नेपाळला पश्चात्ताप, भारताला संधी; वाढलेला दुरावा आता सांधायचा आहे...

By विजय दर्डा | Published: November 2, 2020 06:15 AM2020-11-02T06:15:48+5:302020-11-02T06:16:15+5:30

india-nepal : चीनने ज्या ज्या देशाला आपल्या पंखाखाली घेतले, तिथल्या संसाधनांवर ताबा मिळवण्याचा  प्रयत्न त्यादेशाने केला हे ओली यांना माहीत नसेल, असे नव्हे. ‘रॉ’च्या प्रमुखांनी त्यांच्याशी काय कानगोष्ट केली नकळे, पण त्यातून कळीचे मुद्दे ओलीना  समजले असावेत.

Repentance to Nepal, opportunity to India; The increased distance is now to be bridged ... | नेपाळला पश्चात्ताप, भारताला संधी; वाढलेला दुरावा आता सांधायचा आहे...

नेपाळला पश्चात्ताप, भारताला संधी; वाढलेला दुरावा आता सांधायचा आहे...

Next

-  विजय दर्डा 
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

नेपाळनेभारताची साथ सोडली आहे असे वाटत असतानाच आपली गुप्तचर संस्था ‘रॉ’चे प्रमुख सामंत कुमार गोयल यांनी नेपाळचे पंतप्रधान  के. पी. शर्मा यांची भेट घेऊन एकांतात बोलणी केली. त्यानंतर दसऱ्याला ओली यांनी नेपाळचा जुनानकाशा ट्विट केला आणि देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.ओली आणि नेपाळच्या भूमिकेत हा मोठा बदल आहे. चीनच्या दडपणाखाली नेपाळने तयार केलेला नकाशा हे भारत-नेपाळमधील तणावाचे मुख्य कारण होते. नेपाळी संसदेने तो संमत केलेल्या या नकाशात लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भारतीय हद्दीतील क्षेत्र नेपाळी हद्दीत दाखवले होते. स्वाभाविकपणे भारताने ते फेटाळले. चीनच्या प्रभावाखाली येण्यापूर्वी ओली भारताचे समर्थक होते. त्यामुळे भारतीय प्रयत्नांना त्यांनी प्रतिसाद दिला.

चीनने ज्या ज्या देशाला आपल्या पंखाखाली घेतले, तिथल्या संसाधनांवर ताबा मिळवण्याचा  प्रयत्न त्यादेशाने केला हे ओली यांना माहीत नसेल, असे नव्हे. ‘रॉ’च्या प्रमुखांनी त्यांच्याशी काय कानगोष्ट केली नकळे, पण त्यातून कळीचे मुद्दे ओलीना  समजले असावेत. अर्थात नेपाळमधले चीन समर्थक पुढारी त्यावरून ओलींवर टीका करत आहेत. ‘रॉ’प्रमुखानी माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल, माधवकुमार आणि नेपाळी कॉंग्रेसचे शेर बहादूर देऊबा यांचीही भेट घेतली, असे सांगितले जाते. नंतर पण नेपाळने त्याचा इन्कार केला असला, तरी या भेटीना काहीना काही अर्थ असणारच.    आणखी एक महत्त्वाची गोष्ट ! दिनांक ४ ते ६ नोव्हेंबर या दरम्यान  भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे नेपाळला भेट देत आहेत. ते कशासाठी जात असावेत, हा प्रश्न यासंदर्भात मोठा कळीचा आहे. दोन्ही देशात १९५० सालापासून एका खास प्रथा आहे.

भारत आणि नेपाळ एकमेकांच्या लष्करप्रमुखाना जनरलची उपाधी देत असतात. नरवणे यांच्या नेपाळ दौऱ्यात  राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी ‘जनरल ऑफ द नेपाळ आर्मी’ या उपाधीने भारतीय सेनाध्यक्षाना सन्मानित करतील. हा महत्त्वाचा संकेत आहे. अलीकडेपर्यंत ओली १९५०च्या शांती समझौत्यावरही टीका करत होते. जनरल नरवणे यांना मिळणाऱ्या सन्मानाचा अर्थ असा की नेपाळला आता भारताबरोबरच्या जुन्या परंपरा सांभाळायच्या आहेत. शिवाय या दौऱ्यात जनरल नरवणे नेपाळचे सेनाध्यक्ष जनरल पूर्णचंद्र थापा आणि इतर ज्येष्ठ सेना अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत. रॉचे प्रमुख आणि नरवणे यांच्या नेपाळभेटीने चीनच्या नाकाला मिरच्या झोंबणार हे उघडच आहे.

भारत - नेपाळदरम्यान १८०० किलोमीटरची सीमा असून, भारताला घेरण्यासाठी चीनने नेपाळला आपल्या कह्यात घ्यायला सुरुवात केली आहे. चीनच्या सांगण्यावरूनच ओली भारताविरुद्ध बोलू लागले. इतकेच नव्हे तर चीनने  तिबेटच्या सीमेलगतच्या  अनेक नेपाळी गावांवर कब्जा केला. त्यावर नेपाळचे सामान्य लोक आणि माध्यमांनी टीका सुरू केली. त्यामुळेच  ओली यांना आलेले चीन प्रेमाचे भरते उतरणीला लागण्यास सुरुवात झाली असावी. त्यात  भारताने परस्परसंबंध सुधारण्यात पुढाकार घेतल्यावर  भारतप्रेमाची जुनी कहाणी ओली यांना आठवली असेल, तर त्यांचे घसरलेले गाडे रुळावर येऊ शकते. भारत आणि नेपाळ यांच्यातले स्नेहबंध फार जुने आहेत. नेपाळच्या अनेक नेत्यांचे, पंतप्रधानांचे शिक्षण भारतातच झालेले आहे.  

कोणी दिल्लीत, कोणी बनारस  हिंदू विश्व विद्यापीठात तर कोणी कोलकात्यात शिकायला होते. राज्यसभा सदस्य झाल्यावर मी दिल्लीत ७, गुरुद्वारा या रकाबगंज रस्त्यावरील बंगल्यात राहत होतो. तेथे आधी प्रख्यात समाजवादी नेते राममनोहर लोहिया राहत असत. त्यांच्याबरोबर नंतर नेपाळचे प्रधानमंत्री झालेले गिरिजाप्रसाद कोईराला त्याच वास्तूत वास्तव्याला होते.  कोईराला भारतात आले असता त्यांना मी बंगल्याची आठवण दिली. ते ऐकताच कोईरालांनी त्या प्रसन्न आठवणींना आनंदाने उजाळा दिला. भारत-नेपाळ यांच्यातील संबंधाना अशा व्यक्तिगत संदर्भांची मोठी लोभस अशी झालरही आहे. भारतासोबतच्या या जुन्या स्नेहबंधाना चीन हा काही पर्याय असू शकत नाही, हे सध्याचे पंतप्रधान ओली आणि अन्य नेते चांगलेच जाणून आहेत. भारताने आजवर कधीही  दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लावलेला नाही.  

चीन मात्र विस्तारवादी धोरणासाठी ओळखला जातो. दुसरे म्हणजे भारत आणि नेपाळ  धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अर्थाने परस्परांमध्ये इतके मिसळलेले  आहेत की त्यांना एकमेकांपासून वेगळे करताच  येणार नाही. दोन्ही देशात रोटीबेटी व्यवहार होतात. आंतरराष्ट्रीय स्थलांतरित संघटनेचा २०१९चा अहवाल सांगतो की, नेपाळ मधले ३० ते ४० लाख लोक भारतात राहतात. ५ ते ७ लाख भारतीय नेपाळमध्ये राहतात. नेपाळच्या शूर गुरख्यांचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत मोठा वाटा आहे. जनरल माणेकशा एकदा म्हणाले होते,  जर कोणी म्हणत असेल की ‘मी मरणाला भीत नाही’ तर एकतर तो खोटे बोलत आहे किंवा गुरखा आहे.’

नेपाळमधले गुरखे हिंमतवान शौर्याचे अस्सल प्रतीक मानले जातात, ते उगीच नव्हे! नेपाळ आपला भाऊ आहे आणि त्याला चीनच्या चालबाजीपासून वाचवण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. २०१५ सालच्या अघोषित आर्थिक नाकेबंदीसारख्या चुका आपणही केल्या आहेत. पण आता वेळ अशी आलीय की इतिहासातील चुका बाजूला ठेवून खुल्या दिलाने एकमेकांना जवळ केले पाहिजे. भारत मोठा असल्याने आपली जबाबदारी अर्थातच  अधिक आहे.  नेपाळ कायम भारताचा भाऊ होता, मित्र होता आणि राहील.. हे आपणच चीनला दाखवून दिले पाहिजे.

vijaydarda@lokmat.com

Web Title: Repentance to Nepal, opportunity to India; The increased distance is now to be bridged ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.