संकल्प, साधने व सिद्धी! पंचवीस वर्षांच्या भारताच्या प्रवासाची सूचक मांडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 09:36 AM2023-02-21T09:36:37+5:302023-02-21T09:36:51+5:30

थोडक्यात पंतप्रधान मोदींनी सोडलेला संकल्प, या संकल्पाच्या सिद्धीची साधने आणि अमृतकाळातील साध्य यावर गृहमंत्र्यांनी केलेली मांडणी पुढील पंचवीस वर्षांच्या भारताच्या प्रवासाचे सूचक आहे.

Resolve, means and achievement! An Indicative Outline of Twenty-Five Years of Travel in India | संकल्प, साधने व सिद्धी! पंचवीस वर्षांच्या भारताच्या प्रवासाची सूचक मांडणी

संकल्प, साधने व सिद्धी! पंचवीस वर्षांच्या भारताच्या प्रवासाची सूचक मांडणी

googlenewsNext

तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे मुख्य धोरणकर्ते अमित शाह यांनी केलेली भाषणे, त्यातून दिलेला संदेश केवळ हे राज्यच नव्हे तर देशाच्या भविष्यातील वाटचालीचे पुरेसे स्पष्ट असा संकेत देणारा आहे. विधानसभेच्या दोन पोटनिवडणुकींचा प्रचार सुरू असल्याने पुणे, कोल्हापूर भागातील त्यांची भाषणे साहजिकच राजकीय राहिली. सहकारमंत्री म्हणून पुण्यात त्यांनी मांडलेल्या मतांनाही राजकीय संदर्भ आहेतच. ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी आणि नागपूर ‘लोकमत’चा सुवर्णमहोत्सव यानिमित्ताने नागपुरात आयोजित विशेष साेहळ्यातील त्यांची मांडणी मात्र राजकारणाच्या पलीकडची, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व शताब्दी या अमृतकाळाच्या वाटचालीचे नेमके सूचन करणारी होती.

२०४७ साली भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगात श्रेष्ठ ठरावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलेला संकल्प हरित ऊर्जा, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा ध्यास आणि समस्त देशवासीयांनी एक मन, एक दिशा व एक लक्ष्य ठरवून छोटे-छोटे संकल्प साकारले तरी देश सर्वश्रेष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही, हा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश केवळ सरकारमुळे महान होत नाही, तर जनतेची साथ असावी लागते. तेव्हा, वीज-पाणी वाचविण्यापासून ते वाहतुकीचे नियम पाळणे, माता-पिता व ज्येष्ठांचा सन्मान राखणे, अशा मार्गाने एकशे तीस कोटी भारतीयांनी एकेक पाऊल टाकले तरी श्रेष्ठतेच्या दिशेने कोट्यवधी पावले पडतील, असे आवाहन शाह यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून देशवासीयांना केले.

प्रगतीचा मार्ग कायदा, सुव्यवस्थेतून, सामाजिक सौहार्द व स्थैर्यातून जातो. गृहमंत्री या नात्याने शाह त्यांनी जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत आणि मध्य भारतातील माओवादी उच्छादाचा आढावा घेतला. राज्यघटनेचे ३७० कलम हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका झाली. अजूनही सुरू आहे. ‘रक्ताचे पाट वाहतील’ या धमकीतला पाेकळपणा गृहमंत्र्यांनी ‘साधा गोटादेखील मारला गेला नाही,’ या शब्दात मांडला. वर्षभरात विक्रमी १ कोटी ७० लाख पर्यटकांनी भेट दिली म्हणजेच काश्मीर शांत आहे. ईशान्य भारतात आठ हजारांवर तरुण शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात आले. लष्करी व निमलष्करी दलांना विशेष संरक्षण देणारा अफस्पा कायदा हटविण्याच्या मुद्द्यावरील राजकीय मतांतरांचा उल्लेख शाह यांनी केला आणि हिंसाचार कमी झाल्यामुळे साठ टक्के भागात नैसर्गिकरीत्या त्या दलांऐवजी पोलिसच कायदा, सुव्यवस्था सांभाळत असल्याचे सांगितले.

गृहमंत्री शाह नागपूरमध्ये बोलत असल्याने विदर्भातील गडचिरोलीचा काही भाग वगळता माओवाद्यांचे अस्तित्व संपुष्टात आल्याचा उल्लेख स्वाभाविक होता. छत्तीसगडमधील बस्तरचा भाग वगळता झारखंड, मध्य प्रदेश व बिहारमधून माओवाद्यांचा हिंसाचार पूर्णपणे आटोक्यात आल्याचे सांगून त्यांनी उरलेल्या भागातही आपली संरक्षण दलेच विजयी होतील, अशा विश्वास व्यक्त केला. थोडक्यात पंतप्रधान मोदींनी सोडलेला संकल्प, या संकल्पाच्या सिद्धीची साधने आणि अमृतकाळातील साध्य यावर गृहमंत्र्यांनी केलेली मांडणी पुढील पंचवीस वर्षांच्या भारताच्या प्रवासाचे सूचक आहे.

शाह यांनी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि ‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवी यशाचे गमक नेमकेपणाने मांडले. राजकीय-सामाजिक भूमिका व पत्रकारितेचा धर्म, व्यवसाय अशी बहुपेढी जबाबदारी पार पाडताना मूल्ये आणि परिस्थितीचा रेटा यातून एकाची निवड करण्याचे प्रसंग काेणाच्याही आयुष्यात दोन-तीन वेळाच येतात. त्यावेळी जे मूल्ये जपतात ते महान असतात. वृत्तपत्राचा धर्म पाळताना बाबूजींनी ते क्षण साधले, ही शाह यांनी सांगितलेली कसोटी सगळ्याच थोरांच्या कारकिर्दीसाठी वापरता येईल. पाया मजबूत असेल तरच एखादी संस्था यशस्वीरीत्या पन्नास वर्षे पूर्ण करते. सत्त्व, साहस व सातत्य या त्रिसूत्रीमुळेच ‘लोकमत’ यशस्वी झाला, हे त्यांनी सांगितले. शाह यांना भावलेली, त्यांनी जाहीरपणे बोलून दाखविलेली गोष्ट म्हणजे या सोहळ्याच्या निमित्ताने प्रारंभीपासून संपादकीय, वितरण, प्रसार, निर्मिती अशा ‘लोकमत’च्या विविध विभागांची जबाबदारी सांभाळणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान. मंदिराच्या कळसाचे तेज साजरे करताना पहिल्या पायरीचे दगड पूजायला हवेत, ही या सत्कारामागे ‘लोकमत’ची भावना होती. ती भावल्याचे गृहमंत्र्यांनी भारावून सांगितले. त्यांच्या या सद्भावनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच हे संस्कार, परंपरा पुढेही जपण्याचा शब्द आम्ही विनम्रपणे त्यांच्यासह सर्व हितचिंतकांना देतो.

Web Title: Resolve, means and achievement! An Indicative Outline of Twenty-Five Years of Travel in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.