राम मंदिराचे पुनर्निर्माण ही तर आनंदाची बाब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 12:40 AM2020-08-05T00:40:42+5:302020-08-05T00:40:52+5:30

अयोध्येतील सोहळ्याच्या अनुषंगाने जर मंदिर जीर्णोद्धार आणि मंदिर निर्माण किंवा मंदिर पुनर्निर्माण या विषयांची चिकित्सा करायची झाल्यास, प्रथम मंदिराचा जीर्णोद्धार

Reconstruction of Ram temple is a matter of happiness | राम मंदिराचे पुनर्निर्माण ही तर आनंदाची बाब

राम मंदिराचे पुनर्निर्माण ही तर आनंदाची बाब

googlenewsNext

डॉ. दिनेश वैद्य

हिंदू देव-देवतांच्या उपासना पंथासाठी किंवा वेगवेगळ्या पंथांच्या उपासनेसाठी अनेक प्रकारची मंदिरे आपल्याला संपूर्ण भारतवर्षात दिसतात. संपूर्ण भारतवर्ष म्हणजे आजकालच्या अफगाणिस्तानपासून ते इंडोनेशियापर्यंत अनेक मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. ही मंदिरे वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्या ऋषिमुनींच्या पद्धतीने अथवा मंदिर शिल्पशास्त्र यांच्या पद्धतीने बांधलेली असतात. या मंदिरांसाठी अनेक पूजापद्धती आहेत आणि अनेक प्रकारच्या रूढी, परंपरादेखील आहेत. आपल्याकडे आजचा चाललेला मोठा विषय म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्येतील मंदिर. आज या मंदिराचा जीर्णोद्धार होत नसून, त्याचे पुनर्निर्माण होत आहे.

अयोध्येतील सोहळ्याच्या अनुषंगाने जर मंदिर जीर्णोद्धार आणि मंदिर निर्माण किंवा मंदिर पुनर्निर्माण या विषयांची चिकित्सा करायची झाल्यास, प्रथम मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे एक सद्य:स्थितीत असलेल्या मंदिराला थोडीफार डागडुजी करून अथवा काही नविनीकरण करून केलेले काम म्हणजे मंदिर जीर्णोद्धार, तसेच एखाद्या मंदिराची पूर्णपणे नवीन बांधणी करणे आणि त्याच्यासाठीचा मंदिर बांधण्याचा संकल्प हाही नवीन असणे म्हणजे नवीन निर्माण. अयोध्येच्या राम मंदिराबद्दल बोलायचे झाल्यास मंदिर जुन्या किंवा त्याच स्वरूपात अथवा थोड्या वेगळ्या पद्धतीने नवीन बांधकाम म्हणजे जुन्याच मंदिराचा संकल्प उद्धृत करून पुन्हा बांधकाम हे मंदिराचे पुनर्निर्माण करणेच होय. आजचा राममंदिराच्या दृष्टिकोनातून आसेतू हिमाचल हिंदू लोकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची बाब म्हणजे राममंदिर पुनर्निर्माण होत आहे. आता हे होणारे मंदिर निर्माण हे अनेक शैलींवर आधारित आहे. जसे जुन्या पद्धतीच्या शैली पाहिल्यास काश्यप शिल्प पद्धती, मानसार शैली, मयमत, हेमाडपंथ यानुसार शिल्प पद्धती आणि काही मिश्र पद्धती तसेच दक्षिण भारतात जी मंदिर बांधणीची पद्धती आहे, त्यानुसारदेखील मंदिरे बांधली जातात.

वैदिक किंवा पौराणिक पद्धतीने मंदिर बांधून झाल्यानंतर तसेच मंदिर बांधण्याच्या आधी अनेक प्रकारचे विधी असतात. या विधींमध्ये अगदी गणेशपूजनापासून भूमिपूजनापर्यंत हे विधी मंदिर बांधण्याच्या आधी होतात आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने तिथे ‘शाला कर्म’ करून मंदिर भूमी शुद्ध करून त्यावर मंदिर निर्माण प्रक्रि या सुरू होते. संपूर्ण मंदिर बांधून झाल्यानंतर मंदिर प्रतिष्ठा! थोडक्यात या देवतेसाठी उत्तम असा आवास तयार करणे, हे कार्य मंदिर प्रतिष्ठेतून होते आणि संपूर्ण मंदिर प्रतिष्ठा हे कार्य पूर्ण झाल्यानंतर मंदिराचा उत्सर्ग होतो. मंदिर उत्सर्ग म्हणजे मंदिर बांधून झालंय; पण मंदिरामध्ये जर कोणी भक्त जाऊ शकणार नसेल तर त्या मंदिराला दुरवस्था प्राप्त होते. त्यात मूळ मंदिर बांधण्याचा संकल्प हा सर्व जनतेकरिता देवाची कृपादृष्टी प्राप्त करून घेण्याचा एक मार्ग म्हणून असतो आणि त्यात जर मंदिरात जाता येत नसेल तर त्या मंदिराला जीर्ण अवस्था प्राप्त
होते. म्हणून मंदिर बांधण्याच्या पद्धतींमध्ये पूर्णत्व झाल्यानंतर वैदिक प्रक्रि येनुसार मंदिर उत्सर्ग म्हणजेच सर्व जनतेकरिता हे मंदिर खुले केले जाते.
वैदिक प्रक्रि येनुसार अनेक प्रकारचे विधी विधान या मंदिर प्रतिष्ठेच्या कार्यामध्ये केले जातात. अगदी मंदिराच्या साध्या छोट्या-छोट्या दगडाच्या पूजनापासून ते मंदिरात स्थापित केल्या जाणाऱ्या देवतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधी व त्यानंतर कलशारोहणापर्यंत हा विधी पार पडतो. यात असंख्य प्रकारची हवनं असतात. त्यात विशेष प्रकारच्या सर्व औषधी साहित्याने या सर्व देवतांची मोठी पूजा होते. मुळात मंदिर पद्धती म्हणजेच पूर्णपुरुष, म्हणजे जी देवता मंदिरात प्रतिष्ठित आहे तीच देवता होय. मंदिराच्या बाहेरचा म्हणजे ‘विमान’मधला भाग म्हणजे ‘सभा मंडप’ आणि जिथे देवता प्रतिष्ठित आहे तो भाग म्हणजे ‘गर्भगृह’. एवढ्या सगळ्यांना व्यापून पूर्णत्वाला आलेली अशी देवता पूर्ण होते आणि त्याला वर उद्धृत केल्याप्रमाणे पूर्णपुरुष ही संज्ञा दिली जाते. राममंदिराचे पुनर्निर्माण होतेय ही खूप आनंदाची बाब आहे, त्यासाठी अशाप्रकारचा वैदिक विधी आणि बांधकाम शैली यातून या सोहळ्यांबरोबर मंदिराचे महत्त्वदेखील अधोरेखित होते आहे.

(लेखक व्यास रिसर्च सेंटर, नाशिकचे अध्यक्ष आहेत)

Web Title: Reconstruction of Ram temple is a matter of happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.