चीनच्या एक अपत्य धोरणाचे परिणाम

By admin | Published: October 7, 2014 02:52 AM2014-10-07T02:52:27+5:302014-10-07T02:56:44+5:30

आॅक्टोबर २०१४ रोजी प्रजासत्ताक चीनच्या स्थापनेस ६५ वर्षे पुरी झाली आहेत. आजच्या जगातील चीन हा सर्वांत मोठा व प्राचीन देश आहे

The result of China's one-child policy | चीनच्या एक अपत्य धोरणाचे परिणाम

चीनच्या एक अपत्य धोरणाचे परिणाम

Next

ज.शं. आपटे (लोकसंख्या अभ्यासक) - 
आॅक्टोबर २०१४ रोजी प्रजासत्ताक चीनच्या स्थापनेस ६५ वर्षे पुरी झाली आहेत. आजच्या जगातील चीन हा सर्वांत मोठा व प्राचीन देश आहे. चीन हा आशिया खंडाचा एक महत्त्वाचा, भू-राजनैतिक माहात्म्य असलेला देश आहे. नेपोलियन म्हणत असे, ‘‘चीन हा एक झोपी गेलेला देश आहे, बलाढ्य देश आहे. त्याला झोपू द्या; पण तो देश जेव्हा जागा होईल, तेव्हा अवघ्या विश्वाला हादरवेल, हलवेल.’’ या छोट्या विधानात चीनचे सुप्त सामर्थ्य, अदृश्य शक्ती व प्रचंड प्रभाव व्यक्त झाला आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक क्रांतिकारक घटना-घडामोडी घडल्या. त्यामध्ये आहेत दोन महायुद्धे, रशियन साम्राज्याचा उदय, १९३०च्या दशकातील जागतिक मंदी, ब्रिटिशांपासून भारताची मुक्तता, पाकिस्तानची निर्मिती आणि प्रजासत्ताक चीनची स्थापना. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. चीनचा लोकसंख्यात्मक इतिहास पाहता, इ. स. १४००मध्ये चीनची लोकसंख्या १० कोटींपेक्षाही कमी होती. भारतवर्षात १८००पर्यंत लोकसंख्या होती ४० कोटी. १९५०मध्ये चीनची लोकसंख्या होती ५४.१६ कोटी. माओला चीनच्या प्रचंड लोकसंख्येबद्दल विलक्षण अभिमान होता. प्रचंड लोकसंख्या हे प्रचंड सामर्थ्य आहे, अशी त्याची मनोमन धारणा होती, श्रद्धा होती. माओ मोठ्या आशेने म्हणाला होता, ‘निम्मा चीन युद्धात गारद झाला, तरी उरलेला निम्मा चीनही जगात सर्वांत मोठा देश असेल.’ माओच्या निधनानंतर अनेक बदल झाले. धोरणात, कार्यक्रमात, अंमलबजावणीत थोडेसे शिथिलीकरण आले. लोकसंख्या प्रश्नाचा पुनर्विचार वेगळ्या दिशेने होऊ लागला. या प्रश्नाचे गांभीर्य अधिक तीव्रतेने जाणवू लागले. ‘एक दाम्पत्य-एक अपत्य’ अशी कुटुंबकल्पना कुटुंबाचा आकार म्हणून १९७९-८०मध्ये पुढे आली; पण या धोरणाला चिनी समाजशास्त्रीय संघटनेने कडाडून विरोध केला.
समाजशास्त्रीय संघटनेचे असे मत होते, की चीन हा लाडावलेल्या मुलांचा, लाडावलेल्या मुलींचा देश होऊ नये. त्या दृष्टीने ‘एक दाम्पत्य, एक अपत्य’ धोरण चूक, अयोग्य व कुटुंबस्वास्थ्य, समाजस्वास्थ्याला घातक आहे. अनेक दाम्पत्यांनी अशीही भीती व्यक्त केली होती, की आमच्या कुटुंबातील मुलांना, मुलींना सख्खे, चुलत, आत्ये, मामे अशी भावंडेच माहीत असणार नाहीत. कुटुंबाचे ऐक्य, आपुलकी, आस्था, सहकार्य या मानवी भावनांना मुले-मुली पारखी होतील. हे धोरण अमलात आल्यानंतर या धोरणाला प्रतिसाद मिळाला तो अवघ्या २० टक्के दाम्पत्यांकडून. २०१०च्या दशकात तर चीनमध्ये या धोरणास लक्षणीय प्रमाणात विरोध होऊ लागला. कुटुंबनियोजन केंद्र, आरोग्य स्वास्थ केंद्र यांवर विरोधकांकडून हिंसक हल्ले होऊ लागले. त्यामुळे ‘एक दाम्पत्य-एक अपत्य’ धोरण आता इतिहासजमा झाले आहे. ज्यांनी हे धोरण स्वीकारले, त्यांच्यापैकी काही दाम्पत्यांना आपले एकुलते मूल देवाघरी गेल्याचे दु:ख भोगावे लागले.
प्रजासत्ताक चीनचे ‘एक दाम्पत्य-एक अपत्य’ धोरण सर्वस्वी अपयशी ठरले, असे म्हणता येणार नाही. कारण, १९७०मधील हजारी जन्मप्रमाण होते ३३.४ व २०१२मध्ये हे जन्मप्रमाण हजारी झाले १२.१ आणि नैसर्गिक लोकसंख्या वृद्धीदरही २०१२मध्ये हजारी ४.९५पर्यंत घसरला. या धोरणामुळे लोकसंख्यावाढीवर नियंत्रण तर आलेच; पण चीनच्या जलद आर्थिक विकासाला चालना मिळाली, हे निश्चित. ‘एक दाम्पत्य-एक अपत्य’ धोरण ३०-३५ वर्षांच्या कालखंडात ३ संक्रमणावस्थेतून वाटचाल करीत होते. चीन शासनाने हे धोरण समंजसपणे उदारतेने राबविले, मुळात कायद्याची भाषा कलमे सक्तीची बिलकूल नव्हती. चिनी शासनाने दाम्पत्यांना एक अपत्य असावे, म्हणून प्रोत्साहन दिले आणि ज्यांनी ते मान्य केले, त्यांना बक्षिसे, पारितोषिके दिली; पण त्याचबरोबर ज्या दाम्पत्यांनी हे धोरण स्वीकारले नाही, त्यांना कोणता दंड, शिक्षा दिली नाही. गर्भपात करून घेण्याची मुळीच सक्ती केली नाही व प्रोत्साहनही दिले नाही. ‘संध्या छाया भिवविती हृदया’ अशी चीनमधील असंख्य वृद्ध दाम्पत्यांची अवस्था आहे. अधिक श्रमिकसंख्या असल्यामुळे चीनमधील निवृत्तीचे वय आहे ६० आणि जेथे अधिकाधिक शारीरिक श्रमांची कामे, नोकऱ्या आहेत, तेथे ५५व्या वर्षीच निवृत्ती होते. स्त्रिया नेहमीच पुरुषांपेक्षा १० वर्षे आधीच निवृत्त होतात. म्हणजे ४५-५०व्या वर्षी. या नियमाला अपवाद आहेच. शासन संचालित उद्योगधंद्यांमध्ये वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या, विद्यापीठात संशोधन संस्थांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया साठ वा जरा उशिरा निवृत्त होतात. मध्यमवयीन दाम्पत्यांना एकुलते एक मूल देवाघरी गेल्याचे दु:ख हा फार मोठा मानसिक धक्काच असतो. कुटुंबात एकुलते एक मूल असल्याचे परिणाम चिनी शासनाला २०२०मध्ये दिसून येतील, असा अंदाज होता. हा प्रश्न आर्थिक प्रगती, विकास, सुधारलेली जीवनराहणी, वाढत्या समाजकल्याण व सुरक्षा योजनांनी कमी होईल; पण एकुलते एक मूल धोरणाने चीनमध्ये गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला. बहुसंख्य ज्येष्ठ दाम्पत्यांना स्थिर उत्पन्न नसते आणि वैद्यकीय उपचार, आरोग्य सेवा परवडण्याजोगी नसते. आपल्या मुलाकडून इतर नातेवाइकांकडून अधिक साह्य मिळाले, तरच आरोग्य सेवा घेणे शक्य होते. ज्येष्ठांच्या आरोग्य सेवांची चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे आणि आरोग्य सेवा समाधानकारक मुळीच नाही.
वृद्धापकाळी आपल्या मुलांच्या मदतीवर विश्वासपूर्वक अवलंबून राहणे, ही प्रजासत्ताक चीनची पूर्वापार परंपरा आहे. आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात, साह्य देणाऱ्या संस्थांमध्ये पाठविणे, हा अगदीच शेवटचा उपाय आहे. प्रजासत्ताक चीनला ६५ वर्षे पुरी होत असताना या प्रश्नांना समर्थपणे तोंड देण्याचे आव्हान आहे.

Web Title: The result of China's one-child policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.