जागर घडो, अनादर टळो !

By किरण अग्रवाल | Published: October 11, 2018 09:18 AM2018-10-11T09:18:55+5:302018-10-11T09:23:17+5:30

नवरात्रोत्सवानिमित्त आदिमायेची पूजा बांधतांना स्त्रीशक्तीचा जागर घडून येत असला तरी, अजूनही मर्यादांच्या कुंपणात अडकून असलेल्या व हेतुत: अडकवून ठेवल्या गेलेल्या माता-भगिनींना कायद्याने उल्लेखिलेला समानाधिकार तसेच सन्मान दिला जातो का, हा प्रश्नच ठरावा.

Respect the women not only in Navratri but also every time | जागर घडो, अनादर टळो !

जागर घडो, अनादर टळो !

Next

किरण अग्रवाल

नवरात्रोत्सवानिमित्त आदिमायेची पूजा बांधतांना स्त्रीशक्तीचा जागर घडून येत असला तरी, अजूनही मर्यादांच्या कुंपणात अडकून असलेल्या व हेतुत: अडकवून ठेवल्या गेलेल्या माता-भगिनींना कायद्याने उल्लेखिलेला समानाधिकार तसेच सन्मान दिला जातो का, हा प्रश्नच ठरावा. प्रसंगोत्पात होणारे प्रत्येक गोष्टींचे उत्सवीकरण हे केवळ प्रदर्शनी किंवा दिखाऊ स्वरूपाचे न राहता त्यासंबंधीची प्रामाणिकता अगर यथार्थता साधली जाण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित व्हावी.

आदिशक्तीच्या जागराचा नवरात्रोत्सव हा खरेच आसमंतात चैतन्य भारणारा असतो. उत्साहाने, मांगल्याने मंतरलेल्या या काळात नारीशक्तीला वंदन घडून येते. अनेकविध संस्थांतर्फे या काळात विविध क्षेत्रांत अभिनंदनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचे सन्मान सोहळे आयोजिले जातात. त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळून स्वावलंबन व स्वयंपूर्णतेच्या त्यांच्या वाटा अधिक प्रशस्त होताना दिसतात. निमित्तप्रिय झालेल्या समाजाकडून नवरात्रोत्सवानिमित्त हे प्रकर्षाने घडून येत असले तरी एरव्ही तसे होत नाही किंवा तशा भावनेचा तितकासा प्रत्यय येत नाही, हा यातील मूळ मुद्दा. काळ बदलला, शिक्षणाने, समाजातील जागृतीने व कायद्यानेही महिला सक्षम होत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात त्या पुढे येत असून, आपल्या कार्यकर्तृत्वाची पताका फडकावित आहेत; ही निश्चितच गौरवाची बाब आहे. विशेषत: समाजात केला जाणारा मुला-मुलींमधला भेद आता संपुष्टात येऊ पाहतो आहे. एका मुलीवर कुटुंबनियोजन करणारे तसेच मुलींनाच दत्तक घेऊ पाहणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याचे पाहता त्यातून स्त्री-सन्मानाची वाढती भूमिका उजागर होणारी आहे. परंतु हे होत असताना अजूनही काही बाबतीतले त्यांच्याकडील दुर्लक्ष व सहजपणे घडून येणारी त्यांची अवमाननाही नजरेतून सुटू शकणारी नाही. उत्सवप्रियतेत समाधान मानून एका दिवसापुरते अगर आठवडा-पंधरवड्यापुरते उपचारात्मक कार्यक्रम घेण्यापेक्षा कायमसाठी म्हणून मातृशक्तीच्या सन्मानाची मानसिकता रुजविली जाणे म्हणूनच गरजेचे ठरणारे आहे.

पत्नीशी जमत नाही म्हणून तिच्याकडून घटस्फोटाची अपेक्षा ठेवणाऱ्या व तो मिळत नाही म्हणून तिच्या जिवंतपणीच पिंडदान करणाऱ्या काही लोकांची आगळीक पाहता, यासंदर्भातील मानसिकता बदलाची गरज स्पष्ट व्हावी. परस्परात न जमणे ही बाब वेगळी. पत्नीपीडितांना झालेला त्रासही समजून घेता यावा; परंतु त्यातून बाहेर पडण्याचे अन्य कायदेशीर मार्ग असताना पत्नीच्या नावे पिंडदान करण्याची व वटपौर्णिमेस वडाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारण्याची स्टंटबाजी करून संबंधितांनी नेमके काय साधले? त्यातून केवळ त्यांच्या पत्नीबद्दलचीच नव्हे, तर समस्त महिलांबद्दलची अवमाननाच दिसून आली. अन्यही अनेक उदाहरणे देता येणारी आहेत, ज्यातून पुरुषी मानसिकतेचा व महिलांच्या अनादराचा उलगडा व्हावा.

महत्त्वाचे म्हणजे, अनादराचे प्रकार हे अशिक्षित, असमर्थांच्या बाबतीतच घडतात असेही नाही. स्वत:ला ‘सबला’ म्हणून सिद्ध केलेल्यांनाही कधी कधी व्यवस्थांचा सामना करताना त्या अनुभवास सामोरे जाण्याची वेळ येते. अगदी अलीकडचेच उदाहरण घ्या, नाशिक जिल्हा परिषदेतील एका विषय समिती सभापतीला सरकारी योजनेबद्दलचीच माहिती अधिकारी वर्गाकडून दिली न गेल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह महिला सदस्यांनी अवमानाचा आरोप करीत सर्वसाधारण सभेत ठिय्या दिल्याचे दिसून आले. कायद्याने दिलेल्या महिला आरक्षणामुळे माता-भगिनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून जातात व आपापल्या भागाचे प्रतिनिधित्व करून समस्या सोडवणुकीचा प्रयत्न करतात. पण, तेथील निर्ढावलेली यंत्रणा त्यांना सहकार्य करण्याऐवजी दुरुत्तरे देऊन त्यांचा अवमान करीत असल्याचे प्रकार अनेक संस्थांत घडून येताना दिसतात. हा पुरुषी मानसिकतेचाच प्रकार म्हणावयास हवा. तेव्हा, नवरात्रोत्सवानिमित्त नारीशक्तीचा गौरव केला जात असताना तो तेवढ्यापुरता राहू नये तर, महिलांचा अनादर करणारी, त्यांचा समानाधिकार नाकारणारी मानसिकता बदलण्याच्यादृष्टीने मनामनांतील आस्था व श्रद्धा जागविल्या जाणे गरजेचे आहे. आई जगदंबा त्यासाठी सर्वांना सुबुद्धी देवो!
 

Web Title: Respect the women not only in Navratri but also every time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.