पाकिस्तानची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा उघड
By admin | Published: April 4, 2016 02:36 AM2016-04-04T02:36:14+5:302016-04-04T02:36:14+5:30
जानेवारी महिन्यात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले, ‘पाकिस्तानने प्राण गमावण्याच्या रूपाने फार मोठी किंमत मोजली आहे
विजय दर्डा (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
जानेवारी महिन्यात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले, ‘पाकिस्तानने प्राण गमावण्याच्या रूपाने फार मोठी किंमत मोजली आहे. त्यासोबत आर्थिक हानीही सोसली आहे. असे असले तरी दहशतवादाशी मुकाबला करण्याचा आमचा निर्धार प्रत्येक दिवशी अधिक दृढ होत आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील आपल्या समपदस्थाचे हे वक्तव्य निव्वळ पोकळ गप्पा नाहीत, असे मानले. पाकिस्तानही दहशतवादाच्या झळा सोसत आहे. ईस्टरच्या रविवारी लाहोरच्या गुलशने इक्बाल उद्यानात सुटीचा आनंद उपभोगणाऱ्या निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने याचेच स्मरण दिले. तुमच्याप्रमाणे आम्हीही दहशतवादाने बाधित असल्याचे पाकिस्तानचे शासक भारतीय नेत्यांना नेहमी सांगत असतात.
शरीफ दहशतवादाविरुद्ध गांभीर्याने लढा देत असल्याविषयी खात्री वाटत असल्यानेच जानेवारीत पठाणकोट हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानच्या संयुक्त तपासी पथकाला त्या संवेदनशील जागी जाऊ देण्यासही मोदी तयार झाले. याशिवाय दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दहशतवादाविषयीच्या गुप्तवार्तांची देवाण-घेवाणही करीत आहेत. असे असले तरी पाकिस्तान दहशतवाद आणि मूलतत्त्ववादी शक्तींविरुद्ध निर्णायक लढा प्रामाणिकपणे देईल या विश्वासास तडा जाणाऱ्या दोन घटना अलीकडेच घडल्या आहेत. यातील पहिली घटना इस्लामाबाद या पाकिस्तानच्या राजधानीत, तर दुसरी संयुक्त राष्ट्रसंघात घडली. सिंध प्रांताचे गव्हर्नर सलमान तसीर यांची हत्त्या करणाऱ्या त्यांच्याच अंगरक्षकास फाशी दिल्याने हजारो कट्टरपंथींनी इस्लामाबादमध्ये मोर्चा काढला व वाटेत जे दिसेल त्याची नासधूस केली. निषेध करणाऱ्यांचा हा जमाव राजधानीकडे कूच करणार असल्याची पूर्वसूचना मिळूनही प्रतिबंधात्मक उपाय योजले गेले नाहीत. यावरून अशा शक्तींशी दोन हात करण्याची पाकिस्तान सरकारची इच्छा वा धमक नाही, हेच दिसून आले.
जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझर याला संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘अल काईदा-इस्लामिक स्टेट’च्या काळ्या यादीत टाकण्यासाठी भारताने जोरदार प्रयत्न केले होते. परंतु पाकिस्तानने चीनशी असलेल्या आपल्या खास संबंधांचा वापर करून या प्रयत्नांत खोडा घातला. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कारवाया आणि त्यांचे अल काईदाशी संबंध जगजाहीर असल्याने या संघटनेला संयुक्त राष्ट्र संघाने २००१ मध्येच काळ्या यादीत टाकले आहे. तरीही या संघटनेचा मुख्य नेता मौलाना मसूदला मात्र या यादीत टाकले न जाण्याचा तर्क अनाकलनीय म्हणावा लागेल. यावरून स्पष्ट दिसते की, भारताविरुद्धच्या दहशतवादी कृत्यांशी स्पष्टपणे संबंधित असणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची पाकिस्तानची मनापासून तयारी नाही. यासाठी पाकिस्तानने चीनशी असलेल्या खास मैत्रीचा उपयोग करून घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झकीऊर रेहमान लख्वी यास काळ्या यादीत टाकण्याचे प्रयत्न चीनने असेच हाणून पाडले होते. पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानच्या संयुक्त तपासी पथकाच्या तपासाची स्थिती २६/११ च्या पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या खटल्यागत होईल. तो खटलाही मुख्य सूत्रधारांच्या जवळपासही न फिरकता वर्षानुवर्षे रेंगाळत पडला आहे.
कट्टरपंथी आणि दहशतवादाविरुद्धचा लढा हे एक एकात्मिक युद्ध आहे व ते प्रामाणिकपणे लढायचे असते हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी समजून घ्यायला हवे. काद्रींच्या मारेकऱ्याच्या फाशीविरुद्ध निषेध करणाऱ्यांवर हातही न उगारणे व मौलाना अजहर मसूदला पाठीशी घालत राहणे हा हे युद्ध लढण्याचा मार्ग नक्कीच नाही. ओसामा बिन लादेनच्या बाबतीतही पाकिस्तानने अशीच बोटचेपी भूमिका स्वीकारली व शेवटी त्याची मोठी किंमत मोजली. शरीफ खरंच गांभीर्याने दहशतवादाविरुद्ध लढू इच्छित असतील व त्यांना काही नवे करायचे असेल तर त्यांनी आपल्याच देशातील विचारवंतांचे मत आधी ऐकावे. पाकिस्तानच्या समाजजीवनात बोकाळलेला कट्टरपंथी विचार व दहशतवादाविषयीची आस्था समूळ नष्ट करायची असेल तर शाळा-कॉलेजचा अभ्यासक्रम बदलावा लागेल, मशिदी व टीव्हीच्या टॉक शोंमध्ये दिल्या जाणाऱ्या विखारी भाषणांवर बंदी घालावी लागेल आणि दुस्वास व शत्रुत्वाची शिकवणूक देणाऱ्या इस्लामी पाठशाळांवर अंकुश आणावा लागेल, अशी आग्रहाची मागणी पाकिस्तानमधील विचारवंत अनेक वर्षे करीत आले आहेत. याचे पहिले पाऊल म्हणून शरीफ यांना मौलाना मसूद अझर व त्याच्यासारख्या इतरांना पाठीशी घालणे बंद करावे लागेल.
पाकिस्तानवर विश्वास टाकून पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापरीने योग्यच पवित्रा घेतला. आता या विश्वासाचे सार्थक करायचे की तो वाया घालवायचा हे इस्लामाबादवर अवलंबून आहे. दहशतवादाच्या उघड हस्तकांना पाठीशी घालण्यापेक्षा भारताबरोबरचे संबंध सुधारणे महत्त्वाचे मानायचे की नाही हा पर्याय पाकिस्तानने निवडायचा आहे. भारताशी संबंधित मुद्द्यांवर तर्कसंगत विचार करणे पाकिस्तानच्या नेतृत्वास नेहमीच जड जात गेले आहे. त्यामुळे देशव्यापी कृती कार्यक्रमाचा भाग म्हणून एकीकडे पाकिस्तानचे लष्कर त्यांच्या देशात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध जोरदार कारवाई करते, पण भारताच्या बाबतीत मात्र हेच धोरण स्वीकारायला पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वास जड जाते. कदाचित पाकिस्तानच्या निर्मितीपासून तेथे खोलवर रुजलेल्या भारतविरोधी भावनेने निर्माण झालेला हा ‘जेनेटिक डिफेक्ट’ही असेल.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
मुंबईत एनसीपीए सभागृहात झालेल्या यंदाच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर’ पुरस्कार सोहळ्यास मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे जाहीर आभार मानतो. टाटा कर्करोग इस्पितळाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांना ‘महाराष्ट्राचा मानबिंदू’, प्रख्यात गायिका आशा भोसले यांना ‘जीवनगौरव’, उद्योजिका, शिक्षणतज्ज्ञ, दानशूर व क्रीडाप्रेमी नीता अंबानी यांना ‘महाराष्ट्र युथ आयकॉन आॅफ दि इयर’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ फेम बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंग यास ‘लोकमत अभिमान’ या पुरस्कारांनी गौरवित करून आम्ही समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांत बुद्धिचातुर्य दाखविणाऱ्या, कठोर मेहनत करणाऱ्या व मनापासून प्रयत्न करणाऱ्यांना सन्मानित करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्राचे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा आणली ही आमच्यासाठी खूप समाधानानाची बाब होती. सुपरस्टार आमीर खानने तर चोखंदळ प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.