विकासासोबत माणुसकी जागविण्याचा संकल्प गरजेचा
By किरण अग्रवाल | Published: December 31, 2023 11:31 AM2023-12-31T11:31:27+5:302023-12-31T11:32:50+5:30
New Year : २०२३ ला निरोप देऊन २०२४ चे स्वागत करतानाही तेच करायला हवे.
- किरण अग्रवाल
नव्या वर्षाचे स्वागत व संकल्प करताना सरणाऱ्या वर्षात अमूक तमूक राहून गेल्याचे उसासे टाकले जातात खरे, पण सकारात्मकतेने बघायचे तर; न झालेल्यापेक्षा झालेल्या गोष्टीच लक्षात घेतल्याने पुढचा प्रवास आश्वासक होण्यास मदत होते. २०२३ ला निरोप देऊन २०२४ चे स्वागत करतानाही तेच करायला हवे.
काळ लोटतो, तसे काही संदर्भही बदलत जातात. ते अपरिहार्यही असते. परिवर्तनशीलता ही सर्वच बाबतीत लागू होणारी बाब आहे. वर्ष बदलते तेव्हा कॅलेंडरच्या पानाबरोबर आपल्या आयुष्यात काय घडले, समाजजीवन कुठे होते व कुठे पोहोचले अशा बाबींचेही आत्मपरीक्षण करायला हवे. संस्था, आस्थापनांचे वर्धापनदिन आपण साजरे करतो त्यावेळी आपण जसा काल, आज व उद्याचा लेखाजोखा मांडतो; तसे वर्ष सरताना व्हायला हवे, पण अलीकडे अपवाद वगळता टीव्हीवरच्या अवॉर्डस् शोजमध्ये करमणूक शोधणारा व हॉटेल्समध्ये जाऊन ''एन्जॉय'' करणाराच वर्ग वाढताना दिसतो.
कुटुंबातील विभक्तता अलीकडे जशी वाढीस लागली आहे तसे मनामनातील एकारलेपणही पुढे येताना दिसत आहे. मी व माझ्यातल्या गुंतलेपणातून ही स्वमग्नता आकारास येते आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे गरजेचे आहे. नववर्षाचा संकल्प करताना काही जण जसे नुकसानकारक अगर वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतात, त्याच पद्धतीने या एकारलेपणातून कसे बाहेर पडता येईल हे बघायला हवे. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे, प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतो; पण तो खरंच सोशल होऊ शकला का हा प्रश्नच ठरावा.
सर्वच बाबतीत परिवर्तन घडून येत आहे, पण सामान्यांच्या मानसिकतेचे परिवर्तन घडायला हवे. सामाजिक जाणिवेचे भान जागायला हवे. साऱ्या अपेक्षा सरकार वा यंत्रणांकडून ठेवताना माणूस म्हणून आपण आपली भूमिका कशी निभावतो, हेदेखील बघायला हवे. ते जेव्हा बघितले जाईल तेव्हा राहून गेलेले कमी व घडून आलेले अधिक दिसून आल्याखेरीज राहणार नाही. त्यादृष्टीने बघता गेल्या काळात बरंच काही बदललंय व बदलतंय. आपले शहर, परिसर तेथील व्यवस्था बदलताहेत. नवनव्या गोष्टी साकारताहेत. शासन आपल्या गतीने व पद्धतीने विकास करीतच आहे. सार्वजनिक स्वरूपातील रस्ते, पाण्यापासून ते व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर कोट्यवधी खर्च केले जात आहेत. दुर्बल घटकासाठी मोफत रेशन, निराधारांना अर्थसाहाय्य ते एसटीमध्ये महिला भगिनींना अर्धे तिकीट दरासारख्या मदतीच्या अनेक योजना सुरू आहेत. हे सारे लोकोपयोगीच आहे.
सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आपण या भूमीतील संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादनाचे कार्यक्रम केलेत. हे करीत असताना त्यांच्या विचारांचा जो जागर घडून आला तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविला गेला पाहिजे. एकीकडे चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेचा आनंद साजरा करीत असताना दुसरीकडे समाज पारंपरिक अंधश्रद्धीय, अवैज्ञानिक जळमटांमध्ये अडकून असेल तर वैज्ञानिक जाणिवा रुजविण्यासाठी पुढे यायला हवे. संत तुकडोजींनी आपल्याला ग्रामगीता दिली, तर गाडगेबाबांनी ग्राम स्वच्छतेचे महत्त्व सांगितले; या बाबींचा जागर घडवायला हवा. सामाजिक उत्तरदायित्वाच्या कर्तव्य भावनेचाही संकल्प करायला हवा.
सारांशात, सरत्या वर्षात काय राहून गेले या चर्चेत अडकून न राहता जे साकारले गेले त्याचा आनंद व समाधान मनी ठेवून नव्या वर्षातील पुढची वाटचाल करण्यासाठी सज्ज व सिद्ध होऊया. हातात हात घेऊन विकासाचा रथ पुढे नेताना माणुसकीचा गहिवर जपण्यासाठीही संकल्पबद्ध होत नववर्षाचे स्वागत करूया...