पुन्हा विकासाचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 06:04 AM2018-04-29T06:04:45+5:302018-04-29T06:04:45+5:30
राज्यात २५ ते २८ वर्षांपूर्वी कोकणातील एन्रॉन वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत राजकारण रंगले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी एन्रॉनला अरबी समुद्रात बुडविण्याची घोषणा केली होती
- नारायण जाधव
राज्यात २५ ते २८ वर्षांपूर्वी कोकणातील एन्रॉन वीजनिर्मिती प्रकल्पाबाबत राजकारण रंगले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी एन्रॉनला अरबी समुद्रात बुडविण्याची घोषणा केली होती, परंतु त्यांची संचालक असलेली रिबेका मार्क मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटल्यानंतर, समुद्रात बुडविलेल्या एन्रॉनचे काम रखडत सुरू झाले. त्याने अद्यापही पूर्ण क्षमतेने काम सुरू केलेले नाही. असाच प्रकार जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत घडला. शिवसेनेने कोकणच्या अस्मितेच्या नावाखाली त्यास विरोध केला. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे मतही ‘मातोश्री’ने विचारात घेतले नाही. आता कोकण प्रांतातील नाणार येथील तेल शुद्धिकरण प्रकल्पावरून सर्वच राजकीय पक्षांत सुंदोपसुंदी सुरू आहे.
नाणार प्रकल्पामुळे कोकणचे पर्यावरण धोक्यात येईल, कोकणचे सौंदर्य नाहीसे होईल, कोकणी माणूस देशोधडीला लागेल, असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेना, काँगे्रस-राष्ट्रवादी, मनसे आणि नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने या प्रकल्पास विरोध केला आहे. राज्यात सत्ताधारी भाजपाच या प्रकल्पाच्या बाजूने असून, प्रकल्पामुळे कोकणचा कसा विकास होईल, हे सांगत आहे. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच हा किल्ला लढविताना दिसत आहेत.
नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धिकरण प्रकल्पाच्या मुद्द्यावर सामान्यांच्या मनाचा ठाव घेतला, तर प्रकल्प पाहिजे, असे फार कुणी सांगत नाही. अगदी मुंबईतील कोकणी माणूसही अपवाद नाही. कोकण म्हटले म्हणजे निसर्ग, समुद्र, गडकोट, किल्ले. कोकणात पर्यटन उद्योगाची वाढ व्हावी, याकरिता फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. केवळ त्याबाबतच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा होत आहेत. उलट, कोकणाच्या माथी प्रदूषणकारी प्रकल्प मारले जात आहेत. याच मानसिकतेतून नाणारला विरोध होत आहे. पर्यावरणवाद्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवला, तर त्यात तथ्य वाटते.
एन्रॉन वीजनिर्मिती प्रकल्प आला, तेव्हा त्यालाही कोकणात विरोध झाला होता. अरबी समुद्रात प्रकल्प बुडविण्याच्या गर्जना पुढे जादूची कांडी फिरल्यासारख्या मावळून गेल्या. प्रकल्पाचे भूत कोकणाच्या मानगुटीवर बसले. हजारो कोटी रुपये त्यावर
खर्च झाले. राज्य वीजमंडळ
यामुळे कायमचे विकलांग झाले.
त्यानंतर, झाला तो जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा वाद. यात विरोध
करणाऱ्यांवर गोळीबार झाला. एका तरुणास गोळीबारात प्राणही गमावावे लागले.
विरोधाचे मागचे राजकारण
आता तसाच विरोध नाणारच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पाला होत आहे. हा आशियातील सर्वात मोठा तेल शुद्धिकरण प्रकल्प असणार आहे. त्यासाठी १५ हजार एकर जमीन अधिग्रहित केली जाणार असून, १४ गावांना तो गिळंकृत करणार आहे. याशिवाय, प्रकल्पासाठी वापरल्या जाणाºया जमिनीवर १२ लाख ६४ हजार हापूसची, सहा लाख १३ हजार
काजू, नारळ, सुपारी यांची झाडे
आहेत. ४५ हजार नागरिकांच्या
साडेआठ हजार कुटुंबांवर विस्थापनाचा बुलडोझर चालणार आहे, तसेच
साडेपाच हजार घरेगोठे नाहीसे होणार आहेत. यामुळे या प्रकल्पास विरोध
होऊ लागला आहे, तसेच कोकणचे पर्यावरणही यामुळे धोक्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.