कराचीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2016 11:40 PM2016-09-25T23:40:28+5:302016-09-25T23:40:55+5:30

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय, हे न पाहता दुसऱ्याच्या घराला आग लावली की काय घडतं याचा जो लेखाजोखा पाकिस्तानातल्या कराची

Real life in Karachi | कराचीतील वास्तव

कराचीतील वास्तव

Next

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय, हे न पाहता दुसऱ्याच्या घराला आग लावली की काय घडतं याचा जो लेखाजोखा पाकिस्तानातल्या कराची विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागानं नुकताच मांडला आहे, त्यानुसार कराचीतल्या ९० टक्के तरुणांच्या मते कराचीत रोजगाराच्या वा विकासवाढीच्या काहीही संधी नाहीत, तर किमान ४८ टक्के तरुण, संधी मिळाल्यास ‘पाक सरजमीं’ सोडून तातडीनं परदेशी जायला तयार आहेत! विद्यापीठानं अमेरिकन वकिलातीच्या अधिकाऱ्यांसमोरच एका जाहीर कार्यक्रमात जो शोधनिबंध प्रसिद्ध केला, त्यात या वास्तवाची मांडणी केली आहे. ‘डिटर्मिनेशन आॅफ यूथ इमिग्रेशन’ अर्थात ‘तरुणांची स्थलांतरामागची प्रबळ इच्छा’ हा या शोधनिबंधाचा विषय होता. हा शोधनिबंध म्हणतो की, ४१ टक्के तरुणांना राजकीय अस्थैर्य असल्यामुळे शहरातल्या कुठल्याही विकासकामात सहभागी व्हावं असं वाटत नाही. आजच्या घडीला कराचीतली ३० टक्के, म्हणजे सुमारे २.२ कोटी लोकसंख्या १५ ते २९ वर्षे या वयोगटातील आहे व त्यातील ९० टक्क्यांना असे वाटते की, या शहरात आपल्याला काही भवितव्यच नाही. रोजगाराचा अभाव, असुरक्षितता, आर्थिक चणचण आणि भवितव्यात काहीही भलं न घडण्याची ठाम खात्री या मुलांना देशत्याग करण्यास भाग पाडत असल्याचा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. पाकिस्तानच्या वतीने करण्यात आलेले ‘गॉलअप’ हे दुसरे सर्वेक्षण सांगते की, शक्य झाल्यास पाकिस्तानातल्या दोन तृतियांश लोकसंख्येला हा देश सोडून जगात कुठं तरी सुरक्षित आणि विकसित, शांत देशात जायचं आहे. अमेरिकेतल्या एमआयटी, स्टॅनफर्ड आणि वॉल्टन स्कूल आॅफ बिझनेस इथं शिकलेल्या पाकिस्तानी बुद्धिजीवींनी एकत्र येऊन ऐंशीच्या दशकात ‘गॉलअप पाकिस्तान’ ही संशोधन संस्था स्थापन केली होती. आजही ही संस्था आणि इतर समाज विचारवंत पाकिस्तानातल्या ‘ब्र्रेनड्रेन’ची चिंता व्यक्त करत हतबल आहेत. देशात शिक्षण, आरोग्य या विषयात काम करायला माणसं तयार नाहीत, तर दुसरीकडे कुशल मनुष्यबळाचा तुटवडा आहे. कराची विद्यापीठाच्या अभ्यासानुसार गेल्या सहा वर्षात ३७ लाख लोकांनी पाकिस्तान सोडून अन्य देशात, विशेषत: आखाती देशात आसरा घेतला आणि २०१५ या एकाच वर्षात १० लाख लोक देश सोडून निघून गेले. शिकणाऱ्या तरुण मुलांना कराचीत कुणी राहायला जागा देत नाही कारण ‘एकेकट्यां’वर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही इतकी दहशत आहे आणि हिंदू तसेच शिया मुस्लीम मुलांना घरच काय नोकरी मिळण्याचीही मारामार आहे. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत कराची शहरात हे घडत असेल तर अन्य भागात काय खस्ता हालात असतील, याचा विचार न केलेलाच बरा. दरम्यान, ‘सिंध’ प्रांतात आता अशाच कारणास्तव अशांतता पसरू लागली असून, बलुचींच्या क्षोभापाठोेपाठ आता सिंधमधील असंतोष ही पाकी सरकारसमोरील अजून एक धोक्याची घंटा आहे.

Web Title: Real life in Karachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.