जोशी, राणेंना जमलं नाही, ते राऊतांनी 'करून दाखवलं'; आरपारच्या लढाईत शिवसेनेचं काय होणार?
By संदीप प्रधान | Published: February 17, 2022 09:13 AM2022-02-17T09:13:03+5:302022-02-17T09:13:47+5:30
मे महिन्यात राऊत यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आहे. सदस्य म्हणून असलेली त्यांची कवचकुंडले दूर होत असताना त्यांच्यावर घाव घातला तर पुन्हा त्यांना सदस्यत्व देणे शिवसेनेला अशक्य होईल ही देखील भाजपची खेळी आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
- संदीप प्रधान
शिवसेना राज्यातील सत्तेत सहभागी झाली. तिला मुख्यमंत्रीपद मिळाले. पण तीन पक्षात विभागलेल्या या सत्तेत सर्वाधिक सत्तेचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला होत असल्याचे बोलले जात होते. शिवसेनेतील अनेकांना सत्तेचा वाटा न मिळाल्याने नाराजी होती. शिवसेनेनी हिंदुत्वाचे आक्रमक राजकारण सोडले का, शिवसेना सेक्युलर झाला का, अशा अनेक प्रश्नांची भूते पक्षाभोवती फेर धरुन नाचत होती. शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला (खरे तर लावला गेला) त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यासारख्या आक्रमक नेत्यालाही आपण पुन्हा भाजपसोबत गेले पाहिजे, असे वाटू लागले.
शिवसेनेतील काही नेते चिडीचूप आहेत. कशाला उगाच त्यांना (भाजपला) दुखवा आणि अंगावर घ्या. उद्या ते आपल्या मागे हात धुवून लागतील, अशी भल्याभल्या नेत्यांची खासगीत भावना आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेऊन अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या, सत्ता येऊनही त्याचे सुख प्राप्त न झाल्याने दुःखी असलेल्या व वेगवेगळ्या एजन्सीच्या दमनशक्तीमुळे भयभीत झालेल्या शिवसैनिकांना उभारी दिली. राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या शेजारील खुर्चीवर आदित्य ठाकरे हे दिसले असते तर अधिक प्रभाव पडला असता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने त्यांना तेथे हजर राहणे अशक्य असले तरी आदित्य यांनी हजर राहायला हरकत नव्हती.
राज्यातील सरकारमधील अनेक मंत्री हे सत्तेची मजा चाखत आहेत परंतु भाजपच्या विरोधात ब्र काढत नाहीत. काही मंत्र्यांचे तर स्थानिक पातळीवर भाजपशी साटेलोटे असून विधानसभेतील आपल्या विजयाकरिता भाजपची मदत घ्यायची व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला छुपी मदत करायची, अशा खेळी करुन काही काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते राजकारणात तग धरुन आहेत.
अँटिलीया या इमारतीच्या खाली स्फोटके ठेवण्याच्या घटनेनंतर भाजपने राज्य सरकारवर अधिक आक्रमक हल्ले सुरु केले. या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवली. आजतागायत स्फोटके ठेवण्याकरिता अँटिलीयाची निवड का केली होती व या संपूर्ण प्रकरणात एखाद्या उद्योगसमुहातील बड्या मंडळींची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱया कुणाचा सहभाग होता का, याचे उत्तर मिळालेले नाही. किंबहुना हे सत्य बाहेर येऊ नये याकरिताच ही चौकशी एनआयएकडे सोपवली का, असा संशय घ्यायला वाव आहे. या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्याने सरकार बँकफूटवर गेले. मात्र एनसीबीच्या अमली पदार्थ विरोधी कारवाया व सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूबाबत केंद्रीय यंत्रणेला काहीच हाती लागले नाही हे स्पष्ट झाल्यावर नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवायांमागील अनेक रहस्यभेद केले. भाजपच्या मंडळींचा पंच म्हणून कारवाईतील सहभाग, पैशांची केली गेलेली मागणी, धमक्या देऊन वसुली, अधिकाऱयांची अँरिस्टोक्रँट जीवनशैली अशा असंख्य बाबी उघड करुन मलिक यांनी एनसीबीचे कथित सोवळे फेडले. मलिक यांच्या आरोपांनंतर रोज धडाकेबाज कारवाया करणारी एनसीबी अचानक लकवा मारल्यासारखी थंड का पडली हाही संशोधनाचा विषय आहे.
राहता राहिला विषय ईडीच्या कारवायांचा होता. शिवसेनेच्याच अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला असल्याने त्या आरोपांना उत्तर देणे ही त्या पक्षाची जबाबदारी होती. ती जबाबदारी राऊत यांनी उचलली आणि खचलेल्या शिवसैनिकांच्या कुडीत अक्षरशः प्राण फुंकले. ईडीचे अधिकारी हेही एनसीबीच्या अधिकाऱ्यांसारखे वसुलीत गुंतल्याचे जाहीरपणे बोलण्याचे धैर्य राऊत यांनी दाखवले. राऊत यांनी केलेल्या या कृतीमुळे अर्थात शिवसेनेत एक नवा पायंडा पडला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पक्षाची सूत्रे असताना त्यांनी सत्तेचा लगाम थेट आपल्या हाती कधीच घेतला नाही आणि पक्षावरील आपली पकड कधीच सोडली नाही. ठाकरे या चित्रपटात एक दृश्य आहे की, शिवसेनेत लोकशाही असावी याकरिता वनमाळी सभागृहात एका सभेचे आयोजन केले जाते. ही बातमी ठाकरे यांच्या कानावर गेल्यावर ते शिवसैनिकांना इशारा करतात व सैनिक ती सभा उधळून लावतात व सभा घेणाऱ्या नेत्याला बुकलून काढत बाळासाहेबांच्या पुढे उभा करतात. तेव्हा बाळासाहेब म्हणतात की, हा माझा पक्ष आहे आणि येथे काय होणार ते मी ठरवणार. बाळासाहेब यांनी युतीची पहिली सत्ता असतानाही आपले महत्त्व तसूभरही कमी होऊ दिले नव्हते.
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांच्या वयाच्या साठीनिमित्त सामना या पक्षाच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणून आपला कारभार स्वच्छ असून आपल्यावर व आपल्या कुटुंबावर कुठलाही आरोप नाही, असे विधान केले होते. त्यावेळी किणी प्रकरण गाजत होते. त्यानंतर अल्पावधीत जोशी यांच्या जावयाचे पुण्यातील बेकायदा टॉवरचे प्रकरण उघड झाले व पुढे त्यांना राजीनामा द्यावा लागला. जोशी हे मुरब्बी राजकारणी होते. मात्र ठाकरे यांच्या डावपेचांपुढे त्यांची डाळ शिजली नाही. नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले. त्यांना अल्पकाळ लाभला. मात्र राणे हे महत्वाकांक्षी होते. शिवाय त्यांचा दाम, दंड, भेद अशा सर्वच मार्गांवर भरवसा असल्याने त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले तर कदाचित ते संघटना ताब्यात घेतील ही भीती उद्धव यांना वाटत होती.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सत्ताधारी काँग्रेसचे काही आमदार मातोश्री क्लबवर नेऊन ठेवत राणे सत्ता उलथून टाकण्यात जवळपास यशस्वी झाले होते. मात्र एैनवेळी सत्ता उलथवून टाकण्याच्या या प्रयत्नांशी ठाकरे यांचा संबंध नाही, असे बाळासाहेबांनी जाहीर केल्याने राणे यांच्या महत्वाकांक्षेचा फुगा जमिनीवर आला. तेथेच उद्धव व राणे यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. पुढे राणे काँग्रेसमध्ये व नंतर भाजपमध्ये निघून गेले. आजही त्यांच्यातून विस्तव जात नाही. जोशी अथवा राणे यांना उच्चपदे मिळूनही शिवसेनेत आपला शब्द खरा करवून घेणे जमले नाही ती किमया राऊत यांनी करुन दाखवली हे या कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेतील वेगळेपण आहे व ते नाकारता येणार नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी संजय राऊत व अनिल परब या दोन्ही नेत्यांविरुद्ध कारवाईचा फास घट्ट आवळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे व तसे भाजपचे नेते पत्रकारांना खासगीत सांगत आहेत. त्याकरिता यच्चयावत नेते कामाला लागले आहेत. राऊत यांच्यावर कारवाई झाली तर शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ थंडावते. परब यांच्यावर कारवाई झाली तर कायदेशीर सल्ल्यापासून अनेक बाबतीत सरकारमधील निर्णयांमागील कर्ताकरविता जेरबंद होतो. असे झाल्यास मुख्यमंत्री ठाकरे यांची मोठी पंचाईत होऊ शकते. महापालिका निवडणूक राऊत व परब यांच्यासारख्या खंद्या योद्ध्यांखेरीज लढवणे शिवसेनेला कठीण जाऊ शकते. त्यातच मे महिन्यात राऊत यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आहे. सदस्य म्हणून असलेली त्यांची कवचकुंडले दूर होत असताना त्यांच्यावर घाव घातला तर पुन्हा त्यांना सदस्यत्व देणे शिवसेनेला अशक्य होईल ही देखील भाजपची खेळी आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
उद्धव यांना स्वतःला मुख्यमंत्रीपदामुळे राजकीय अभिनिवेशाचे दर्शन घडवण्यात असलेल्या मर्यादा व आदित्य ठाकरे यांना अनुभव व स्वभाव यामुळे असलेल्या मर्यादा या पोकळीत प्रथमच राऊत यांना ही संधी मिळाली. राऊत यांच्या आक्रमकतेची शिवसैनिकांना उभारी देण्याकरिता आज तरी गरज होती. शिवाय पक्षाला सत्ता दाखवणाऱया राऊत यांचा हात पकडून ठाकरे पिता-पुत्र आज इतके पुढे आले आहेत की, आता लागलीच राऊत यांचा हात सोडून त्यांना परत जाणेही शक्य नाही आणि राऊत यांना रोखणे हे पक्षाकरिता अहिताचे आहे हेही स्पष्ट दिसत आहे.
मनसेचा उदय झाल्यानंतर निवडणुकीत मराठी मते मनसेला मिळाल्यानंतर राऊत यांनी मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला, अशा आशयाचा अग्रलेख लिहिला होता. याबाबत बाळासाहेबांना विचारले असता त्यांनी मागे वळून राऊत यांना काय रे संजय तू असे लिहिलेस का, असा सवाल केला होता. राऊत यांनी तूर्त स्वीकारलेला पवित्रा शिवसैनिकांना उमेद देणारा आणि खुद्द त्यांनाही कदाचित जीवदान देणारा ठरु शकतो.