रस्ता दुरुस्तीचे नवे तंत्र वापरून अपघात कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:22 AM2018-08-02T04:22:46+5:302018-08-02T04:23:05+5:30

रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाती मरण आलेल्यांची संख्या चकीत करणारी आहे. २०१७ सालात रस्त्यातील खड्ड्यांनी देशभरात ३५९७ लोकांचे जीव घेतले. याचा अर्थ दररोज १० लोकांचा बळी खड्ड्यांमुळे गेला आहे.

 Reduce the accident using new road repair techniques | रस्ता दुरुस्तीचे नवे तंत्र वापरून अपघात कमी करा

रस्ता दुरुस्तीचे नवे तंत्र वापरून अपघात कमी करा

Next

- डॉ. एस.एस. मंठा
(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू)

रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाती मरण आलेल्यांची संख्या चकीत करणारी आहे. २०१७ सालात रस्त्यातील खड्ड्यांनी देशभरात ३५९७ लोकांचे जीव घेतले. याचा अर्थ दररोज १० लोकांचा बळी खड्ड्यांमुळे गेला आहे. २०१६ सालापेक्षा हे आकडे ५० टक्के जास्त आहेत. त्यातील महाराष्टÑाचा वाटा ७२६ आहे. याचा अर्थ खड्ड्यांमुळे मृत पावणाऱ्यांची संख्या दरवर्षी दुपटीने वाढते आहे. एकूणच रस्ता सुरक्षा व्यवस्थाच बळी गेली आहे असे म्हणावे लागते. त्या तुलनेत दहशतवाद आणि नक्षलवाद यामुळे बळी गेलेल्यांची संख्या ८०० म्हणजे खूपच कमी आहे. तेव्हा रस्त्यातील खड्डे हे अधिक चिंताजनक म्हणावे लागतील. अर्थात कोणताही मृत्यू हा समर्थनीय नसतो. पावसाळा आला की रस्त्यांना खड्डे हे पडणारच आणि त्यामुळे लोकांचे प्राण हे जाणारच हे राज्य सरकारांनी गृहित धरले आहे. जबाबदार लोकांची या बाबतीतील बेजबाबदार वृत्ती ही धक्कादायक आहे. अशा अपघातात कुटुंबप्रमुख दगावून कुटुंबाच्या तोंडचा घास जेव्हा हिरावला जातो, तेव्हा संपूर्ण पिढीला स्वत:ची फसवणूक झाल्यासारखे वाटते. एकीकडे राष्टÑीय आरोग्य विम्याच्या माध्यमातून आपल्या देशातील ५० टक्के लोकांच्या आरोग्य सुरक्षिततेचा सरकार विचार करीत असताना काही लोकांना त्यांचा कोणताही अपराध नसताना प्राणास मुकावे लागणे हे चिंताजनक आहे. वास्तविक हेच लोक नियमितपणे कर भरून सरकारच्या योजनांना हातभार लावत असतात.
देशापाशी सुयोग्य साधनांचा अभाव असण्याच्या स्थितीतून सरकार कशा तºहेने मार्ग काढणार आहे? अशा स्थितीत रस्त्यात खड्डे का पडतात हेही समजून घ्यायला हवे. डांबरी सडकांना खड्डे पडणे ही गोष्ट रचनात्मक दोषातून घडत असते. रस्त्यात पाणी साचणे आणि त्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहने जाणे यामुळे रस्त्यात खड्डे पडतात असा निष्कर्ष अमेरिकेच्या लष्करी अभियंत्यांनी काढला आहे. पावसामुळे रस्त्यावरील डांबराचा थर कमजोर होतो आणि त्यावरून वाहने गेल्याने वरचा थर उखडला जातो आणि खालची गिट्टी उघडी पडते. सतत वाहने जाण्याने हा खड्डा वाढत जातो. रस्त्याचा वरचा थर पुरेसा जाड नसल्यानेही खड्डे पडण्यास मदतच होते. रस्त्यावरील मॅनहोलमधून पाणी वाहून गेले नाही, तर पाणी तुंबल्यामुळेही रस्ते कमजोर होतात.
भारतातील रस्त्यातच खड्डे होतात असे नाही तर साºया जगातील रस्ते खड्ड्यामुळे प्रभावित झाल्याचे दिसून येते. ग्रेट ब्रिटेनमध्ये रस्ता दुरुस्तीवर दरवर्षी २० बिलियन पौंड एवढी रक्कम खर्च होते. पण आपल्या देशात रस्त्यांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष अधिक चिंताजनक आहे. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार मुंबई महानगरपालिकेने २०११ ते २०१६ या पाच वर्षाच्या काळात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी रु. १४,५०० कोटींची तरतूद केली होती. पण त्यापैकी केवळ रु. ११,००० कोटी खर्च करण्यात आले. एकट्या २०१७ साली रु. ५१८३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्या खर्चाचे निष्पन्न काय झाले? निम्न दर्जाच्या वस्तूंचा वापर करून केलेली कामे खराबच होणार! याशिवाय वाहनांच्या टायर्समध्ये भरण्यात येणाºया जास्त हवेमुळे आणि गाड्यांच्या तुटलेल्या अ‍ॅक्सेलमुळे रस्ते खराब होण्यास मदतच होते. या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांना जो धोका होतो त्याचा फटका महानगरपालिकांना सहन करावा लागतो आणि अनावश्यक खटल्यात गुंतून पडावे लागते.
अपघातांमुळे जीवितहानी तर होतेच पण पैसाही वाया जातो. हे काही चांगल्या प्रशासनाचे लक्षण नाही. एवढे होऊनही हे खड्डे दुरुस्तीचे जे तंत्रज्ञान आहे तेही तितकेच निराशाजनक असते. रस्ता दुरुस्त करणारे त्या खड्ड्यात गिट्टी आणि डांबर ओतून डागडुजी करतात. पण ते तात्पुरत्या मलमपट्टीप्रमाणे ठरते. या संकटाचा कायमचा बंदोबस्त करण्याचा मार्ग शोधायला हवा. दोन वर्षांपूर्वी हे खड्डे पेव्हर ब्लॉकचा वापर करून बुजविण्यात येत होते पण ती पद्धत आता थांबविण्यात आली आहे. कारण हे ब्लॉक्स जागेवरून हलतात आणि त्यामुळे रस्ता असमान होऊन वाहनांसाठी व पायी चालणाºयांसाठी तो अधिकच धोकादायक ठरतो.
तुर्कस्थानच्या इस्तंबुल येथील दाहीर इन्सॅट या कंपनीने खड्डे दुरुस्तीचे नवीन तंत्र विकसित केले आहे. ते ‘पॉट होल क्रशिंग पॉवरहाऊस’ म्हणून ओळखले जाते. त्यात इंटरनेट सेन्सॉरचा वापर केला जातो. त्यामुळे बागेतील किडे मारावेत तितक्या सहजपणे हे खड्डे नाहीसे केले जातात. खड्डे भरून काढण्याऐवजी हे मशीन खड्ड्याभोवतीची जागा कापून काढते. जणू एखादा कॅन्सरचा ट्यूमर काढावा इतक्या अचूकपणे हे काम केले जाते. ते मशीन तो खड्डा स्वच्छ करते. त्यानंतर रोबोटच्या हाताने त्या खड्ड्यात अगोदर तयार केलेली स्लॅब बसविण्यात येते. ती खड्ड्यात बसवल्यानंतर आकाराने वाढते व त्या खड्ड्यात अचूक बसते. जणू तेथे खड्डा नव्हताच इतके हे काम चांगले होते. परंपरागत पद्धतीपेक्षा हे काम कमी वेळात आणि चांगल्याप्रकारे होते. त्यामुळे वाहने चालविताना कोणतेही धक्के बसत नाही.
खड्डे दुरुस्त करण्याची आणखी एक पद्धत लॅरी झॅन्को या शास्त्रज्ञाने तयार केली आहे. त्यात त्यांनी मायक्रोवेव्हचा वापर केला आहे. त्यामुळे खड्डे गरम करण्यात येतात. त्यानंतर त्यात मॅग्नेटाईट आणि रिसायकल केलेले डांबर भरण्यात येते आणि त्यावर स्प्रे करून तो खड्डा सील करण्यात येतो. खड्डा अगोदर गरम केल्याने रस्ता दुरुस्तीचे काम मजबूत होते. आणखी एका पद्धतीत प्लास्टिकचा वापर खड्डा भरण्यासाठी करण्यात येतो. प्लास्टिकच्या गोळ्या तयार करून त्या गिट्टीऐवजी डांबरात मिक्स करण्यात येतात. एक टन डांबरात ३ ते १० किलो प्लास्टिक वापरण्यात येते. स्टँडर्ड अ‍ॅस्फॉल्टपेक्षा हे मिश्रण घालून बुजवलेले खड्डे अधिक काळ टिकतात असे दिसून आले आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी अशातºहेच्या नव्या पद्धतीने रस्ते दुरुस्त करणे हितावह ठरणार आहे.
आता खड्डे बुजविण्याचे जुने तंत्र वापरणे बंद करून नव्या पद्धतीने खड्डे बुजविणे सुरू करायला हवे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम वेगवान आणि अधिक मजबूत होईल. यापुढे नवीन रस्ते तयार करताना रस्त्याचा पृष्ठभाग नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मजबूत केल्यास रस्ते दीर्घकाळ तर टिकतीलच पण रस्त्यावर होणाºया प्राणघातक अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास त्यामुळे मदत होईल. प्रवाशांच्या जीविताची काळजी आणि कामाविषयीची बांधिलकी यामुळेच हे शक्य होऊ शकेल.

Web Title:  Reduce the accident using new road repair techniques

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.