संमेलनातील ठराव!

By admin | Published: February 6, 2017 12:06 AM2017-02-06T00:06:16+5:302017-02-06T00:06:16+5:30

सध्या डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. गेल्या आठवड्यात अकोल्यात राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे सूप वाजले.

Resolution of the meeting! | संमेलनातील ठराव!

संमेलनातील ठराव!

Next

सध्या डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. गेल्या आठवड्यात अकोल्यात राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे सूप वाजले. फेब्रुवारीअखेर गडचिरोलीमध्ये अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. हल्ली दर महिना-दोन महिन्यांनी कुठे तरी साहित्य संमेलन होत असते. साहित्य व साहित्यिकांचा उत्सव साजरा व्हावा, त्यामध्ये विविध विषयांवर मंथन व्हावे याबाबत दुमत नाही; पण साहित्य संमेलनांची जेवढी संख्यात्मक वाढ झाली, तेवढीच गुणात्मक वाढ झाली आहे का, याचाही विचार झाला पाहिजे. या साहित्य संमेलनामध्ये ज्या विषयांवर चर्चा होते, त्या चर्चांमधून समाजाला, सत्ताधाऱ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न होतो; मात्र एकाच दिवशी पार पडणाऱ्या चार ते पाच परिसंवादांमधून असा संदेश प्रसृत होण्याऐवजी, केवळ संमेलनाचा उत्सवी उपचार तेवढा पार पडतो असा आक्षेप इतर कुणाकडून नव्हे, तर साहित्य क्षेत्रातील धुरिणांकडूनच घेतला गेला आहे. सर्व साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी व ठराव या दोन गोष्टी समान असतात. अलीकडे ग्रंथदिंडीमध्ये इतर ग्रंथांसोबतच लोकशाहीची मूल्ये रुजविणाऱ्या राज्यघटनेलाही सन्मानाने स्थान दिले जाते, ही बाब गौरवास्पद; मात्र साहित्य संमेलनांमध्ये पारित होणाऱ्या ठरावांची दखल घेतली जाते का, यावर विचारमंथन झाले पाहिजे. साहित्य संमेलनातील ठराव व त्यांचे भवितव्य हा विषय तसा नवा नाही. या विषयावर अनेकदा भाष्य झाले आहे; मात्र उत्तर मिळाले नाही. साहित्य संमेलनात पारित होणारे ठराव हे समाजमनाचा विचार बोलून दाखविणारे ठराव असतात. त्यामुळे या ठरावांची दखल घेऊन त्या अनुषंगाने राज्यकर्त्यांनी धोरण ठरविणे, उपाययोजना करणे अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात मात्र हे ठराव म्हणजे केवळ औपचारिकता झाली आहे. ठरावांच्या अंमलबजावणीचे सोडा; पण त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कुठलीही यंत्रणा साहित्य क्षेत्रातील संस्थांनी एवढ्या वर्षांत विकसित केलेली नाही. सत्तेमधील जे धुरीण संमेलनाला उपस्थित राहतात, तेदेखील संमेलनात पारित झालेल्या ठरावांची दखल घेण्याऐवजी, संमेलनाच्या माध्यमातून आपलेच वलय वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात. बदलत्या काळात मराठी भाषा, भाषिक व साहित्य क्षेत्र यांच्यासमोर नवी आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा मागोवा प्रत्येक संमेलनाध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये घेतो. काही उपायांचे सूतोवाचही केले जाते; मात्र त्या उपायांची चर्चा जशी भाषणांपुरती मर्यादित राहते, तसेच ठरावांच्या बाबतीत होते. नवा विचार समाजात पेरण्याचा प्रयत्न करण्याचा दावा करणाऱ्या अशा संमेलनांमध्ये, आपल्याच संमेलनांच्या ठरावांसारख्या औपचारिक परंपरांचा मागोवा घेत, नवी परंपरा सुरू केली तर ती संमेलनांसाठी ‘अक्षय’ ठरू शकेल!

Web Title: Resolution of the meeting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.