अन्वयार्थ लेख: इलेक्ट्रिक बाइक... घ्यावी की न घ्यावी? खप तर प्रचंड वाढतोय पण....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 07:52 AM2024-08-16T07:52:01+5:302024-08-16T07:52:34+5:30
सरलेल्या आर्थिक वर्षात देशात इलेक्ट्रिक बाइकच्या खपात २६ टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद आहे. तब्बल ८ लाख इलेक्ट्रिक बाइक या वर्षात विकल्या गेल्या.
- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई
स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचे धोरण अंगीकारले. त्यामुळे अनेक उद्योग सरकारी नियंत्रणात राहिले. त्यातलाच एक उद्योग म्हणजे वाहन निर्मिती. ८०च्या दशकापर्यंत या क्षेत्रावर हिंदुस्तान मोटर्स आणि प्रीमियर ऑटोमोबाइल या दोनच कंपन्यांची मक्तेदारी होती. उच्चभ्रू वर्गाला परवडतील अशाच गाड्यांची निर्मिती या दोन कंपन्यांकडून व्हायची. त्यामुळे मध्यमवर्गासाठी चारचाकी हे स्वप्नच होते. मात्र, १९८१ मध्ये मारुती उद्योग समूहाचा वाहन निर्मिती क्षेत्रात प्रवेश झाला आणि बघता-बघता मारुतीने या क्षेत्रात आपली मक्तेदारी निर्माण केली. मध्यमवर्गाला, त्यातही उच्च मध्यमवर्गाला चारचाकी घेणे परवडू लागले.
दुचाकी क्षेत्राचीही तीच कथा. स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रथम प्राधान्य देण्यात आले कारखानदारीला. त्यातही अभियांत्रिकीला अधिक. त्यामुळे अवजड उद्योगांना अधिक झुकते माप देण्यात आले. पायाभूत सुविधांच्या निर्मितीलाही प्राधान्य देण्यात आले. रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधा उत्तम असतील, तर वाहनांची निर्मिती योग्य ठरू शकते, असा तत्कालीन धोरणकर्त्यांचा विचार होता. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ते योग्यच. काळाची पावले ओळखत बजाज ऑटोने १९४५ पासून दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांना १९५९ मध्ये दुचाकी निर्मितीचा परवाना भारत सरकारकडून प्राप्त झाला. त्यानंतर बजाजची दुचाकी निर्मितीत घोडदौड सुरू झाली. त्यानंतर यथावकाश अन्य कंपन्यांनी या क्षेत्रात आपले पाय रोवले आणि भारतीयांना अधिकाधिक दुचाकींचे पर्याय उपलब्ध करून दिले.
हा सर्व इतिहास आठवायचे कारण म्हणजे भारतात इलेक्ट्रिक बाइकचा वाढत असलेला खप. दुचाकी क्षेत्रात भारतात गेल्या कैक दशकांमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. बजाजनंतर हिरो होंडा, सुझुकी, महिंद्रा, टीव्हीएस, रॉयल एन्फिल्ड यांनी अनंत प्रकारच्या दुचाकी भारतीय बाजारात उतरवल्या. विशेषत: तरुण वर्गाला डोळ्यासमोर ठेवून या कंपन्यांनी स्कूटर आणि बाइक्सची निर्मिती केली. तरुणाईने त्यास प्रचंड प्रतिसाद दिला. तरुणांनंतर नोकरदार महिलांसाठी योग्य ठरेल, अशा स्कूटरही बाजारात आल्या. अर्थात त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देशात चारचाकीपेक्षा अजूनही दुचाकीलाच अधिक प्राधान्य दिले जाते. त्यातही ग्रामीण भागात आणि दुसऱ्या-तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये स्कूटर-बाइक घेण्याकडेच ग्राहकांचा कल असतो.
भारतातील दुचाकी निर्मिती क्षेत्र आता कूस बदलण्याच्या स्थितीत आहे. बाइक निर्मात्या कंपन्यांची पुढची पायरी आहे, ई-बाइक्सची निर्मिती. दिवसेंदिवस भारतात इलेक्ट्रिक बाइकची मागणी वाढू लागली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात देशात इलेक्ट्रिक बाइकच्या खपात २६ टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद आहे. तब्बल ८ लाख इलेक्ट्रिक बाइक मार्चअखेरपर्यंत विकल्या गेल्या होत्या आणि दिवसेंदिवस सातत्याने या प्रकारच्या बाइकची मागणी वाढत आहे. याला कारण केंद्र सरकारचे धोरण. पर्यावरणाच्या दृष्टीने कमी कर्ब उत्सर्जन करतील, अशा गाड्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले जावे, असे आवाहन केंद्राने वाहन निर्मात्या कंपन्यांना केले आहे. वाहन उद्योगानेही केंद्राच्या या सूचनेचे स्वागत करत अनेक नामवंत ब्रॅण्ड्सनी ई-बाइकच्या निर्मितीला वेग दिला आहे. भारतीय बाजारपेठेचा आकार लक्षात घेत अनेक परदेशी कंपन्यांनी येथे गुंतवणुकीसाठी उत्सुकता दर्शवली आहे.
लोकांचाही आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे. येत्या दशकभरात इंधनावर धावणाऱ्या वाहनांची जागा इलेक्ट्रिक बाइक, रिक्षा, कारने घेतली, तर आश्चर्य वाटणार नाही.