समलिंगी संबंधांना मान्यता; समाजाचे प्रगतीच्या क्षेत्रात नवे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 03:02 AM2018-09-07T03:02:29+5:302018-09-07T03:02:49+5:30
समलिंगी संबंधांना अपराध ठरविणारे भारतीय दंडसंहितेचे ३७७ वे कलम घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत आणखी मोठी वाढ केली आहे.
समलिंगी संबंधांना अपराध ठरविणारे भारतीय दंडसंहितेचे ३७७ वे कलम घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत आणखी मोठी वाढ केली आहे. आजवर या कलमाने असे संबंध ठेवणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून शिक्षा सुनावल्या होत्या. या संबंधांची चर्चाही समाजात अनैतिक व असामाजिक ठरविली गेली होती. मात्र पाश्चात्त्य जगातील अनेक प्रगत देशांनी या संबंधांना नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरील एक अनिष्ट नियंत्रण ठरवून त्यांना मोकळीक देणारे कायदे आपल्या विधिमंडळात मंजूर केले वा त्यांना प्रशासकीय मान्यता दिली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे तर आपल्या भाषणांची सुरुवात ‘लेडीज, जंटलमेन अॅन्ड गेज’ अशी करून समलिंगी संबंधांचे केवळ समर्थनच करीत नसत तर त्यांना सांस्कृतिक मान्यता मिळवून देण्याचाही प्रयत्न करीत. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आरंभ तिच्या स्वत:च्या देहावरील संपूर्ण व अमर्याद अधिकारापासून होतो. आपला देह आपण कसा वापरायचा वा वापरू द्यायचा याविषयीचा संपूर्ण अधिकार त्या देहधारी व्यक्तीला असावा. त्या अधिकारावर दुसºया कुणाचेही, अगदी पती किंवा पत्नीचे नाते सांगणाºयाचाही हक्क नसावा, अशी भूमिका अलीकडच्या काळात अनेक प्रगत समाजांनीही घेतली. भारतातही पतीने पत्नीवर केलेला जबरी संबंध हा आता अपराध ठरविला गेला आहे. लैंगिक बाब ही शारीरिक आहे आणि ती व्यक्तीच्या स्वत:च्या शरीरावरील अधिकाराशी संबंधित आहे ही बाब जगाने आपल्या प्रगतीच्या वाटेवर मान्य केली आहे. मात्र अनेक कर्मठ व प्रतिगामी वर्ग आणि त्यांच्या संघटना, या अधिकारामुळे समाजात अनैतिकतेला वाढ मिळेल, स्त्रियांवरील अत्याचार वाढतील आणि समाजात एकूणच विस्कळीतपणा येईल अशी कारणे पुढे करून विरोध करीत होत्या. समाजातील काही संघटनांची ही भूमिका आणि घटनेने मान्य केलेला व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार यातील हा संघर्ष होता. त्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय होणे अपरिहार्य व आवश्यकही होते. ग्रीकांचा इतिहास या परंपरेचाही इतिहास आहे. सॉक्रेटिस, प्लेटो किंवा अॅरिस्टॉटल यांच्या अशा संबंधांची चर्चा तेथील मान्यताप्राप्त ग्रंथातही आली आहे. अहिताग्नी राजवाडे यांच्या भाष्यग्रंथातही या संबंधांचा साधा व मान्यताप्राप्त उल्लेख आला आहे. याखेरीज समाजाने उघडपणे मान्य केले असो वा नसो हे संबंध इतिहासात नेहमीच राहिले व वर्तमानातही ते तसे आहेत. स्कॅन्डीनेव्हिअन देशात या संबंधांना फार पूर्वी मान्यता मिळाली. आयर्व्हिंग वॅलेस या प्रसिद्ध कादंबरीकाराने त्या देशातील अशा संबंधांचे अतिशय खुले वर्णन आपल्या द प्राईज या कादंबरीत केले आहे. अगदी अलीकडे हिंदीत निघालेल्या द वॉटर या स्त्रियांच्या समलिंगी संबंधांवर आधारलेल्या चित्रपटाने काहीसा गहजब माजविला होता. त्यात काम करणाºया स्त्रियांची नावे सीता आणि गीता अशी ठेवली असल्याने शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला आक्षेप घेतला होता. मात्र तो आक्षेप त्या स्त्रियांच्या हिंदू नावांविषयीचाच होता. प्रत्यक्ष चित्रपटाला त्यांनीही विरोध केला नव्हता. केवळ पुरुषांच्या वा स्त्रियांच्या संघटनांकडून समलिंगी संबंधांवरील निर्बंधाला फार पूर्वीपासून आक्षेप घेतले गेले. विशेषत: लष्करी संघटनांनी या आक्षेपांना सरळ वाचाही फोडली होती. अलीकडच्या काळात अमेरिकेत सुरू झालेल्या ‘मी टू’ सारख्या चळवळी हा या मूक आक्षेपांचाच उद्रेक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय एकाएकी साºया समाजात मान्य होईल याची शक्यता कमी आहे. त्याला कोणताही पक्ष वा संघटना जाहीरपणे मान्यताही देणार नाही. मात्र व्यक्तिस्वातंत्र्य ही सामाजिक, राजकीय वा जातीय मान्यतेवर आधारलेली बाब नाही. ती सर्वस्वी व्यक्तिगत व खासगी स्वरुपाची बाब आहे.ती तशीच पाहिली पाहिजे व संबंधिताला ती अनुभवता येईल अशी सामाजिक स्थितीही तयार केली पाहिजे. एका अर्थाने या निकालाने समाजाचे प्रगतीच्या क्षेत्रात एक नवे पाऊलच पुढे केले आहे.