स्पर्धा परीक्षा कशासाठी, भाकरीच्या चंद्रासाठी..!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 08:24 AM2021-12-19T08:24:13+5:302021-12-19T08:25:10+5:30

बेरोजगारांचे लोंढे परीक्षांच्या दिशेने का निघाले, याचे उत्तर ‘भाकरीचा चंद्र’ हेच आहे.

the reality of why competitive exams and the need for employment | स्पर्धा परीक्षा कशासाठी, भाकरीच्या चंद्रासाठी..!

स्पर्धा परीक्षा कशासाठी, भाकरीच्या चंद्रासाठी..!

googlenewsNext

- धर्मराज हल्लाळे, वृत्तसंपादक, लोकमत

काहीच जमलं नाही म्हणून स्पर्धा परीक्षेकडे वळले. मित्र तयारी करतोय म्हणून तेही निघाले... लालदिव्याची गाडी, वलयांकित जगणे दिसले अन्‌ स्पर्धा परीक्षेच्या वर्गात जाऊन बसले... अशी दूषणे तरुणांना नका देऊ! गर्दी का झाली, बेरोजगारांचे लोंढे परीक्षांच्या दिशेने का निघाले, याचे उत्तर ‘भाकरीचा चंद्र’ हेच आहे. असे कोणते क्षेत्र आहे, जिथे गर्दी नाही. गुणवत्ता आणि रोजगार यावर स्वतंत्र चर्चा करता येईल. परंतु, स्पर्धा परीक्षांचे चित्र नकारात्मकपणे न रंगविता तरुणांचे प्रश्न आणि त्यांची दशा समजून घेतली तर समाजाला दिशा मिळेल.

अलिकडच्या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली. पारंपरिक शिक्षणात पदवी मिळविली. डी.एड्‌., बी.एड्‌. झाले. सेट-नेटही उत्तीर्ण झाले. तरीही नोकऱ्या नाहीत. साधारणपणे २००९ पर्यंत डी.एड्‌. करणाऱ्यांना नोकऱ्या मिळत होत्या. ते कमी झाले की, शिक्षक होण्याची पात्रता असणारे तरुण स्पर्धा परीक्षेकडे वळले. उदाहरणच द्यायचे तर २०११ मध्ये पोलीस उपाधीक्षकपदी निवड झालेल्या पहिल्या ११ विद्यार्थ्यांमध्ये आठजण शिक्षक होते. पूर्वी बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. करणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत. आता अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी तरुण मंडळी मोठ्या संख्येने युपीएससीबरोबर एमपीएससीकडेही वळली आहेत. अगदी आयआयटी झालेले विद्यार्थीसुद्धा एमपीएससीच्या वर्गात बसले आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातही रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले, त्यावेळी त्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा हाही एक पर्याय पडताळून पाहिला. त्यामुळे २०१३ पासून सातत्याने एमपीएससीतील टॉपर अभियांत्रिकी क्षेत्राचा आहे. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

शेतीकडे वळा म्हणणाऱ्यांना शेतात काय पिकते आणि विकते, याचा अभ्यास नाही. फुकटचे सल्ले देणारे तरुणांच्या डोक्याला ताप आणतात. शेवटी पदवी मिळाली की आणखी दोन-तीन वर्षे स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करून पाहू, असा विचार करून काहीजण त्या दिशेने वळतात. सुरुवातीचे दोन-तीन वर्षे उत्साहाचे, काही जणांच्या बाबतीत गांभीर्याने पुढे जाण्याचे असतात. जस जसे यश हाती येत नाही, तशी निराशा येते. प्रयत्न सुटतात.

'उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी' अशी म्हण जुन्या काळी प्रचलित होती. आता चाकरी उत्तम समजली जाते. मुलाने पदवी मिळविली की, दरमहा वेतन देणारी लहान-मोठी नोकरी धरावी अशी सर्वांची अपेक्षा असते. अगदी वधू पित्यालाही जमीन जुमलावाला नव्हे तर आता नोकरदार जावई हवा आहे. दरमहा हमखास उत्पन्न असणे, हा व्यवहार्य दृष्टिकोन त्यामागे आहे. त्यात मुलींना तर अडथळ्यांची शर्यत आहेच. गुणवत्ता असूनही परीक्षेचे एक-दोन प्रयत्न झाले की, लग्न हाच पर्याय समोर ठेवला जातो. शेतकरी असो वा मध्यमवर्गीय नोकरी करणारे कुटुंब, त्यांना मुलाने कुठेतरी सरकारी नोकरीत चिकटावे वाटते. तरुणही त्याच आशेने धावतात. एकाला यश मिळते. बाकीचे धावत राहतात. वडील, आई, मोठा भाऊ पैसे पाठवत राहतो. प्रसंगी हातउसने घेणे, कर्ज घेणे याशिवाय मार्ग राहत नाही. आता स्पर्धा परीक्षेची गर्दी केवळ पुण्यात नव्हे, तर मराठवाडा, विदर्भातही जिल्ह्यांच्या ठिकाणी आहे. अनेक वर्ग उघडले आहेत. तेथील शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष हातात येणारा निकाल याची पडताळणी ज्याने-त्याने स्वत:च केली पाहिजे. 

विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही धीर धरला पाहिजे. झटपट यश मिळत नाही. भावनेवर पदे मिळत नाहीत. त्यासाठी अभ्यास आणि अभ्यासच लागतो. परीक्षेकडे वळण्याआधी त्याची दीर्घ प्रक्रिया, संयम आणि उत्पन्नासाठीची पर्यायी व्यवस्था याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ही परीक्षा काहिशी सापशिडीच्या खेळासारखी आहे. यशाच्या जवळ पोहोचता पोहोचता आलेल्या अपयशाने पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न करायला भाग पाडले जाते. शेवटी एक नक्की राज्याच्या कानाकोपऱ्यातून विशेषत: ग्रामीण भागातून प्रत्येक परीक्षेसाठी लाखोंच्या संख्येने येणारे अर्ज केवळ अधिकार आणि पद एवढ्यासाठी नव्हेत, तर ते भाकरीचा चंद्र शोधण्यासाठीच आहेत. त्यात कुठपर्यंत धावायचं हे कळले अन्‌ वळले तर बरे होईल. आपल्या क्षमता ओळखणे, प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. अमुक एक पद हेच जीवनाचे अंतिम ध्येय नाही. अभ्यासातून मिळविलेल्या ज्ञान आणि दृष्टीने अनेक संधी चालून येतील. त्यातून रोजगाराचा मार्ग मिळेल. जो तयारीचा आहे तो कोठेही चपखलपणे जागा निर्माण करेल. अन्यथा कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या काव्यपंक्तीप्रमाणे ‘शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली.. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली...’ असे म्हणण्याची वेळ कोणावरही येऊ नये !


मनोज चलवाड...

मनोज चलवाड लातूर जिल्ह्यातील बुधोडा गावचे. आठ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. किमान २५ पूर्व परीक्षांमध्ये त्यांनी यश मिळविले. अनेकदा थोडक्या गुणांनी मुख्य परीक्षेत यश गाठता आले नाही. वडील शेतकरी आहेत. बी.एस्सी. केल्यानंतर मनोज यांनी तीन वर्षे शेतीत लक्ष घातले. दूध डेअरी करावी, काही वेगळे प्रयोग करावेत असे ठरविले. परंतु, शेतकऱ्यांना आणि त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा समाज किती देतो, हा प्रश्न मनोज चलवाड यांनी विचारला. ते म्हणाले, प्रत्येकाला नोकरी हवी आहे. शेतकऱ्यांचे हाल आहेत. प्रत्येक शेतकरी पित्याला वाटते मुलाने नोकरी मिळवावी. मी प्रयत्न केले. कधी यश मिळाले, कधी अपयश. प्रयत्न सोडलेले नाहीत. मी यशस्वी होणार, मला खात्री आहे. काही मित्र अर्ध्यावर अभ्यास सोडून गेले. त्यांचे तरी काय चुकले आहे. किती प्रतीक्षा करणार? घोषणा करणारे सरकार गेले. महापोर्टल आले-गेले. अजूनही २०१८-१९ चे अर्ज निकाली निघाले नाहीत. मी तयारी उशिरा सुरू केली. मुलांनी या परीक्षांकडे वळताना वेळेवर सुरुवात करावी. संयम ठेवावा आणि स्वावलंबी होण्याचा पर्यायही शोधावा. तरच ते खंबीरपणे उभे राहतील. परीक्षा येतील आणि जातील, असेही मनोज चलवाड म्हणाले.

प्रीती जतकर....

सोलापूरच्या प्रीती जतकर पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. दोनवेळा पीएसआयच्या मुलाखतीपर्यंतही पोहोचल्या. त्या म्हणाल्या, सुरुवातीचे काही वर्ष सर्वांचेच गांभीर्य राहते. दोन वर्षे उलटली, अपेक्षित यश हाती आले नाही की, हिरमोड होतो. पालकही मागे लागतात. मुलींच्या बाबतीत लगेच लग्नाची बोलणी सुरू होते. एमपीएससी देणारी बहुतांश मुले ग्रामीण भागातील आहेत. कर्ज काढून, उसणे घेऊन प्रसंगी शेती विकूनसुद्धा शिक्षणावर खर्च करणारे पालक आहेत. अधिकाऱ्यांची गाडी, रुबाब, वलय अर्थात यशाचे मृगजळ काही जणांच्या बाबतीत घडते. त्यात कधी आणि कुठे थांबायचे, याचा निर्धार विद्यार्थ्यानेच केला पाहिजे. अभ्यास करताना अवतीभोवती बहुतांश मुला-मुलींना कमी अभ्यासात लवकर यश हवे असते, हेही चुकते. या परीक्षांची प्रक्रिया दीर्घ आहे हे विद्यार्थ्याने, पालकाने समजून घेतले तर सोपे जाईल. आमची ससेहोलपट आम्हीच थांबवू शकतो. अभ्यासाची दिशा चुकू न देता यश मिळविणे आणि ते न मिळाल्यास स्वत:च्या पायावर उभा राहण्याचा पर्याय निर्माण करणे ही खंबीरता आम्हा विद्यार्थ्यांत आली तर समाज सुदृढ होईल. त्यासाठी केवळ मुलामुलींना दोष न देता त्यांना पालकांचे पाठबळ आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रीती जतकर म्हणाल्या.


 

Web Title: the reality of why competitive exams and the need for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.