पुन्हा ‘संतोष’ जाहला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 02:20 PM2018-10-11T14:20:21+5:302018-10-11T14:21:47+5:30
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पुन्हा एकदा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातावर बांधले
मिलिंद कुलकर्णी
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पुन्हा एकदा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हातावर बांधले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चौधरी यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या निर्णयक्षमता, समयसुचकतेचा परिचय करुन देणारा आहे. पालिका निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय पटलावरुन काहीसे बाजूला पडलेले चौधरी पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत, असाच याचा अर्थ आहे. एकेकाळी भुसावळ म्हणजे संतोष चौधरी असे समीकरण होते.स्थानिक नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य, बाजार समिती, जिल्हा बँकेचे संचालकपद अशी सत्तेची सर्व पदे चौधरी यांच्या समर्थकांकडे असायची. जिल्हा नेते सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांनी एकत्र येऊन चौधरी यांची पालिकेतील सद्दी संपविण्यासाठी प्रयत्न करुनही यश मिळालेले नव्हते. चौधरी हे स्वत: पक्ष आहेत. ते ज्या पक्षात जातील, त्या पक्षाची सत्ता याठिकाणांवर येत असे. नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार अशा चढत्या क्रमाने पदे पादाक्रांत करणाऱ्या चौधरी यांनी शिवसेना, राष्टÑवादी, पुन्हा शिवसेना आणि पुन्हा राष्टÑवादी काँग्रेस व्हाया जनआधार पार्टी असा प्रवास केला. पदे न मिळाल्यास नेत्यांशी संघर्ष करुन पक्षबदल करण्याचा पायंडा चौधरी यांनी पाडला. पण निसर्गनियमानुसार प्रत्येकाचा काळ असतो. ठराविक काळानंतर मावळती येतेच तसेच झाले. भाजीविक्रीचा व्यवसाय करत असताना तारुण्यात ते शिवसेनेकडे आकर्षिले गेले. सेनेतून राजकीय कारकिर्द सुरु केल्यानंतर आमदारकीसाठी पक्षाने तिकीट नाकारल्यावर बंडखोरी केली. राष्टÑवादीत असताना मंत्रिपद दिले नाही, म्हणून पक्षनेतृत्वावर टीका करीत बंड पुकारले. परंतु वैशिष्टय असे की, पक्ष बदलला तरी कार्यकर्ते चौधरी यांच्यासोबत राहिले. काहींनी दगा दिला, पण त्यांनी पर्वा केली नाही. भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यावर चौधरी यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या संजय सावकारे यांना उमेदवारी दिली आणि निवडून आणले. मंत्रिपद न मिळाल्याने पक्षाविरुध्द बंड ठोकणाºया चौधरी यांच्याच समर्थक सावकारे यांना राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने राज्यमंत्रीपद व पालकमंत्रीपद दिले. जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे चौधरी यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. सावकारे यांनीही भाजपामध्ये प्रवेश करुन आमदारकी टिकवली. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वामुळे सावकारे यांनी पुढे पालिकेत भाजपाची सत्ता आणण्यात वाटा उचलला. चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लागला. सेनेत राहूनही त्यांनी पालिकेत जनआधार नावाच्या स्वत:च्या आघाडीमार्फत निवडणुका लढवल्या. आता राष्टÑवादीत पुन्हा प्रवेश करुन त्यांनी काय साधले, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क केले जात आहे. त्यांचे धाकटे बंधू अनिल चौधरी यापूर्वीच भाजपामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये सत्ता कुणाचीही आली तरी चौधरी बंधूंपैकी एक जण सत्ताधारी पक्षासोबत राहील, हे निश्चित.