलेल्यांवर सक्तीची निवृत्ती लादणारी लोढा समितीची शिफारस मान्य करुन पवारांनी याआधीच मंडळाच्या कारभारातून आपले अंग काढून घेतले आहे.