वणवा पुन्हा पेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 08:12 PM2017-08-09T20:12:34+5:302017-08-09T20:12:47+5:30

२७ मधून ९ वजा केले तर शिल्लक काय? या अकबराच्या प्रश्नाचे उत्तर बिरबलाने दिले आणि बादशहा चक्रावला. उत्तर होते शून्य. आजचा प्रश्न असाच आहे. साडेतीन महिन्यांच्या पावसाळ्यातील ९ नक्षत्रे ही पावसाची. ज्याची सुरुवात मृगापासून होते. यावर्षी मराठवाड्यावर ही नक्षत्रे रुसली आहेत.

Repeated incense | वणवा पुन्हा पेटला

वणवा पुन्हा पेटला

Next

- सुधीर महाजन

२७ मधून ९ वजा केले तर शिल्लक काय? या अकबराच्या प्रश्नाचे उत्तर बिरबलाने दिले आणि बादशहा चक्रावला. उत्तर होते शून्य. आजचा प्रश्न असाच आहे. साडेतीन महिन्यांच्या पावसाळ्यातील ९ नक्षत्रे ही पावसाची. ज्याची सुरुवात मृगापासून होते. यावर्षी मराठवाड्यावर ही नक्षत्रे रुसली आहेत. पावसाळ्याचे आणि विशेषत: भरपूर पावसाची नक्षत्रे कोरडी जात आहेत आणि दिवसागणिक दुष्काळाचे ढग अधिक काळेकुट्ट होताना दिसतात. रोज काळजी वाढवतात. दुष्काळाचे चटके सोसून खेडी अगोदरच बकाल झाली आहेत. या अवर्षणाने तर खेड्यांचा सारा जीवनरस शोषून घेतलेला दिसतो. गप्पांचे पार मुके बनले. शिवारातील पिकांनी माना टाकल्या. विहिरी खोल गेल्या म्हणण्यापेक्षा आटल्या. पाण्यासाठी पायपीट आणि ट्रॅक्टरची प्रतीक्षा वाढली. डोकी भणानून गेली. कानाभोवती फेर घालणाºया चिलटांनी तर वातावरण आणखी भकास केले. प्रत्येक जण एकमेकांशी बोलताना बोलण्याची क्रिया पार पाडताना दिसतो. हवा-पाण्याच्या गप्पा होतात. कुठे पंधरा मिनिटे पाऊस झाल्याची बातमीही अंगावर पिसारा फिरवल्यासारखी वाटते. मनातली हिरवळ दाटून येते. डोळे मिटले की हिरवाई पसरते, उघडताच उन्हाळा जाणवतो.
पूर्वीसारखा पाऊस भरवशाचा राहिला नाही. तो झड धरत नाही. संध्याकाळचा पाऊस पाहुण्यासारखामुक्कामाला थांबायचा. श्रावणात ऊन-पावसाचा खेळ चालायचा. लोखंड्या झोडपून काढायचा, हे रंग पावसाचे बदलले, त्याचा स्वभाव बदलला. तो बेभरवशाचा झाला, माणसासारखा. माणसाचा तरी काय भरवसा. सोशल मीडियाच्या युगात तर माणसातील किती नवनवीन राक्षसी प्रवृत्ती उफाळून येताना दिसतात. माणूसपण संपलं का, असा प्रश्न पडतो. परवाची मुंबईची बातमी. एका फ्लॅटमध्ये वृद्ध महिलेचा सांगाडाच सापडला. मुलाला चार महिन्यांनंतर आईची आठवण झाली. यावरून माणूसपणाचे मोजमाप केले तर पावसाचे काय चुकले? तो मुक्कामाला थांबत नाही. आपणही आप्तस्वकीयांकडे सुख-दु:खाच्या समाचाराला गेलो तरी टाकणं टाकल्यासारखं धड त्यांच्या आनंदात किंवा दु:खात मनापासून सामील होत नाही, मग पावसाने तरी का कोसळावे. फक्त पाऊसच बदलला नाही, तर माणूसही बदलला आहे.
वराहमिहिरापासून ते आजपर्यंत पावसाचे ठोकताळे मांडले गेले. या निकषांचा आधार घेऊन अंदाज वर्तविले जातात; पण पाऊस मात्र हुलकावणी देतो. आजही आधुनिक तंत्रज्ञानाला त्याच्या लहरीपणाचा अंदाज येत नाही. यावर्षी सरासरीच्या ९४ टक्के पाऊस होणार, असे भाकीत केले गेले. देशभरातील पावसाची सरासरी विचारात घेऊन हे भाकीत असते आणि कागदावर तेवढा पाऊस पडतो.
आपल्याकडे कोकण, प. महाराष्ट्रातील पाऊस ही सरासरी भरून काढतो; पण मराठवाडा आणि विदर्भ कोरडे राहतात, हे काही यावर्षीचे नाही. पाच वर्षांतून तीन वर्षे तरी हाच पावसाचा स्वभावधर्म राहिला आहे. म्हणजे कागदावरचा पाऊस समाधानकारक असला तरी मराठवाडा, विदर्भाची जमीन आसुसलेली, भेगाळलेलीच असते. वातावरणातील हा कोरडेपणा मनात झिरपतो. मन कोरडे होते. झटझटून काही करण्याची जीवनेच्छा संपते. हे आता जागोजागी दिसत आहे. माणसातील कोरडेपणा प्रखरपणे जाणवतो. यावर्षी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही नक्षत्रे संपली. चार नक्षत्रांमध्ये २६ दिवस पाऊस झाला, पण तोही सर्वत्र झालेला नाही. पिकांनी माना टाकल्याने यापुढे पाऊस आला तरी उत्पादनात ६० टक्के घट असेल. म्हणजे पिके कुपोषित बनली. पावसाने दडी मारली की, त्याचा रुसवा काढण्यासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे’ असा एक कार्यक्रम खेड्यापाड्यातून चालतो. लहान मुलांच्या अंगावर कडुनिंबाच्या पानांचे डगळे बांधून मिरवणूक काढतात आणि मिरवणुकीवर घराघरातून पाणी ओतले जाते. कधी महादेवाचे देऊळ पाण्याने भरून टाकतात, पिंड बुडेपर्यंत पाणी ओतले जाते. आता हे सारे निष्फळ ठरत आहे. खरे तर श्रद्धेला बसणारा धक्का; पण दरवर्षी ‘धोंडी धोंडी...’ यंत्रवत केले जाते. यज्ञ, याग, भंडारा यांचाही बोलबाला आहेच; पण पाऊस काही पडत नाही.
यंदाचे वर्ष भयानक दिसते. आतापर्यंत ५१८ शेतकºयांनी फासात मान अडकवून घेतली. एक दोरी किंवा टोपणभर कीटकनाशक. सोप झालं आहे मरण. सगळ्याच वेदना. काळजी झटक्यात संपवण्याचं सोपं साधन या शेतक-याने शोधले. जुगाड करीत जगण्याची जन्मजात कला असलेल्या बळीराजाने मरणाचाही ‘जुगाड’ केला, आता तर हे दु:ख आकडेवारीत जाऊन बसले. आता दरमहिना, दरवर्षी स्कोअर पाहायचा, एवढी निगरगट्ट मनं बनली. जसा दुष्काळ पसरत जाईल तसा हा स्कोअर वाढत जाणार. बरं झालं याचे काही पावसासारखे निकष शोधले नाहीत. दुष्काळाच्या वणव्याची एवढी सवय झाली की, आता काही वाटतच नाही. कारण मन रितं झालं, कोरडं झालं. जमीन आणि मन याचा ओलावाच काय तो प्राण असतो बाकी कलेवर.

Web Title: Repeated incense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.