फाशी निर्णयाच्या परिणामाचाही विचार व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:09 AM2018-04-27T00:09:29+5:302018-04-27T00:09:29+5:30
१२ वर्षांच्या खालील मुलींवर बलात्कार झाल्यास फाशीची शिक्षा असा भावनाप्रधान निर्णय घेणे सोपे आहे़ पण, त्यामुळे बलात्कारासाठी फाशी आणि खुनासाठीही फाशीच असेल तर बलात्कारानंतर पीडितेला मारुन टाकण्याच्या घटनेत वाढ होईल, हा परिणाम लक्षात घ्यावा़
अॅड असीम सरोदे|
१२ वर्षांच्या खालील मुलींवर बलात्कार झाल्यास फाशीची शिक्षा असा एक भावनाप्रधान निर्णय सरकारने जाहीर केला़ प्रत्येक बलात्कार हा गंभीर असतो़ बलात्कार म्हणजे स्त्रियांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याचा अत्यंत अमानुष प्रकार आहे आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यातील प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे़ परंतु, बलात्कारासाठी फाशी हा भावनिक प्रतिसाद राजकीय खेळी आहे़ सध्या बलात्कारासाठी फाशीची शिक्षा नसल्याने बलात्कारग्रस्त स्त्रीला सोडून दिले जाते़ परंतु, बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशी व खुनासाठीही फाशी असेल तर बलात्कारानंतर पीडितेला मारून टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ होईल़ हा परिणाम लक्षात घ्यावा लागेल़ १२ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारासाठी फाशी याचा अर्थ सरकारला इतर बलात्कार गंभीर वाटत नाहीत का असाही प्रश्न आपोआप उपस्थित होतो़ मुळातच या निर्णयामध्ये कोणतेच तर्कशास्त्र नाही़ बलात्काराच्या घटनांचा सामाजिक व गुन्हेगारी संदर्भातील अभ्यास नाही़ असोसिएशन फॉर ए डेमोक्रॅटिक रिफॉर्मस या संस्थेने १९ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अभ्यास अहवालानुसार भाजपच्या सर्वाधिक आमदार, खासदारांवर महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत़, असे सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे़ देशात नुकतेच दोन ठिकाणी खळबळजनक बलात्कार झाले़ जातीय व धार्मिक रंग असलेल्या या बलात्काराबाबत भाजपचे मंत्री आणि खासदार यांनी बेताल विधाने केली़ बलात्कारांच्या घटनांबाबत तज्ज्ञ असल्याप्रमाणे बोलू नये, अशी सक्त ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षातील लोकांना दिली़
मुळात संस्कृती व धर्माच्या नावाखाली पुनरुत्पादनाची क्षमता असलेल्या स्त्री शरीरावर सतत नियंत्रण ठेवण्याची पुरुषी व्यवस्था नष्ट व्हावी़ प्रेम करणाऱ्यांना पकडून जबरदस्तीने लग्न लावून देणे बंद व्हावे़ मुलींनी जिन्स पँट, टीशर्ट घालू नका अशी बंदी घालणाºया हिंदुत्ववादी संघटना किंवा मुलींनी बुरखा वापरावा, असा आग्रह धरणाºया मुस्लीम कट्टरवादी या स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचे प्रबोधन होण्याची गरज आहे़
फाशीसारखी शिक्षा असण्याने गुन्हेगारी कमी होईल, हा चुकीचा समज असल्याचे सिद्ध करणारे अनेक अभ्यास आहेत़ त्यामुळे खरोखर गुन्हे थांबवायचे असतील तर कायद्यात आज लहान मुलांवर झालेल्या बलात्कारासाठी १० ते २० वर्षेपर्यंतच्या शिक्षा आहेत़ त्या शिक्षा खरोखर व्हाव्यात, चार्जशिट दाखल झाल्यावर सहा महिन्यात खटले निकालात निघावेत, हे जरी झाले तरी कायद्याचा दबदबा व आदर निर्माण होईल़
चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन, बालकांवरील बलात्कारांसंदर्भात संवेदनशीलतेने चौकशी करणारे पोलीस अधिकारी, लिंगाधारित राजकारण, पुरुषप्रधानता व लैंगिकता याबाबत विवेकनिष्ठ, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले विशेष न्यायालय व वकील यांची गरज पूर्ण करण्यासाठी खूप मूलभूत व सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे़ १२ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारासाठी फाशीची शिक्षा असा अध्यादेश काढणे सोपे असते. बलात्कारांबाबत कडक भूमिका घेणाºयांचा संवदेनशील पक्ष असे मिरविण्यापेक्षा स्त्री सन्मानाची आवश्यकता वागणुकीचा भाग असल्याचे मान्य करणे म्हणजे खरा विकास आहे़ ही बाब लोकशाहीचे व्याकरण माहिती असली की लगेच लक्षात येऊ शकते़