जाहिरा वसीमच्या निमित्ताने काश्मीरातील वास्तव
By admin | Published: January 18, 2017 11:58 PM2017-01-18T23:58:16+5:302017-01-18T23:58:16+5:30
‘दंगल’ चित्रपटात जाहिरा वसीम या काश्मीरी युवतीने केलेल्या गीता फोेगटच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेतले.
‘दंगल’ चित्रपटात जाहिरा वसीम या काश्मीरी युवतीने केलेल्या गीता फोेगटच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेतले. ‘हमारी छोरीयाँ क्या छोरो से कम है’? हा डायलॉग आता देशभरात एव्हाना घरोघरी पोहोचू लागला आहे. कुस्तीसारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही मुली प्राविण्य मिळवू शकतात आणि तेही हरयाणासारख्या पुरुषप्रधान जाट संस्कृतीत, हा संदेश केवळ मुलींसाठी नाही तर त्यांच्या पालकांसाठीही प्रेरणादायी ठरत असतानाच जाहिरा वसीम स्वत: मात्र तिने केलेल्या या भूमिकेमुळे वादात सापडली आहे. खरे तर हा वादाचा विषय असू शकत नाही, असे जे जावेद अख्तर म्हणाले, ते बरोबरच आहे आणि ही काही काश्मीरमधील अशा प्रकारच्या वादाची पहिलीच वेळ नाही. मात्र गेल्या सव्वीस वर्षांहून अधिक काळ हिंंसाचारामध्ये आणि दहशतग्रस्त वातावरणामध्ये जगणाऱ्या व चित्रपटगृहे नसणाऱ्या काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या या सोळा वर्ष वयाच्या मुलीने धर्म अथवा परंपरा झुगारल्या आणि चित्रपटात भूमिका केली व तीदेखील एका कुस्तीपटूची, यामुळे कट्टरतावादी दुखावले.
‘पॅलेट’मध्ये (छऱ्याच्या बंदुकीतील छर्रे) जखमी झालेल्या अथवा अंध झालेल्या काश्मीरी युवकांचा तिने अपमान केला, असा तिच्यावर आरोप सुरु झाला आणि तिने मुस्लीम महिला मुख्यमंत्री असणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. त्यावेळी जाहिरा काश्मीरी मुलींची ‘रोल मॉडेल’ आहे असे मेहबूबा म्हणाल्या. ही बातमी आणि नंतर पुन्हा आपण काश्मीरी तरुणांचे रोल मॉडेल नसल्याचा खुलासा जाहिराने फेसबुकवर टाकला तेव्हा चर्चेला पुन्हा पेव फुटले. ‘काश्मीरी छोरीयाँ छोरोसे कम है’ असं म्हणणारे कट्टरवादी लोक प्रसिद्ध गायिका पद्मश्री राज बेगम, दिद्दा राणी, इंदिरा गांधी, मेहबूबा मुफ्ती इतकेच काय बराक ओबामा यांच्या सहकारी फराह पडत, डॉ. रुवेदा या काश्मीरी महिलांनी केलेली कामगिरी मात्र विसरले.
चित्रपटातून दिसणारे काश्मीरी तरुणींचे सुंदर, नाजूक आणि संवेदनशील असे मनमोहक दर्शन केव्हाच मागे पडले असून आता हातात दगड घेणारी, सत्तेशी संघर्ष करणारी पुरुषी कुस्ती खेळणाऱ्या गीता फ ोगट ची भूमिका करणारी जाहिरा वसीम हेच काश्मीरी स्त्रीचे खरे रुप आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र काश्मीरचा निसर्ग जसा कधी खेळकर तर कधी खोडकर असतो आणि कधी कधी अक्राळ विक्राळ स्वरुप धारण करतो तशीच या स्त्रीची प्रतिमा असल्याचे इतिहास सांगतो. ती आपल्या मुलांना वाचविण्यासाठी कधी रणरागिणी होते तर कधी आपल्या मुली शिकाव्या, त्यांनी आकाशाला गवसणी घालावी यासाठी ती आपल्या मुलींना शिकायला भारतातल्या कडक उन्हाळा असलेल्या इतर शहरांमध्येही पाठवते. सरहद संस्थेत पंचवीस पेक्षा अधिक काश्मीरी मुली चौदा वर्षापेक्षा अधिक काळ पुण्यात राहत आहेत.
काश्मीरी मुलांपेक्षा काश्मीरी मुलींमध्ये कष्ट करण्याची आणि पुढे जाण्याची तीव्र इच्छा असते. त्याचवेळी कुटुंबाचे नेतृत्व करण्याची उपजतच क्षमताही असते, हे अनेक उदाहरणांमधून वेळोवेळी दिसून येते. सनातनी धर्मवाद्यांनी जेव्हा जेव्हा काश्मीरी महिलांवर दबाव आणण्याचा अथवा आपले विचार लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांनी तो झुगारून लावला, हेही काश्मीरचा इतिहास सांगतो. मग तो बुरख्याच्या सक्तीचा विषय असो, की स्त्री शिक्षणाला विरोधाचा. काही वर्षांपूर्वी मुलींनी कपडे काय घालावे, चित्रपट पाहावे की नाही, यापासून वाहन चालवायचे की नाही यासाठी अतिरेकी संघटनांनीही फ तवे काढले. एक दोन तरुणींच्या चेहऱ्यावर अॅसीडही फे कले. मात्र काश्मीरी युवतींनी फ तवे पाळले नाही. आज काश्मीरी युवती भारतातील पुणे, बेंगळुरु, हैदराबाद, लखनौ, दिल्ली, जम्मू इतकेच काय तर कोलकाता आणि चीनपर्यंत शिक्षणासाठी जाऊन पोहोचल्या आहेत. त्यांनी बँकांचे कर्ज काढले तर कधी जमिनी विकल्या, केवळ आपले भविष्य नीट व्हावे म्हणून.
मूलत: अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या या युवतींना काश्मीरमध्ये पुरेशा संधी नाहीत म्हणून जेथे आणि जशी संधी मिळेल तेथे या तरुणींनी स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. जाहिरा वसीम अशा तरुणींचे प्रतिनिधित्व करते. काश्मीरी तरुणींना अपमान, दहशतवाद आणि अशांततेपासून आझादी हवी आहे. मात्र आपण तिच्या भावना समजून घ्यायला नेहमीच कमी पडतो.
गेल्या तीस वर्षातल्या त्या राज्यातील अस्थिरतेचा सर्वात जास्त परिणाम काश्मीरी महिलांवर झाला आहे. एकीकडे धर्मवादी आणि अतिरेक्यांचा धोका तर दुसरीकडे सरकारी यंत्रणांकडून सततचा घेतला जाणारा संशय, यामुळे काश्मीरमध्ये बलात्कार, खून, हुंडाबळी, छेडछाड, अशा गोष्टींचे प्रमाण जरी कमी असले तरी ‘हैदर’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाली आहे. घरातील कोणाचेही नुकसान झाले तरी त्याचा परिणाम स्त्रियांवरच होतो आणि म्हणूनच त्या प्रसंगी समोर कोण आहे याचा विचार न करता रस्त्यावर उतरतात. आजही जाहिरा वसीम हिच्या निमित्ताने काही लोक टीका करीत असले तरी त्यात राजकारणाचाच भाग जास्त आहे. ज्या वातावरणामध्ये जाहिरा राहते, त्या वातावरणात तिला धमक्या आल्यानंतर भीती वाटणे नैसर्गिक आहे. मात्र काश्मीरी समाज महिलांना सन्मान देत नाही, असे मानणे मात्र त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. उर्वरित भारतामध्ये महिला आपल्या अधिकारांबद्दल जितक्या जागृत नसतात तितक्या त्या काश्मीरमध्ये आहेत. एका बाजूला सुधारणांची ओढ आणि दुसऱ्या बाजूला सनातन्यांचा दबाव यामध्ये काश्मीरी महिला सतत संघर्ष करीत असतात.
काश्मीरी मुली उपजतच बंडखोर असतात. त्या घरात बसून राहणे मान्य करत नाहीत. आजही काश्मीरी मुस्लीम महिलांचे नोकरीमधील प्रमाण लक्षणीय आहे. हळूहळू उद्योगधंद्यातही त्या पुढे येत आहेत. इतकेच काय बऱ्याचदा विवाहाच्या वेळी मुलगी नोकरी करत असेल तर मुलगा कसा असावा याचा निर्णय तीच घेते. विधवा पुनर्विवाहापासून घराच्या मालमत्तेपर्यंत अनेक निर्णयांमध्ये काश्मीरी महिला नेहमी काळाच्या बरोबर किंंवा पुढे राहिल्या आहेत व म्हणूनच जाहिरा वसीमच्या निमित्ताने काही मूठभर लोकांनी वादळ उभे केले असले तरी ते पेल्यातील वादळ ठरेल. काश्मीरी मुली अशाच स्वत:च्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे येत राहतील आणि जीवनाची ही कुस्ती जिंंकल्याशिवाय राहणार नाहीत याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.
-संजय नहार
(संस्थापक अध्यक्ष, सरहद)