‘भय, भूक, दहशतमुक्त भारताचा संकल्प करु या’

By admin | Published: November 25, 2015 11:08 PM2015-11-25T23:08:08+5:302015-11-25T23:08:08+5:30

‘देशाच्या स्वातंत्र्याला ६८ वर्षे झालीत पण स्वातंत्र्यानंतर जे सुराज्याचे स्वप्न आपण पाहिले ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. देश धनवान झाला पण सामान्य माणूस गरीबच राहिला.

'Resolve to fear, hunger, panic India' | ‘भय, भूक, दहशतमुक्त भारताचा संकल्प करु या’

‘भय, भूक, दहशतमुक्त भारताचा संकल्प करु या’

Next

‘देशाच्या स्वातंत्र्याला ६८ वर्षे झालीत पण स्वातंत्र्यानंतर जे सुराज्याचे स्वप्न आपण पाहिले ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. देश धनवान झाला पण सामान्य माणूस गरीबच राहिला. देशात गरिबी आणि रोजगार हाच मुद्दा सर्वाधिक मोठा आहे. ही गरिबी दूर करण्याचा भारत सरकारचा संकल्प आहेच पण केवळ सरकारवर अवलंबून चालणार नाही. आपल्याजवळ सारेच आहे. प्रत्येकाने स्वत:वर विश्वास ठेवून तंत्रज्ञानाची मदत घेतली तर देशाची प्रगती कुणीच थांबवू शकत नाही. भय, भूक, दहशत आणि भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याचा संकल्प आपण सर्वांनीच श्रद्धेय बाबूजींच्या (जवाहरलालजी दर्डा) पुण्यस्मृतिनिमित्त केला पाहिजे.
महात्मा गांधींनी समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले होते. स्वातंत्र्यानंतर सुराज्याची संकल्पना मांडली गेली पण आपण ती अद्याप पूर्ण करू शकलो नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात बदल करण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले त्यावेळी न्यायालयाने संविधानात बदल करता येणे शक्य नाही, असा निर्णय दिला. त्याप्रमाणेच विकासाचे स्वप्न आणि सुराज्याची संकल्पना बदलता येत नाही. भगवान बुद्ध ते महात्मा गांधी यांच्या विचारांच्या आदर्शांवर आम्ही देशाची प्रगती का केली नाही, याचे आत्मचिंतन करावे लागेल. देशाच्या स्वातंत्र्यानंतर समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही विचारांच्या सत्ता जगात होत्या. पं. नेहरूंनी देशाच्या विकासासाठी रशियाच्या साम्यवादाचा अभ्यास केला आणि समाजवादाचा स्वीकार केला. पण आज ६८ वर्षांनी एक प्रश्न समोर येतो, ज्या विचारधारा आम्ही देशाच्या प्रगतीसाठी स्वीकारल्या त्याने प्रगती झाली का?
मी नुकताच हंगेरीला जाऊन आलो. हंगेरी साम्यवादी विचारांनी चालणारा देश. हंगेरीच्या बुडापेस्ट या राजधानीत तेथील जनतेने सर्व नेत्यांच्या प्रतिमा उखडून एका उद्यानात बसविल्याचे मला कळले. पण जनतेने हा संताप का दाखविला, याची माहिती घेतल्यावर मला कळले की, साम्यवादी विचाराच्या शासनाच्या निर्णयामुळे जनतेचा स्वप्नभंग झाला. त्यामुळे तेथील जनतेने हे पाऊल उचलले. चीननेही केवळ लाल झेंडा ठेवला पण बाकी सारेच सोडले आहे. मुक्त विचारसरणीमुळेच चीनची प्रगती झाल्याचे उदाहरण आपल्या समोर आहे. साम्यवादी विचार संपला पण भांडवलवादही अमेरिकेत अनेक प्रश्न निर्माण करतो आहे. अशा वेळी भारताचा विकास कुठल्या विचारधारेच्या आधारावर करावा, हा प्रश्न येतो.
भारतात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला किंमत मिळत नाही. गरिबी, भूक, भ्रष्टाचार आणि दहशतीतून जनतेला मुक्त करणे सध्या अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी रोजगार निर्मिती आवश्यक आहे. त्यामुळेच मिहानचा विकास करताना नागपुरात कुठलाही उद्योगपती ५०० कोटींचा उद्योग आणत असेल तर मी त्याचे पाय पकडीन, असे विधान मी केले होते. मला मिहानमध्ये रोजगार निर्मिती करायची होती.
लोक गाव सोडून शहराकडे येत आहेत पण भविष्यात लोक शहर सोडून गावाकडे जावेत, असे स्वप्न मी पाहतो आणि आणि ते शक्य आहे. ग्रामीण भागातील युवक शेती सोडून शहरात सहकारी बँकात चपराशी व्हायला तयार आहे कारण शेतीतून उत्पन्न मिळत नाही. ही विसंगती व्यथीत करते. गावात सोयी नाहीत, भारनियमनाने लोक त्रस्त आहेत, शाळा नाहीत, असल्याच तर शिक्षण नाही, शिक्षक असले तर विद्यार्थी नाहीत. दवाखान्यांचीही तीच स्थिती आहे. अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी देशातले प्रत्येक गाव रस्त्याने जोडण्याचा संकल्प केला. कारण त्यामुळे एक टक्क््यानी जीडीपी वाढेल, हा विचार होता. ज्यांना केवळ सत्ता हवी असते असे लोक जाणीवपूर्वक सहिष्णुता-असहिष्णुतेचा वाद निर्माण करतात. लोकांच्या मनात भीती निर्माण केल्याशिवाय अशांना निवडून येता येत नाही. त्यामुळे असल्या खुळचट वादांपेक्षा आपण विकासालाच प्राधान्य दिले पाहिजे.
सध्या देशात सीमेन्ट महामार्गाचे काम मी करतो आहे. सरकारकडे निधीची कमतरता आहे. हजारो टन सीमेन्ट त्यासाठी लागणार आहे. कंपन्यांनी मध्येच सीमेन्टचे भाव वाढवू नये म्हणून मी सर्व कंपन्यांच्या मालकांची बैठक घेतली आणि त्यांना सीमेन्ट १३० रुपये भावानेच मिळावे, असा आग्रह केला. त्यांनी भाव वाढविले तर थेट चीनवरून ९० रुपये पोत्याच्या भावाने सिमेन्ट मागविण्याची तयारी मी केली आहे. स्पर्धा असावी पण त्यात जनतेचे भले व्हावे. स्पर्धेतून दर्जा मिळावा आणि किंमत कमी व्हावी, या माझ्या प्रयत्नाला यश मिळते आहे. आमच्याजवळ सारेच आहे पण आम्ही त्याचा उपयोग करीत नाही.
नागपूरच्या गडरचे पाणी मी १८ कोटी रुपयाला विकले. पण त्यात मिथेन असल्याचे मला लक्षात आले. आता या मिथेनचा उपयोग मी इंधन म्हणून करणार आहे. नागपुरात पुढील वर्षी या इंधनावर ५० बसेस धावतील. मिथेनपासून बायोगॅस तयार करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कोळसा आहे. कोळशापासून युरिया तयार करण्याचे काम केंद्रीय रसायने व खते मंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. यामुळे युरियाच्या किमती एक तृतीयांश होतील आणि शेतकऱ्यांना युरिया सहजपणे खरेदी करता येईल. यातूनही उरलेल्या मालाचा उपयोग करून रस्ते बांधण्याचा माझा संकल्प आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोगातून प्रगती साधणे शक्य आहे. प्रत्येक बाबीचा उपयोग विकासासाठी करण्याची उत्कट इच्छा असली तर अनेक मार्ग निघतात, हाच माझा अनुभव आहे. सध्या पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल आहे. ते शेतीतून भरपूर प्रमाणात मिळते. या इथेनॉलच्या विक्रीतून १ लाख ३० हजार कोटी रुपये गावात जातील. यातून अर्थव्यवस्थाच बदलू शकते. त्यासाठीच उद्योगात भांडवल, शेतीसाठी रस्ते, वीज, पाणी उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात इथेनाल, इको फ्रेंडली प्लॅस्टीक तयार होऊ शकते. महाराष्ट्राचा कृषी दर उणे आहे. तो दहा टक्क्क््यांवर नेण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. विकासाच्या वाटेवर आपण सारेच आपला देश भय, भूक, दहशत, भ्रष्टाचारमुक्त करू शकतो आणि देशाची
प्रगती साधू शकतो. हाच संकल्प आपण सारे मिळून करू या’़

Web Title: 'Resolve to fear, hunger, panic India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.