निकालाचा फुगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 05:38 AM2020-07-30T05:38:50+5:302020-07-30T05:39:46+5:30

दहावीचा यंदाचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा १८.२० टक्क्यांनी वाढला म्हणून फार हुरळण्याचे कारण नाही. कोणतेही यश अंतिम नसते, किंबहुना यशाचा प्रत्येक टप्पा जबाबदारी वाढविणारा असतो, हे भान विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी बाळगले की झाले.

The result bubble! | निकालाचा फुगा!

निकालाचा फुगा!

googlenewsNext

अलीकडच्या अनेक वर्षांमधले धमाकेदार यश असे यंदाच्या दहावीच्या निकालाचे वर्णन केले जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या या परीक्षेत तब्बल ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागात तर ९८.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातल्या पावणे सोळा लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि त्यापैकी पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्वांचे अभिनंदन. ज्यांना दहावीची पायरी ओलांडता आली नाही त्यांनी नाउमेद होवू नये. पहिल्याच प्रयत्नात दहावीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याने कुठलेही आकाश कोसळलेले नाही हे प्रथम लक्षात घ्यावे आणि ‘पुढच्या वेळी यश आपलेच’ हा विश्वास बाळगून पुन्हा उमेदीने तयारीला लागावे.

आता चर्चा सुरू आहे ती निकाल एवढा उच्चांकी कसा लागला यावरून. खरेतर कोरोनाच्या संकटकाळात चांगली वार्ता आल्याचे समाधान वाटायला हवे होते; पण या यशातही काही खोट असणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परीक्षेच्या अंतिम टप्प्यात उद्भलेल्या कोरोनाच्या साथीमुळे भूगोलाचा पेपर होऊ शकला नाही. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळाला असे म्हटले जाते. लेखी परीक्षेचे ८० आणि तोंडी परीक्षेचे २० गुण अशा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमुळे निकाल फुगला. गेल्यावर्षी हा ८०-२० चा पॅटर्न नव्हता. यंदा तो पुन्हा चालू करण्यात आला. त्यामुळे भारंभार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. या दोन्हींत तथ्य जरूर असेल. पण त्यानंतरही यशाचे मोल कमी होत नाही. कारण मुळातच दहावी परीक्षा म्हणजे शैक्षणिक जीवनातला अंतिम टप्पा नाही. ही तर केवळ सुरुवात आहे. म्हणूनच दहावी परीक्षेतल्या यशाने फार हुरळून जाण्याची गरज नाही, तसे अपयशाने खचण्याचीही आवश्यकता नाही. पुढच्या टप्प्यावर कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, कोणत्या शिक्षणाची निवड करावी हा कल समजण्यासाठी मात्र या परीक्षेचा मोठा उपयोग होतो. त्यादृष्टीने या निकालाकडे पाहिले पाहिजे. सध्याच्या कोरोनाच्या संकटाने ‘कोरोनापूर्व’ आणि ‘कोरोनोत्तर’ अशी जगाची उभी विभागणी अवघ्या चार-सहा महिन्यांत करून ठेवली आहे. त्यामुळे तथाकथित ‘फुगलेल्या’ यशाचे पेढे फारवेळ चघळत न बसता कोरोनानंतरच्या जगात या गुणांचा उपयोग कसा होऊ शकेल, याचा विचार व्हायला हवा. नोकरी मिळविण्यासाठी, स्वत:चा व्यवसाय-उद्योग चालू करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी, स्वत:ला सुसंस्कृत माणूस म्हणून घडविण्यासाठी शाळा-विद्यापीठांमधले शिक्षण असते.

दहावीच्या गुणांचा फुलोरा यातल्या कोणत्या कारणासाठी कसा कामी लावायचा, यावर आता विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षण क्षेत्राने लक्ष केंद्रित केले पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, संशोधन, कला, भाषा या पारंपरिक शिक्षणाची गरज तर सदैव असणारच आहे. त्याच जोडीने कोरोनापश्चात जगात कौशल्याधारित शिक्षणाचेही महत्त्व वाढणार आहे. गेल्या दशकात ‘खेडे’ बनलेले जग चार महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’ने ‘आॅनलाईन’वर आणले. या बदलाला सामोरे जाणारे नवे शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने आजच जाहीर केले आहे. ते धोरण कसे आहे, याची चर्चा पुढील काळात होईल. मात्र, त्यामध्ये नव्या युगाशी सुसंगत संधींचा विचार केलेला असेल, अशी आशा आहे. त्या संधी साधण्यासाठी दहावीनंतर काय, याचे उत्तर नव्या शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत शोधावे लागेल. राज्य सरकारने या दृष्टीने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. कारण आजच्या इंटरनेट युगातही खासकरून ग्रामीण भागातले विद्यार्थी तितके ‘अपडेट’ नसतात. त्यामुळे शैक्षणिक कारकिर्दीच्या सुरुवातीलाच वाट चुकण्याचा धोका असतो. केवळ परीक्षेतल्या गुणांवर विसंबून पुढे जात राहिले तर आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात निराशा येण्याची भीती असते. त्याऐवजी आवड, कल आणि क्षमता यांची जाणीव वेळीच झाली, तर भविष्यात काय करायचे याचा निर्णय घेणे सोपे जाते. दहावीच्या गुणांचा उपयोग त्यासाठी व्हावा.

Web Title: The result bubble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.