पत्रमहर्षी अनंत भालेरावांचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:59 AM2018-11-24T01:59:04+5:302018-11-24T01:59:55+5:30
मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक नि विशेषत: पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा उमटविणाऱ्या पत्रमहर्षी अनंत भालेरावांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
- बी.व्ही. जोंधळे
आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक
मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक नि विशेषत: पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा उमटविणाऱ्या पत्रमहर्षी अनंत भालेरावांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. वारकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अनंतरावांवर भागवत धर्माचे संस्कार झाले होते हे खरे; पण त्यांची खरी वैचारिक जडणघडण झाली ती हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यातच. स्वामी रामानंद तीर्थ हे अनंत भालेरावांचे श्रद्धास्थान असल्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यातून स्वामी रामानंद तीर्थांविषयीचा आदरभाव पदोपदी व्यक्त झालेला दिसतो. पत्रकारितेबरोबरच एक शिक्षक, एक फर्डा, पल्लेदार वक्ता, एक उत्तम राजकीय कार्यकर्ता, अशा विविधांगी भूमिकाही त्यांनी समर्थपणे पेलल्या.
नेहमी हसतमुख असणारे अनंतराव अतिशय स्पष्टवक्ते होते. जे पटेल ते समोरच्याची भीडभाड न ठेवता ते बोलून मोकळे होत असत. त्यांचा जनसंपर्क अफाट असल्यामुळे त्यांचा संपादकीय दरबार सदोदित सर्वांसाठी मोकळा असायचा. अनंतराव अष्टपैलू खरे; पण त्यांनी ‘मराठवाड्या’चे संपादक म्हणून जी लढाऊ पत्रकारिता केली ती दीर्घकाळ स्मरणात राहील, अशीच आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सेनानी आ.कृ. वाघमारे यांनी १० फेब्रुवारी १९३८ ला‘मराठवाडा’ साप्ताहिकाची मुहूर्तमेढ रोवली होती; पण निजाम सरकारने ‘मराठवाडा’वर बंदी आणल्यामुळे वाघमारे यांनी मग निरनिराळी ११ नावे धारण करून ‘मराठवाडा’ सुरू ठेवला. निजामविरोधी लिखाणामुळे आ.कृ. वाघमारे यांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना दीड वर्षाची शिक्षाही झाली. अशा या लढाऊ ‘मराठवाडा’ साप्ताहिकाचे अनंतराव १९५३ साली संपादक झाले. आ.कृ. वाघमारे यांचा लढाऊबाणा त्यांनी साप्ताहिक ‘मराठवाडा’, अर्धसाप्ताहिक ‘मराठवाडा’ व पुढे दैनिक ‘मराठवाडा’तून कायम जोपासला. संपादक म्हणून भालेरावांच्या आयुष्यात अनेक वादळे निर्माण झाली; पण या वादळांना न डगमगता त्यांनी ती धीरोदात्तपणे सहन केली. ‘मराठवाडा’ अर्धसाप्ताहिकातून भालेराव यांनी पन्नालाल सुराणा यांचा साखर कारखान्यासंदर्भात एक लेख छापला होता. लेखात असा आरोप करण्यात आला होता की, साखर कारखान्यात पोत्यामागे २ रुपये कापून घेतात. या आरोपाचा रोख तत्कालीन पुरवठामंत्री होमी तल्यारखान यांच्या दिशेने होता. त्यांनी भालेराव-सुराणांवर अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला. खटल्याच्या कामकाजाच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होऊ नयेत म्हणून होमी तल्यारखान यांच्या मागणीनुसार हा खटला इनकॅमेरा चालविण्यात आला. भालेराव-सुराणांना ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. भालेराव-सुराणांनी माफी मागितली तर त्यांची शिक्षा माफ करण्यात येईल, असा देकारही सरकारने दिला होता; पण तो नाकारून भालेराव-सुराणांनी आम्ही केलेले आरोप सिद्ध करू शकलो नाही, अशी भूमिका घेऊन तुरुंगवास पत्करला. शिक्षा भोगून जेव्हा भालेराव-सुराणा बाहेर आले तेव्हा लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी सत्कार झाले; पण या स्वागताने हुरळून न जाता ‘ठेवितो हा पायी जीव थोडा’ या मथळ्याचा अग्रलेख लिहिताना भालेरावांनी ‘या तुरुंगवासाने नव्या भ्रमात अडकण्याचा प्रमाद आम्ही करणार नाही’ असे म्हटले. तात्पर्य, जमिनीवर पाय असणारा हा लढाऊ संपादक होता. १९७५ साली आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह करून त्यांनी १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. लढाऊपणा हा अनंतरावांच्या पत्रकारितेचा बाणा असल्यामुळे ‘मराठवाडा’ म्हणजे भालेराव, असे समीकरणच महाराष्टÑात रूढ झाले होते.
अनंत भालेरावांनी प्रारंभी ‘मराठवाडा’ पत्रातून दलितांच्या प्रश्नांना भरीव स्थान दिले होते. दलित साहित्याची चर्चा करणारा पहिला दिवाळी अंकही त्यांनी प्रसिद्ध केला होता; पण नामांतराचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा त्यांनी मराठवाड्याच्या अस्मितेच्या नावाखाली नामांतरास विरोध केला. लोकशाहीनुसार लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात एकमताने संमत केलेला नामांतराचा ठराव नाकारला. मराठवाड्याच्या अस्मितेने खेडोपाडी दलितांवर मन हेलावणारे अत्याचार केले; पण याचा खेद कोणाही नामांतरविरोधकाने कधीही व्यक्त केला नाही. मराठवाड्यातील दलितांना मराठवाड्याची अस्मिता नव्हती वा नाही, असे नाही; पण नामांतरवाद्यांची अस्मिता बंधुत्वाच्या नात्याने समजून घेण्यात अनंतराव कमी पडले. हैदराबाद मुक्तिसंग्रामात दलितांनी भाग घेतला; पण मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिताना अनंतरावांनी दलित स्वातंत्र्यसैनिकांची साधी नोंदही घेतली नाही. पत्रकार आणि इतिहासकार म्हणून भालेरावांनी दलित समाजास न्याय दिलाच नाही, ही खंत आंबेडकरानुयायांच्या मनात कायम घर करून राहिली; पण याची जाणीव पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावरही अनंतरावांच्या समर्थकांना अजूनही होत नाही. अनंतरावांच्या नामांतरविषयक भूमिकेचा विपर्यास करण्यात आला, असे ते अजूनही म्हणतात. ही बाब खेदजनकच म्हटली पाहिजे. बाकी अनंतराव पत्रकार म्हणून मोठेच होते. त्यांचे मराठवाडा प्रेम वादातीत होते, याविषयी शंकाच नाही.