उलटलेला डाव

By admin | Published: August 7, 2015 09:45 PM2015-08-07T21:45:50+5:302015-08-07T21:45:50+5:30

सुषमा स्वराज, वसुंधराराजे आणि शिवराजसिंह चौहान यांचे राजीनामे त्यांच्यावरील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मागण्यासाठी लोकसभेच्या मध्यवर्ती

Reversed | उलटलेला डाव

उलटलेला डाव

Next


सुषमा स्वराज, वसुंधराराजे आणि शिवराजसिंह चौहान यांचे राजीनामे त्यांच्यावरील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मागण्यासाठी लोकसभेच्या मध्यवर्ती जागेत उतरून घोषणा देणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना सभापती सुमित्रा महाजन यांनी निलंबित केले आणि त्या कारवाईने विरोधातले ९ पक्ष एकाएकी संघटित झाले. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला ही प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. लोकसभेतील गोंधळाचे निमित्त करून काँग्रेसला एकाकी पाडायचे आणि त्या पक्षाच्या तशा अवस्थेचा फायदा घेऊन त्यावर राज्यसभेतही कुरघोडी करायची ही भाजपाची योजना होती. ती सरकारच्या हडेलहप्पीमुळे अयशस्वी होऊन तिचा उलट परिणाम झाला. ममता बॅनर्जी स्वत:ला काँग्रेसपासून दूर ठेवू इच्छिणाऱ्या नेत्या आहेत. त्यांचा संघर्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी आहे. तो पक्ष सध्या काँग्रेसशी जवळीक साधत असल्याने ममता बॅनर्जी काँग्रेसपासून दूर राहतील हा सत्ताधाऱ्यांचा अंदाज होता. उत्तर प्रदेशात काँग्रेसची स्पर्धा मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाशी असल्यामुळे तो पक्षही काँग्रेसच्या जवळ जाणार नाही असे त्याला वाटले होते. बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने जनता दल (यु)शी सख्य केले असल्यामुळे तो पक्ष व लालूप्रसादांचा राजद एवढेच प्रमुख पक्ष काँग्रेसला साथ देतील असे भाजपाएवढेच इतरांनाही वाटले होते. पण प्रत्यक्षात काँग्रेससोबत देशातील आठ पक्ष राहिल्याने त्या साऱ्यांना भाजपाएवढाच धक्का बसला आहे. राज्यसभेत विरोधी पक्षांचे बहुमत आहे आणि ते तुटल्याशिवाय किंवा त्या पक्षात दुरावा आल्याशिवाय जमीन धारणेसारखी आपली विधेयके पुढे रेटता येत नाहीत हे सत्ताधारी पक्षाला कळणारे आहे. आताच्या गोंधळाने विरोधी पक्षांची एकजूट आणखी भक्कम होऊन राज्यसभेत सरकारला दिलासा मिळण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे. काँग्रेस पक्ष संसदेची अडवणूक करीत असल्याचा आपला आरोप देशातील प्रसिद्धीमाध्यमे उचलून धरतील व त्यामुळे जनमत आपल्याला अनुकूल होईल ही भाजपाची आशाही आता अस्तंगत होऊ लागली आहे. काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात आमच्या खासदारांना निलंबित केले होते हा भाजपाचा बचावही त्या पक्षाच्या बाजूला फारशी बळकटी देणारा ठरत नाही. काँग्रेस पक्षाच्या वतीने या संदर्भात जाहीर झालेली आकडेवारी, भाजपाने आपल्या सत्ताकाळात हा मार्ग किती राज्यात व किती वेळा वापरला ते सांगणारी व सत्ताधारी पक्षाचा बचाव दुबळा करणारी आहे. त्याहून मोठी बाब काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात मांडलेल्या आंदोलनाची आहे. सोनिया गांधी या देशाने देऊ केलेले पंतप्रधानपद नाकारणाऱ्या नि:स्पृह नेत्या आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांना चिकटू शकेल असा कोणताही आरोप भाजपाला त्यांच्यावर करता आलेला नाही आणि राहुल गांधींविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करण्याच्या भाषेला राजकारणात किती किंमत द्यायची हे जनतेला चांगले समजणारे आहे. शिवाय काँग्रेससोबत इतर आठ पक्ष उभे झाल्यामुळे त्या साऱ्यांना एकत्र बोल लावणे सत्ताधाऱ्यांनाही अवघड ठरणारे आहे. तसा प्रयत्न करणारी व भाजपाला अनुकूल असणारी प्रसिद्धी माध्यमेही त्यांच्या परिणामकारकतेला तडा जात असल्याचे अनुभवत आहेत. भाजपाने काँग्रेसवर लावलेले आरोप तेवढे खरे आणि काँग्रेसने भाजपावर केलेले सप्रमाण आरोप मात्र बालंटासारखे ही गोष्ट खरी न मानण्याएवढा
आपला मतदार आता जाणता झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी सरकारला असलेली मान्यता मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचा जनमत चाचण्यांचा अंदाज या गोष्टीचे प्रमाण ठरणारा आहे. भाजपाला
आज लोकसभेत २८२ जागा मिळाल्या आहेत. आता
लगेच निवडणूक झाली तर त्यातल्या ५० ते ६० जागा
कमी होतील हे एका राष्ट्रीय नियतकालिकाला
त्याने केलेल्या पाहणीत नुकतेच आढळून आले आहे.
या स्थितीत सध्याचा तणाव चालू ठेवणे सत्तारूढ
पक्षाला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. काँग्रेसला एकाकी पाडण्याचा त्याचा प्रयत्न, तो आज मोठा
असला तरी त्यालाच एकाकी करणारा ठरण्याची शक्यता मोठी आहे. त्यातून मोदी बोलत नाहीत, वेंकय्यांचा प्रभाव पडत नाही आणि नितीन गडकरींची पक्षातच अडवणूक होते असे सुब्रह्मण्यम स्वामी म्हणतात. सुषमाबाई सफाई देत असल्या तरी त्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत
आणि राजनाथसिह व जेटली यांची मान्यता कमालीची मर्यादित आहे. तरीही सध्याचा तणाव लवकर संपावा आणि संसद तिच्या रुळावरून नीट चालू लागावी असे वाटणाऱ्यांचा देशातील वर्ग मोठा आहे. त्यासाठी काँग्रेसच्या खासदारांचे निलंबन मागे घेतले जावे असेही सरकार व सभापतींना सुचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्याला आता फार उशीर झाला आहे आणि राजकारणाचा झालेला दुभंगच आता मजबूत झाला आहे. जाणकारांच्या मते बिहारच्या निवडणुकीखेरीज तो संपायचा नाही आणि बिहारचा निकाल कसा लागेल याविषयी कोणीही ठामपणे काही सांगण्याच्या
अवस्थेत नाही.

Web Title: Reversed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.