बंडखोर सारस्वत - गिरीश कर्नाड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 03:16 AM2019-06-11T03:16:52+5:302019-06-11T03:19:25+5:30
पुण्या-मुंबईत शिक्षण होऊनही गिरीश कर्नाड यांचे प्रमुख लिखाण कन्नड भाषेतून राहिले
पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिल्यानंतर त्याची कशी उत्कृष्ट नवनिर्मिती होऊ शकते याचा प्रत्यय गिरीश कर्नाड यांच्या साहित्याने साऱ्या देशाला दिला आहे. दिग्दर्शन असो, अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रांत मनमुराद आणि बुद्धिनिष्ठ मुशाफिरी करणाºया गिरीश कर्नाड यांच्या निधनाने भारतीय साहित्य आणि कलेचा एक तारा निखळला आहे. गेली ५० वर्षे भारतीय रंगभूमीच्या केंद्रस्थानी असलेले गिरीश कर्नाड यांच्या निधनाने मराठीतील सजग कलाप्रेमीही हळहळले. केवळ भाषेपुरते नव्हे, त्यांचे एकूण साहित्यातील योगदान मराठी साहित्यिकांना नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.
पुण्या-मुंबईत शिक्षण होऊनही गिरीश कर्नाड यांचे प्रमुख लिखाण कन्नड भाषेतून राहिले आणि इंग्रजी भाषांतरामुळे ते जगभर गाजले. कर्नाड यांना उत्तम मराठी येत होते. नगरच्या साहित्य संमेलनातील त्यांचे भाषण आजही कित्येकांच्या स्मरणात आहे. पौराणिक संदर्भ घेत त्यांनी समकालीन नाट्यलेखन केले. परंपरेशी जखडलेल्या विचारांची साखळी त्यांनी नाटकातून तोडली. विशेषत: त्यांनी उभी केलेली आधुनिक स्त्री पात्रे त्यांच्या बंडखोर विचारांची साक्ष देत होती. नागमंडल, हयवदन, ययाती अशा विविध नाटकांतून त्यांनी उभी केलेली पात्रे कालानुरूप असली तरी काळाच्या पुढचा विचार मांडणारी, पारंपरिकतेची चौकट मोडणारी, विचारांच्या मूळ गाभ्याला आव्हान देणारी, अस्वस्थ करणारी अशीच त्यांची मांडणी होती. बदललेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांची नोंद घेत त्यांचे नाटक पुढे सरकत असे. त्यांच्या तुघलक, तलेदंड, टिपू सुलतान या नाटकांतून त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक पात्रांना उभे केले आणि समकालीन बदलांचा विचार मांडला. विशेषत: ७० च्या दशकात भारतीय कलेने कात टाकायला सुरुवात केली होती त्याचे पडसाद कर्नाड यांच्या लेखनातून स्पष्ट दिसतात. कर्नाड यांनी विचारपूर्वक नाटकामध्ये नवीन फॉर्म्स आणले. ती मांडणी रंगभूमीला नवी दिशा देणारी ठरली.
पारंपरिकतेची चौकट मोडणारी विचारसरणी असल्याने ते नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांचा नवा विचार समजावून न घेता त्यांना अनेकदा टीकेचे लक्ष्य केले गेले. तरीही गिरीश कर्नाड कुठेही अस्वस्थ झाले नाहीत. त्यांनी अतिशय संयमितपणे स्थिती हाताळत आरोपांना उत्तर दिले. त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या. परंतु लोकशाहीत विचारांना विचारांनीच उत्तर द्यायला हवे या भूमिकेवर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यांच्या भाषणांतून त्यांनी अनेकदा ‘शहरी नक्षलवादा’चा पुरस्कार केला असा त्यांच्यावर आरोप केला गेला. बदलत्या आर्थिक आणि सामाजिक घडीची वैचारिक मांडणी करताना असा वाद उद्भवणे स्वाभाविक होते. परंतु कर्नाड यांनी कधीही कुठल्याही भाषणात अथवा लेखनात हिंसेचे समर्थन केले नाही. नवसमाज रचनेची मांडणी करताना प्रत्येक माणसाचा हक्क त्याला मिळालाच पाहिजे यावर ते ठाम असायचे. तरीही ते कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या ‘हिट लिस्ट’वर राहिले. विशेषत: गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांचा धोका वाढला होता. सुरक्षा यंत्रणांनी तसा अहवालही दिला होता. परंतु कर्नाड कुठेही विचलित झाले नाहीत. कडव्या धार्मिक ताठरतेच्या विरोधात ठाम भूमिका मांडत राहिले. २०१४ मध्येही पंतप्रधान मोदींच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची त्यांनी कधीही फिकीर केली नाही. नवा बंधमुक्त विचारच नवी शाश्वत वैचारिक बैठक निर्माण करू शकतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच विविध क्षेत्रांतील इतके सर्वोच्च पुरस्कार मिळूनही मूळ विचारांची नाळ तुटू न देता ते नवी मांडणी करीत राहिले. आयुष्यभर विचारांचा संघर्ष वाट्याला आला तरी कुठेही न डगमगता नाटक, अभिनय, दिग्दर्शन, लेखन क्षेत्रात मनमुराद मुशाफिरी केली. प्रतिभेचा अलौकिक स्पर्श असल्यामुळेच त्यांच्या हातून उत्कृष्ट निर्मिती होत गेली. ही निर्मितीच आता एक अमीट इतिहास बनून राहणार, यात शंका नाही.
मराठी नाटकाचा इतिहास विजय तेंडुलकर यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही; तसेच गिरीश कर्नाड यांचे नाव कर्नाटक रंगभूमीवर सुवर्णाक्षराने कोरून ठेवले जाईल. इतकी दर्जेदार निर्मिती त्यांनी करून ठेवली आहे.