खरंच इम्रान खानच्या स्वप्नातील पाकिस्तान साकारेल?

By विजय दर्डा | Published: July 30, 2018 03:11 AM2018-07-30T03:11:22+5:302018-07-30T03:11:46+5:30

इम्रान खान यांना पूर्वी मी दोनवेळा भेटलो होतो. दोन्ही वेळची भेट लंडनमध्ये झाली होती. पहिली भेट सुमारे २२ वर्षांपूर्वी झाली तेव्हा इम्रान खान नुकतेच राजकारणात उतरले होते.

 Really Imran Khan dream of Pakistan? | खरंच इम्रान खानच्या स्वप्नातील पाकिस्तान साकारेल?

खरंच इम्रान खानच्या स्वप्नातील पाकिस्तान साकारेल?

Next

इम्रान खान यांना पूर्वी मी दोनवेळा भेटलो होतो. दोन्ही वेळची भेट लंडनमध्ये झाली होती. पहिली भेट सुमारे २२ वर्षांपूर्वी झाली तेव्हा इम्रान खान नुकतेच राजकारणात उतरले होते. दुसरी भेट निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर झाली. परंतु पराभवाने त्यांच्या चेहऱ्यावर जराही नैराश्य नव्हते. एक खेळाडू असल्याने त्यांचा उत्साह व एक ना एक दिवस नक्की जिंकण्याची जिद्द होती! त्यावेळी बोलताना इम्रान खान यांनी पाकिस्तान बदलून टाकण्याची ग्वाही दिली होती. ते म्हणाले होते की, पाकिस्तानच्या तरुण पिढीला प्रगतीची आस लागली आहे. त्यांना भ्रष्टाचारमुक्त देश हवा आहे. त्यांच्या स्वप्नातील पाकिस्तान कसा असेल हे सांगताना ते म्हणाले होते की, माझ्या पाकिस्तानमध्ये प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळावे, प्रत्येक पोटाला भाकरी मिळावी व शेतकºयांना सन्मान मिळावा. लष्कर, आयएसआय व धार्मिक कट्टरपंथींपासून पाकिस्तानला मुक्ती मिळावी! या दोन्ही भेटींच्या वेळी इम्रान खान यांनी मला खूप प्रभावित केले. इम्रान खान यांनी त्यांची आई शौकत खानम यांच्या स्मृत्यर्थ पाकिस्तानातील सर्वात मोठे कर्करोग इस्पितळ उभारले यानेही मी प्रभावित झालो.
निवडणुकीतील इम्रान खान यांचा विजय हा खरं तर तेथील युवा पिढीचा विजय आहे. या नव्या पिढीने आपल्या आशा-आकांक्षा इम्रान खानच्या रूपाने संसदेत पोहोेचविल्या आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने मदत केली म्हणून इम्रान खान जिंकले, असे काही लोक म्हणतात. पण ते सत्य नाही. लष्कर आणि आयएसआय खरंच पाठीशी असते तर ते पूर्वीच सत्तेवर आले असते. खरं तर इम्रान खान यांनी या शक्ती त्याज्य मानून आणि त्यांच्याविरुद्ध लढून विजय मिळविला आहे. इम्रान खान यांचा लढा खºयाखुºया लोकशाहीसाठी होता. पाकिस्तानची तरुणाई इम्रान खान यांच्यासोबत होती. त्यांचा विजय नक्की दिसत होता. त्यामुळे इम्रान खान आमचेच आहेत, असा अपप्रचार लष्कराने पडद्यामागून सुरू केला. लष्कराला आपला प्रभाव दाखवायचा आहे. वास्तवात इम्रान खान हे लष्कराच्या हातचे प्यादे नाहीत, ते लोकशाहीचे पक्के व सच्चे समर्थक आहेत. नरेंद्र मोदींप्रमाणे तरुण पिढीने त्यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचविले आहे.
बेनझीर भुट्टो किंवा नवाज शरीफ यांचा प्रभाव काही भागांपुरता होता, तरी ते संपूर्ण पाकिस्तानवर राज्य करायचे. याच्या नेमके उलटे इम्रान खान यांना या निवडणुकीत संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला आहे. इम्रान खान यांनी ज्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेतले त्यांचे सर्व २२ उमेदवार पराभूत झाले. त्याही जागा इम्रान खान यांनी स्वत:च्या पक्षाकडून लढविल्या असत्या तर आज त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असते. निवडून आलेले बहुसंख्य अपक्षही त्यांच्या बाजूने असतील. त्यामुळे सरकार चालविण्यात त्यांना कोणतीही अडचण येऊ नये.
इम्रान खान यांनी कट्टरपंथी व पाकिस्तानात ठाण मांडलेल्या दहशतवाद्यांना वठणीवर आणले तर त्याचे ते सर्वात मोठे यश असेल. पाकिस्तानच्या जनतेने इम्रान खान यांना मतदान करून नेमका हाच संदेश दिला आहे.
दहशतवादी हाफिज सईद किती शक्तिशाली झालाय, याची इम्रान खान यांना चांगली कल्पना आहे. पाकिस्तानची सत्ता काबिज करण्याची स्वप्ने हाफिज सईद पाहू लागला होता. त्यासाठी त्याने मिल्ली मुस्लिम लीग नावाचा पक्षही काढला. परंतु पाकिस्तान निवडणूक आयोगाने त्या पक्षास मान्यता दिली नाही. त्यामुळे या पक्षातर्फे निवडणूक लढविणे शक्य नाही हे दिसल्यावर त्याने अल्लाह-ओ-अकबर तहरीक पक्षाला पाठिंबा दिला. हाफिज सईदचे ५० उमेदवार या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले. त्याचा मुलगा हाफिज तल्हा सईद सरगोधामधील एनए-९१ व जावई खालिद वलीद पीपी-१६७ मतदारसंघातून उभे राहिले. त्यांचा हाफिज सईदने जोरदार प्रचार केला. मुलगा व जावयासह हाफिज सईदचे बहुतेक सर्व उमेदवार पराभूत झाले.
मुताहिद मजलिस-ए-अम्ल हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा धार्मिक समूह आहे. त्यांनी १७३ उमेदवार उभे केले. परंतु त्यातील बहुसंख्य हरले. या समूहाचे नेते मौलाना फजलूर रहमान यांनी जोरदार प्रचार केला. मुताहिदचे उमेदवार जिंकावेत यासाठी बड्या मुल्ला-मौलवींनी आपली ताकद पणाला लावली, पण त्यांना यश आले नाही. एखाद दुसरा उमेदवार व्यक्तिगत पातळीवर विजयी झाला. तहरीक-ए-लब्बाइक पाकिस्तान (टीएलपी)चीही तीच गत झाली. टीएलपीने उभे केलेले सर्व १०० हून अधिक उमेदवार पराभूत झाले. ‘पाकिस्तान सुन्नी तहरीक’ या कट्टरपंथी संघटनेचा पाठिंबा असूनही टीएलपीला यश मिळाले नाही.
या सर्व कट्टरपंथी व फुटीर शक्तींच्या पराजयाने इम्रान खान यांचे हात बळकट झाले असून मनात आणले तर या शक्तींना लगाम घालण्याची त्यांना हीच संधी आहे. दहशतवादी बलवान झाले तर ते एक दिवस पाकिस्तान रसातळास नेतील, हे इम्रान खान पुरते जाणून आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या हितासाठी त्यांना या दहशतवाद्यांचा बिमोड करावाच लागेल. खरंच तसे झाले तर पाकिस्तानचे भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यातही ते यशस्वी होतील. पाकिस्तानातील अनेक मित्रांशी मी याविषयी चर्चा केली व त्या सर्वांनी इम्रान खान भारताशी चांगले संबंध ठेवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. विजयानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तसा वादाही केला आहे. भारताने एक पाऊल पुढे टाकल्यास, आम्ही दोन पावले टाकू, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. ते ऊर्जावान व विकासाभिमुख मानसिकतेचे आहेत. ते समानता व एकतेचे समर्थक आहेत. भारताशी व्यापारी संबंध वाढविण्याची व काश्मीर प्रश्न सोडविण्याचीही त्यांनी भाषा केली आहे. गरिबी ही भारत व पाकिस्तानपुढील सर्वात मोठी समस्या आहे, हे ते जाणून आहेत खुशहाल, संपन्न व आनंदी पाकिस्तानचे स्वप्न त्यांनी उरी बाळगले आहे. पाकिस्तानने गमावलेली विश्वासार्हता त्यांना पुन्हा मिळवायची आहे. हे स्वप्न साकार करण्याची संधी त्यांना मिळत आहे. त्यांना सत्तेवर बसविणाºया तरुणाईच्या आकांक्षांची लवकरच पूर्तता झाली नाही तर मग अल्लाच तारू शकेल, याचेही त्यांना भान ठेवावे लागेल.
आणखी एक गोष्ट खास नमूद करायला हवी. पाकिस्तानमधील माध्यमांची आणि खास करून डॉन व जिओ समूहाची प्रशंसा करायला हवी. या माध्यमांनी कोणत्याही भीती व दबावाला बळी न पडता निर्भीड व निष्पक्ष भूमिका बजावली. इम्रान खान यांना याचाही नक्कीच फायदा मिळाला.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
मुद्दाम तुरुंगात जाण्यासाठी नवाज शरीफ निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तानात का परत आले, हा सर्वात जास्त चर्चेचा विषय राहिला. खरं तर लंडनमध्ये ते मोकळेपणाचे आयुष्य जगू शकले असते. खरं तर ते आपली संपत्ती व मालमत्ता वाचविण्यासाठी परत आले. परत आले नसते तर त्यांची मालमत्ता जप्त होऊ शकली असती. भले तुरुंगात राहिले तरी संपत्ती तरी वाचेल. शिवाय आपल्याला सहानुभूतीची मते मिळतील, असाही त्यांचा होरा होता. परंतु भ्रष्टाचाराचा कलंक लागलेल्या नवाज शरीफना पाकिस्तानच्या नव्या पिढीने अजिबात सहानुभूती दाखविली नाही!

Web Title:  Really Imran Khan dream of Pakistan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.