प्रजासत्ता ते महासत्ता
By Admin | Published: January 25, 2017 11:23 PM2017-01-25T23:23:45+5:302017-01-25T23:23:45+5:30
प्रजासत्ताक दिन अर्थात सामान्य माणसाच्या संविधानिक स्वातंत्र्याची ग्वाही ! भारताला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; परंतु हा स्वातंत्र्याचा उद्घोष
प्रजासत्ताक दिन अर्थात सामान्य माणसाच्या संविधानिक स्वातंत्र्याची ग्वाही ! भारताला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; परंतु हा स्वातंत्र्याचा उद्घोष जितका देशभक्तीने भारलेला होता तितकेच महत्त्वाचे होते या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखताना देशाला एकसंध राखणे आणि प्रत्येकाला मुक्त स्वातंत्र्याचा अनुभव देणे. भारत देश मात्र विविधतेने नटलेला. विविध जातीधर्मात विभागलेला, प्रादेशिक अस्मितेने घट्ट बांधलेला... असे असताना सर्वमान्य होईल आणि देशाला समानतेच्या एका धाग्यात बांधून ठेवेल असे काहीतरी हवे होते. केवळ स्वातंत्र्य मिळाले इतके पुरेसे नसून आता देशात लोकांची सत्ता अर्थात प्रजासत्ताक निर्माण झाले आहे ही भावना सुरुवातीपासून रुजायला हवी होती. देशाची राज्यघटना ही त्या भारतीय प्रजासत्ताकाची मुहूर्तमेढ होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने देशाची राज्यघटना साकारली आणि या देशाला एक घटनात्मक चौकट प्राप्त झाली. देशाचे संवैधानिक स्थैर्य आणि त्या स्थैर्याच्या बळावर होणारी विकासाची वाटचाल यांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्याने निर्माण केलेल्या मूल्यांचे अधिष्ठान आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारत हे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले ते या देशातील जनतेची व सत्ताधाऱ्यांचीही सत्य, अहिंसा, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या जगन्मान्य मूल्यांएवढीच लोकशाही व धर्मनिरपेक्षता या मूल्यांवरही निष्ठा आहे म्हणूनच. देशावर किती आव्हाने आली; पण या देशातील लोकांनी ती समर्थपणे पेलली. देशाची एकसंधता अबाधित राखली. गुलामीच्या पाशातून मुक्त झालेला भारत आज महासत्ता बनण्याच्या दिशेने समर्थपणे वाटचाल करू लागला आहे. आजमितीला प्रजासत्ताक दिन आपण उत्साहात साजरा करतोय. उद्योगधंदे, पायाभूत सुविधा यात प्रगती करतानाच भारताने अण्वस्त्रे आणि सामरिक सुसज्जता तर प्राप्त केलीच; पण चांद्रयान, मंगळमोहीम यातही पुढे राहून अवकाशातही स्वत:चे नाव कोरले.
२५ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरनगरीत राष्ट्रीय सभेच्या ४४व्या अधिवेशनाला सुरवात झाली याच अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘स्वराज्य’ या शब्दाचा अर्थ ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ असा घोषित केला. त्याच क्षणी पं. नेहरुंच्या हस्ते तिरंगा राष्ट्रध्वज महात्मा गांधीजींच्या साक्षीने फडकवला गेला. संपूर्ण स्वातंत्र्याची ही घोषणा देशभर पसरली. २ जानेवारी १९३० च्या बैठकीत ‘२६ जानेवारी’ हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून देशभर पाळण्यात यावा असा ठराव करण्यात आला. त्या आदेशानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून देशभर साजरा झाला. १५ आॅगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले व हा २६ जानेवारी विस्मरणात जाणार का? असे वाटत असतानाच सुदैवाने याच दिवशी देशाची राज्यघटना अमलात आणली गेली. हा एक सुवर्णयोग! आज भारताने जागतिक पातळीवर स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. अर्थात त्याचे श्रेय राज्यव्यवस्थेला जसे आहे तसेच देशाने सार्वभौम राष्ट्र म्हणून दिलेल्या स्वीकृतीलाही आहे. आपली सत्ता लोकशाही मार्गाने प्रस्थापित होते. लोकशाही प्रगल्भ आणि समृद्ध होईल तेवढा प्रगतीचा वेग वाढणार. कोणत्याही देशाची प्रगती त्या देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवर निर्भर करते. भारतात कोणत्या पक्षाचे सरकार सत्तारूढ आहे यापेक्षा ते लोकशाही पद्धतीचे आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे, हे महत्त्वाचे ! गेल्या साडेसहा दशकांहून अधिक काळ अनेक राजकीय स्थितंतरे झाली; पण या राजकीय स्पर्धेतही लोकशाही प्रणाली अस्तित्व टिकवून राहिली. जगात अनेक देशांची उलथापालथ होत असताना भारताने मात्र जी विविधतेत एकता जपली आहे ती पाहून अवघे जग स्तिमित होते. लोकांना त्यांचे व्यक्तिगत व सामूहिक स्वातंत्र्य देणारी लोकशाही देशात रुजली आहे; परंतु ती अधिक परिपक्व होण्याची मात्र नितांत गरज आहे. जनादेशाच्या आधारेच देशावर सत्ता कोणाची हे निर्धारित होते. बहुपक्षीय व्यवस्था, निवडणुकांचा घोडेबाजार यामधून भारतीय निवडणूक प्रक्रियेत अनेक गैरप्रकारही शिरलेले दिसतात. जे लोकशाही प्रक्रियेला गालबोट लावतात. देशाचे सार्वभौमत्व टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याची जाणीव आपल्याला असायला हवी. हक्क उपभोगताना कर्तव्याची जाणीव हवी. प्रजासत्ताक दिनी हेच भान मनामनात जागृत व्हावे व आपला प्रजासत्ताक देश महासत्ताक व्हावा, हीच सदिच्छा.
- विजय बाविस्कर