पावसाळी छत्र्यांसारख्या उगवणाऱ्या ‘रिल स्टार्स’चे करायचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 06:36 AM2024-07-20T06:36:45+5:302024-07-20T06:36:59+5:30

प्रत्येकालाच झटपट प्रसिद्ध व्हायचे आहे. ‘सेलिब्रिटी’ बनायचे आहे. त्यासाठीचा सोपा मार्ग काय, तर रिल्स ! पण त्यासाठीचे भान कोण बाळगणार?

Reels Star Special Editorial Article | पावसाळी छत्र्यांसारख्या उगवणाऱ्या ‘रिल स्टार्स’चे करायचे काय?

पावसाळी छत्र्यांसारख्या उगवणाऱ्या ‘रिल स्टार्स’चे करायचे काय?

डॉ. अंजली मुळके, माजी वैद्यकीय अधिकारी

रिल्सच्या नादात आणखी किती जणांचे बळी जाणार आहेत, याची कल्पनाही करवत नाही, इतक्या घटना एकामागोमाग घडत आहेत. सुशिक्षित, उच्चसुशिक्षित लोकही त्यात मागे नाहीत, याला काय म्हणावे?

असा एकही दिवस जात नाही, की रिल्सच्या नादात कोणी  जीव गमावलेला नाही. अशा कित्येक उदाहरणांत, परवाच आणखी एकाची भर पडली. मुंबईतील व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट असणारी आणि हौसेने ट्रॅव्हल ब्लॉगर असणारी, अन्वी कामदार ही तरुणी रायगडमधील सह्याद्रीच्या एका कड्यावरून रिल्स बनवताना दरीत कोसळली आणि दुर्दैवाने मृत्युमुखी पडली.

मागची मोजकीच काही वर्षे झाली, या देशातील खूप मोठ्या तरुणवर्गाला रिल्सचे प्रचंड वेड लागलेले पाहायला मिळत आहे. ऊठसूट, कोणत्याही ठिकाणी, कोणीही रिल्स करताना दिसतो. ते करताना काही सामान्य भान पाळत असल्याचेही दिसत नाही. जो-तो हातात मोबाइल घेऊन आटापिटा करीत पटकन प्रसिद्धी मिळविण्याच्या मार्गावर जोर लावून धावू लागला आहे.

आपले फॉलोअर्स वाढवणे, त्यातून प्रसिद्धी मिळवणे, याचा हव्यास सर्वत्र वाढत चालला आहे. यामागे शोधलं तर एक खोलवर मूळ दिसू शकेल, ते म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी! ‘सेलिब्रिटी’ होण्याचा, मान मिळवण्याचा हव्यास, अट्टाहास..!

आपल्या देशात कितीही शिकलेली व्यक्ती असो, की न शिकलेली मंडळी, आपल्याभोवती प्रसिद्धीचे वलय असावे, याचा एक छुपा हव्यास प्रत्येकात दडलेला आहे. आपले बॉलिवूड स्टार्स आणि राजकारणी मंडळी यांचाही यात प्रचंड मोठा वाटा आहे.

राईभर कर्तृत्वाच्या मनाने अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात पैसा आणि प्रसिद्धी मिळताना आपण पाहतो. राजकारणात आणि अभिनयात प्रत्येकाला यशस्वी होता येईलच असे नाही; पण त्याकडे तरुणांचा, लोकांचा ओढा मोठा असतो, पुढारकी करायची असते आणि स्टायलिशही राहायचे असते. मग सोपा मार्ग काय, तर हातात असलेला मोबाइल!

मोबाइलच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा एक सोपा, सहज मार्ग प्रत्येकालाच उपलब्ध झाला आहे.  यातूनच ‘रिल्स स्टार’ पावसाळी भूछत्र्यांसारखे जन्म घेऊ लागले आहेत. वेगवेगळे ब्लॉगर्स निर्माण होऊ लागले आहेत. बेरोजगारीमुळे तरुण मंडळी जास्त प्रमाणात या सोप्या(!) वाटणाऱ्या मार्गाकडे वळताना दिसत आहे; पण हळूहळू हा अतिहव्यास कित्येक जणांची माती करीत असल्याची कित्येक उदाहरणे आपण रोज पाहतो आहोत. पुढच्यास ठेच लागल्यावरदेखील मागचे शहाणे होत नाहीत, हे फार मोठे दुर्दैव आणि शोकांतिका आहे.

या मोबाइलने जितका फायदा केला, त्याहून अधिक नुकसान केले आहे, करत आहे, हे वास्तव आहे. विशेष दुखणे या गोष्टीचे आहे की, आजकालच्या मुलांना आई-वडील आणि इतर अनुभवी व्यक्तींचे सल्ले ऐकणे म्हणजे त्यांच्या स्वैराचारावर, ज्याला ते त्यांचे तथाकथित स्वातंत्र्य म्हणतात, त्यावर गदा आणणे वाटते..!

आयुष्य जगणे म्हणजे काहीतरी अचाट, वेगळे करणे, एन्जॉयमेन्ट म्हणजे सामाजिक नीतीनियम, कायदे धुडकावून लावत विपरीत वागणे हीच व्याख्या वाटते..!

विशेष म्हणजे बरबाद होत जाणाऱ्या या तरुण पिढीकडे सरकार, राजकारणी मंडळीही सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचाच अनुभव नेहमी दिसतो.

हातातील या वितभर गॅझेटच्या माध्यमातून असंख्य बेरोजगार तरुण-तरुणी वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडत व्यसने, गुन्हेगारी आणि पैसा-प्रसिद्धीच्या शॉर्टकट मार्गाकडे धाव घेत आहेत. पालक, सर्व समाज आणि सरकारने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. तरुण पिढीच देशाचे पुढचे भविष्य आहे. रिल्ससारख्या क्षुल्लक गोष्टींच्या नादी लागून ती वाया जात असतील तर त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.

Web Title: Reels Star Special Editorial Article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.